सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला. ‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व सर्वांना असलेली गाण्याची आवड या अनुकूल परिस्थितीमुळे लहानपणी रामभाऊंना कुंदगोळ येथे बळवंतराव कोल्हटकर यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. त्यांना त्यात सुमारे पंच्याहत्तर ध्रुवपदे व पंचवीस तराणे मिळाले. रामभाऊंचे वडील मुळचे कुळकर्णी. त्यामुळे मुलाने जहागीरदारांकडील वहिवाटदारी व पाटीलकी पुढे सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु रामभाऊंचा जीव गाण्यात अडकला होता. लहानपणी जरी त्यांचा आवाज गोड व हलका होता, तरी ते वयात आल्यावर त्यांचा आवाज फुटला व तो बोजड झाला. त्यावर उपाय म्हणजे, चांगल्या गुरूंकडून तालीम मिळणे हाच होता.
त्या सुमारास अब्दुल करीमखाँसाहेब मिरज येथे येऊन स्थायिक झाले. खाँसाहेबांचे गाणे सुरेल व भावनाप्रधान. रामभाऊंना खाँसाहेबांकडे शिