वो पायल नहीं पहनती पांव में !
बस एक काले धागे से कहर बरसाती हैं…!!
सौंदर्य म्हणजे काय ? सौंदर्य नेमकं कशात असतं ? शरीराच्या अवयवांमध्ये की आपल्या मनात..?
सौंदर्याच्या कृत्रिम घडामोडीत ‘मनासारखं’ या विशेषणाला फार महत्त्व आहे. सध्याच्या नव्या पिढीत लग्नाच्या वयात तर नाकाचं मोल वाटतंच, पण एरवीही सुंदर दिसणं महत्त्वाचं असतं. सुंदर व्यक्तींना तोंडी परीक्षांत झुकतं माप मिळतं; इंटरवूत अनुकूल कौल मिळतो आणि समाजातही विनासायास मान मिळतो. यातलं प्रत्येक विधान विश्वविद्यालयांच्या अभ्यासांतून सिद्ध झालेलं आहे.
कुठेही जाताना कपडे व्यवस्थित नाहीत असं वाटत असलं, तर आत्मविश्वास डळमळीत होतो. काही जणांना आरशात बघताना न्यून तेवढंच दिसतं, जाचतं आणि त्यांचा आत्मविश्वास घटवतं. दर वेळी आपल्या नकटय़ा नाकाला मिरच्या झोंबतात. एका सेंटिमीटरच्या चपटय़ा नाकामुळे, नाक सतत खाली घालावंसं वाटतं, आत्मविश्वास ढळतो आणि एकंदरीतच व्यक्तिमत्त्वाला गालबोट लागतं. तशा माणसांना जर तेवढं नाक त्यांच्या ‘मनासारखं’ दुरुस्त करून मिळालं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि आयुष्यात फार मोठा फरक पडतो….
अनेक प्रोफेशनल आणि सोशल ग्रुपमध्ये महिला कशी दिसते याला प्रचंड महत्त्व दिलं जातं हे नेहमीच अनुभवात येत असतं.. महिलांचं वय वाढू नये अशी एक अलिखित मानसिकता आहे. तरुण असताना प्रत्येकजण सुंदरच दिसतो. वय वाढू लागतं तसं आजूबाजूचे लोक तुमची तरुणपणीचे फोटो बाहेर काढून तुलना सुरू करतात. तुम्ही कसे होतात आणि आता कसे झालात.. अशी तुलनाही सुरू होते. पण माणूस दोन वेगवेगळ्या वयामध्ये सारखा कसा दिसू शकेल? वाढत्या वयात महिलांनी फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. यात काही चूक नाही. मात्र विशिष्ट फिगर असायला हवी असा अट्टाहास चुकीचा आहे. एखाद्याच दोषासाठी कायमस्वरूपी इलाज करून घेणं ठीक आहे; पण शिंग मोडून वासरांत शिरायला.. एकंदर निसर्गनियमांच्याच विरोधात उभं ठाकून, कायमचं युद्ध ओढवून घेणं योग्य नाही.
आकर्षक रूपाचे सामाजिक फायदे असतात हे खरं; पण आकर्षक रूप म्हणजे केवळ कोरीव चेहरा आणि कातीव बांधा नव्हे. ती केवळ निसर्गाची ‘उधारी’ असते. तो माल ‘आंतरिक’ भांडवलाच्या जोरावर आपलासा करावा लागतो.
आपल्या रूपातच मग्न असलेली स्त्री कितीही रेखीव असली तरी मोहक दिसत नाही. त्याउलट नकटय़ा नाकाचा विचारही न करता, आपल्या रोजच्या कामात स्वत:ला झोकून देणारी स्त्री, तिच्या आंतरिक सौंदर्याने नेहमीच आकर्षक दिसते. तिच्या रूपातल्या उणिवाही बघणाऱ्यांच्या नजरेला, त्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग म्हणूनच आवडतात.
बाळाकडे वात्सल्याने बघणारी आई स्वत:ला पूर्णपणे विसरलेली असते. म्हणूनच तिच्यावर नजर खिळून राहते. सौंदर्य म्हणजे माणसाचा स्वभाव. सौंदर्य एक प्रतिमा असते. प्रत्येक माणसाला देवाने सुंदर बनवलंय, कोणाला मनाने सुंदर बनवलंय तर कोणाला विचारांनी, बुद्धिमत्तेने तर कोणाला नैसर्गिक सौंदर्य प्रदान करून. सौंदर्याची धारणा सापेक्ष असते. मात्र त्याचबरोबरीने धैर्य, बुद्धिमत्ता, जबाबदारी, ताकद, ज्ञान, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा अशा इतर अनेक गुणांनी व्यक्तिमत्त्व अधिकाधिक प्रभावी बनत जातं आणि जन्मजात रूपाला नवनवे पैलू पडतात.
बाहेरची, ‘मी’ पणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही आपल्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात…….
#नज़ाकत ..
…श्याम ??
ब्लॉग लिंक :- https://manspandan.home.blog/2019/06/03/सौंदर्य
Leave a Reply