नवीन लेखन...

सौंदर्यासक्त ललत

“दंवात आलीस भल्या पहाटे
शुक्राच्या तोऱ्यात एकदा;
अवचित गेलीस पेरीत अपुल्या
तरल पावलांमधील शोभा”

कवी मर्ढेकरांची अतिशय सुंदर मुग्ध प्रणय दर्शविणारी ही कविता. यातील, तरुणीचे, थंडगार हवेत, भल्या सकाळी येणे आणि जाताना, आपला अननुभूत ठसा उमटविणे, सगळेच अप्रतिम. राग ललत हा याच प्रकृतीचा आहे. प्रसन्न, प्रणयी तरीही संयत आणि मुग्ध आणि नवथर हुरहुरीची थरथर दर्शविणारी. अगदी पहिल्या स्वरांपासून रागाचे लडिवाळ स्वरूप आपल्याला दिसायला मिळते.

थंडगार पहाटे, घराच्या बाहेर दंवारलेल्या पाकळ्यांतून डेरेदार मोगरा फुललेला दिसावा आणि त्या दर्शनाने पुढ्यातली सकाळ सुगंधित व्हावी त्याप्रमाणे कानावर ललत रागाचे सूर पडले मनाची तरल, काव्यमय अवस्था होते. पहाटेचे स्वागत अशा सुरांनी व्हावे, यापरते दुसरी सौन्दर्यासक्ती दुसरी नसेल. मनावर साचलेले सगळे मळभ दूर करण्याची अपरिमित शक्ती या रागाच्या सुरांमध्ये आहे.

या रागाचे सूर बघितले तर आणखी एक विशेष आपल्या ध्यानात येईल. “कोमल रिषभ” आणि “कोमल धैवत” तसेच “दोन्ही मध्यम” हे या रागातील स्वर आहेत, यात खासियत अशी आहे, तुम्ही “शुद्ध मध्यम” स्वर आणि “तीव्र मध्यम” स्वर यात कसा तोल साधता.
या रागात “तीव्र मध्यम” जरी असला तरी तो स्वर, बरेच कलाकार “आंदोलित” स्वरूपात घेतात, म्हणजे “शुद्ध मध्यम” या स्वराच्या साथीने घेतात आणि रागाचे स्वरूप तिथेच सिद्ध करतात. भारतीय संगीताचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, प्रत्येक रागातील “षडज” वेगळा असतो आणि एकदा या स्वराची स्थापना झाली की मग या स्वराला अनुसरून इतर स्वर सांगाती येतात. आणि इथेच प्रत्येक राग स्वत:चा “चेहरा” घेऊन अवतरतो. अर्थात या रागात बाकीचे स्वर हे शुद्ध आहेत. वास्तविक भारतीय संगीतात “षडज-पंचम” भावाला अपरिमित महत्व आहे पण इथे खुद्द “पंचम” स्वराला स्थान(च) नाही पण तरी देखील स्वरांचा सुसंवाद अवर्णनीय आहे. अर्थात, “षडज-मध्यम” भाव देखील तितकाच महत्वाचा असतो आणि या रागाचे वादी-संवादी स्वर हेच आहेत. या रागातील काही स्वरसंहती खास आहेत – “नि रे ग म(तीव्र) म म(तीव्र)’,”ग म ध नि ध म म(तीव्र),”म ध नि म नि ध”.

आता या रागाची शास्त्रीय बाजू ऐकायला घेतली म्हणजे आपल्याला हा राग सर्वांगाने समजून घेता येईल. हा राग एकतर “मारवा” थाटात येऊ शकतो किंवा “पूर्वी” थाटात. “शुद्ध धैवत” स्वराच्या अंगाने गेल्यास, आपल्याला मारवा थाट मिळू शकतो तर कोमल धैवत स्वराच्या संगतीने पूर्वी थाट घेता येतो. नावाप्रमाणे या रागात “लालित्य” आहे. हिंदुस्तानी संगीतातील एक प्राचीन राग, म्हणून या रागाची गणना होते. एकूणच रागाची प्रकृती अतिशय प्रसन्न, आनंददायी आणि सकाळची वेळ शुचिर्भूत करणारी आहे.

सकाळची वेळ आणि ऐकायला शहनाई सारखे सुषिर वाद्य!! उस्ताद बिस्मिल्ला खान साहेबांनी हा राग आपल्या वादनाने अजरामर करून ठेवला आहे. “मध्यम” या आंदोलित स्वराच्या सहाय्याने आपल्याला या रागाची “ललित” समजून घेता येते. किंबहुना, “ग म ध नि ध म म(तीव्र)” ही स्वरसंहती या वादनातून आपल्याला नेमकेपणाने जाणून घेता येते. नादमाधुर्यता हे खास उस्तादांच्या वादनाचे वैशिष्ट्य म्हणता येते. वास्तविक कुठल्याही “सुषिर” वाद्याला काही अंगभूत मर्यादा असतात परंतु वादनाचा गोडवा इतका आपल्याला भरून टाकतो की, जणू काही हा ललत राग आपल्या रक्तात भिनून जातो.

या रागाची प्रकृती जरी खेळकर, आनंददायी अशी असली तरी आपल्या संगीतकारांनी त्यात, ज्याला विरही, व्याकूळ म्हणाव्यात अशा अप्रतिम रचना बांधलेल्या आहेत. सुप्रसिद्ध गझल गायक, जगजीत सिंग यांनी या रागावर आधारित एक अप्रतिम रचना बांधली आहे – कोई पास आय सवेरे सवेरे.

या गझलेचा पहिला आलापच ललत रागाची ओळख करून देतो आणि त्याचबरोबर रचनेतील व्याकुळता. रागाच्या चेहऱ्याशी संपूर्ण फटकून वागणारी ही रचना आहे. अर्थात, पहाट म्हटली की नेहमीच शुचिर्भूत वातावरण असतेच असे नसून, त्याच पहाटेला अशी व्याकूळ करणारी विरहणीची व्यथामग्न सकाळ देखील असू शकते. अर्थात ही एक गझल आहे, त्यामुळे प्रत्येक कडव्यात तोच शब्दार्थ असेलच, असे नाही. किंबहुना गझलेचे हे एक अन्वर्थक लक्षण म्हणता येईल. गझलेतील, प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असू शकते आणि त्याच्या अन्वयार्थ गझलेच्या धृवपदाशी असेलच, असा अजिबात नियम नाही.

जरा नीट ऐकले तर सहज ध्यानात येईल, या सुरवातीच्या पहिल्या आलापीमध्ये, जगजीत सिंगने संपूर्ण रागाचे चलन पेश केले आहे.  तसेच रचनेच्या मध्यंतरात घेतलेली सरगम – ग म ध नि सा रे अशी  घेताना,त्याचा शेवट ग आणि म या स्वरांवर कसा घेतला आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. अर्थात पुढे हीच सरगम, गिटारच्या सुरांत कशी बेमालूम मिसळली आहे, हा आणखी आनंदाचा भाग आहे. मुळात, जगजीत सिंगच्या बहुतेक सगळ्या गझला या अतिशय संयत, शांत आणि ठाय लयीत असतात. एकदा एक लय सुरवातीला घेतली की शक्यतो त्या लयीतच पुढली रचना बांधायची. असा या संगीतकाराचा विचार असायचा पण तरीही जरा बारकाईने ऐकले तर, त्या लयीतच कितीतरी वेळा अनपेक्षित हरकती, बोलताना घेऊन, तीच रचना श्रीमंत कशी करायची, याचा ही गझल म्हणजे एक सुंदर वस्तुपाठ ठरावा.
संगीतकार मदन मोहन यांनी  “चाचा झिंदाबाद” या चित्रपटासाठी  “प्रीतम दरस दिखाओ” ही रचना बांधताना, या रागाचा अप्रतिम उपयोग केला आहे.

एखादे युगुलगीत कसे सादर करावे आणि गाताना, दोघेही गायक कसे एकमेकांचा सूर “उचलून” गातात आणि गाण्यात वेगळीच खुमारी आणतात, हे या गाण्यात ऐकण्यासारखे. मन्नाडे आणि लताबाई, दोघेही तालेवार गायक आणि अशावेळी जर का त्यांना अशी “गायकी” ढंगाची रचना गायला मिळाली,की कसे असामान्य गाणे जन्माला येते, याचा हा अनिर्वचनीय श्रवणानुभव आहे.  सुरवातीचा “आकार” युक्त आलाप आणि पुढे त्याचा स्वरांचे. सतारीच्या सुरांतून प्रात्यक्षिक ऐकायला मिळते. ललत रागावर आधारित गाणे आणि पण, ललत रागाची प्रतिकृती नव्हे. सुगम संगीतात, अशा प्रकारचे स्वातंत्र्य नेहमीच संगीतकार घेत असतात आणि त्यायोगे, गाण्यातील सौंदर्य अधिक खुलवतात. “तुम बीन रो रो रैन बिताये” ही ओळ लताबाई वरच्या पट्टीत गातात आणि तोच स्वर पकडून मन्नाडे , लताबाई जिथे “रो” या शब्दाचा सूर घेतात, तोच सूर पकडतात आणि गाणे पुढे नेतात. युगुलगीत कसे गावे, याचा हा सुंदर धडा आहे. या गाण्यातील, लताबाईच्या हरकती ऐकाव्यात. संपूर्ण सप्तक आवाक्यात घेऊन, चकित करण्याचा अजिबात हव्यास नसून, गाण्याच्या सौदर्याच्या दृष्टीने कितपत हरकत घ्यायची, याची नेमकी जाण ठेऊन, ती हरकत घेतली आहे. केवळ अप्रतिम. प्रत्येक सूर कसा स्वच्छ, नितळ लागला आहे.

भारतीय संगीतकारांनी काहीवेळा अशी गाणे बनवली आहेत, त्या रचना, त्या रागाचे लक्षण गीत म्हणून मानता येईल. प्रत्येक रागाचे स्वत:चे असे “चलन” असते आणि त्यानुसार त्या रागाचा “तोंडावळा” ठरत असतो. त्यामुळे, एखादी रचना, हेच त्या रागाचे “चलन” तसेच ओळख ठरून जाते. “एक शहेनशाह ने बनवाके हंसी ताजमहल” हे संगीतकार नौशाद यांनी बनवलेले गाणे, ललत रागाची प्राथमिक ओळख म्हणून नक्की ओळखले जावे. गाण्याच्या पहिल्या सुरापासून ते अखेरच्या सुरापर्यंत, नखशिखांत ललत राग.

गाण्याची सुरवात सारंगीच्या सुराने होते पण त्यात संतूरचे स्वर मिसळले आहेत. अर्थात पार्श्वभागी नितांत रमणीय ताजमहाल आणि तिथली बाग!! हेच सूर, ललत रागाची “तोंडओळख” करून देत असताना, एकदम, सतारीचे सूर झमझमत येतात पण येताना, आपल्याबरोबर जलतरंग वाद्याला घेऊन येतात आणि तिथे ललत रागाचा चेहरा समोर येतो, तो अवर्णनीय आहे. गाण्यातून, रागाचे सादरीकरण करताना, रागदारी संगीतातील क्लिष्टता बाजूला सारून, त्यातील “ललित” भाग निवडून सादर केला म्हणजे मग सगळ्या रसिकांना तोच राग “आपला” वाटायला लागतो आणि त्या रागाबद्दल ममत्व वाटायला लागते. या गाण्याने नेमकी हीच किमया केली आहे.

वाद्यमेळ संपत असताना, रफीचा छोटासा आलाप कानावर येतो आणि त्या “आकारा” मध्ये त्याच तोडीचा समृद्ध “आकार” लताबाईंच्या आवाजात ऐकायला मिळतो.रफीचा बुलंद आवाज आणि त्याला मिळालेली लताबाईंची असामान्य गायकी, याचा अतिशय सुंदर मिलाफ या गाण्यात ऐकायला मिळतो. खरतर शकील बदायुनीच्या शब्दांनी तरुण मनाच्या प्रणयी भावनेचा अनोखा आविष्कार केला आहे. केवळ कविता म्हणून देखील, हे गाणे वाचण्यासारखे आहे.
अशाच प्रणयी रंगाचे अत्यंत “अनोखे” रूप, काही वर्षांपूर्वी आलेल्या “ईश्किया” या चित्रपटात विशाल भारद्वाज या संगीतकाराने पेश केले आहे. रेखा भारद्वाज या गायिकेने हा अनोखा आविष्कार सादर केला आहे. तंबोऱ्याच्या सुरांत सुरवातीला रेखा भारद्वाज, नि ग नि रे सा या सुरांनी सुरवात करते. इथे जो “निषाद” लागला आहे, ते खास ऐकण्यासारखा आहे. थोडे वेगळे मांडायचे झाल्यास, हा जो सुरवातीचा आलाप आहे, त्यावर किंचित किशोरी आमोणकरांच्या गायकीचा असर दिसतो पण, तितकाच. पुढे सगळे गायन वेगळ्या थाटात सुरु होते.

गाण्याची चाल “बंदिश” असल्याचा भास होतो पण, तालाचे वळण बघितले तर लगेच फरक कळून येतो. या गाण्याची आणखी गंमत म्हणजे, गाण्यात “केहरवा” ताल आहे पण तो अशा पद्धतीने आपल्या समोर येतो की पारंपारिक मात्रांचे वजन लक्षात घेता, इथे ताल, वेगवेगळ्या वाद्यांतून ऐकायला मिळतो आणि तेच सादरीकरण लगेच आधुनिक स्वरूप घेते.

आपण वरती बघितलेल्या “कोई पास आया सवेरे सवेरे” या रचनेतील शब्दभावाशी जुळणारी भावना इथे दृग्गोचर होते आणि तशीच व्याकुळता, या गाण्यात प्रतिबिंबित होते पण, तरीही चालीतील फरक आणि वाद्यमेळातील गुंतागुंतीची रचना ऐकताना, साम्य बाजूला पडून, संपूर्ण नवीन रूप आपल्यासमोर येते.

“तू है मेरा प्रेम देवता” हे “कल्पना” चित्रपटातील, मन्ना डे आणि रफी यांनी गायलेले युगुलगीत असेच अत्यंत श्रवणीय गाणे आहे. संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी संगीतबद्ध केलेले आहे. गाण्याच्या अगदी पहिल्या सुरापासून आपल्याला “ललत” रागाचे सूर भेटतात आणि वातार्वरण शुचिर्भूत होते. गाण्यातील प्रत्येक हरकत ही अगदी “ललत” राग समोर ठेऊन बंशाली आहे, असे वाटते परंतु एकूण रचना ऐकली तर रागापेक्षा गीतातील भाव अधिक लक्षात राहतो आणि चित्रपटातील गाणे, म्हणून हे वैशिष्ट्य अधिक महत्वाचे.

मराठी चित्रपट संगीतात सुधीर फडक्यांनी अपरिमित योगदान दिले आहे. “पोस्टातली मुलगी” चित्रपटातील “ते माझे घर” याचा नावाचे गीत आपल्याला “ललत” रागाची ओळख करून घेण्यास उपयोगी ठरेल. गाण्याची चाल तशी अगदी सरळ, साधी आणि सोपी आहे पण रागातील स्वरांच्यात जो अंगभूत गोडवा असतो, त्याची खुमारी अशा गाण्यातून ऐकायला मिळते. बाबूजींच्या चाली या तशा सरळ असतात पण तरीही गाण्यातून अतिशय बारीक हरकती असतात, जेणेकरून गाणे गाताना ती चाल लगेच “गायकी” ढंगाची होते. आशा भोसले यांनी गायलेले गाणे ऐकताना, आपल्याला हेच समजून घेत येते आणि आपण हे गाणे ऐकताना स्वत:ला हरवून बसतो.

ललत राग आहेच असा, सकाळ सकाळी सूर कानावर पडावेत आणि उगवलेली पहाट मनातील सगळे किल्मिष बाजूला सारून, नव्याने सामोऱ्या येणाऱ्या दिवसाचे स्वागत उत्साहाने तयार व्हावे, असेच प्रत्येकवेळी वाटत रहाते आणि हेच रागाचे खरे वैशिष्ट्य.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..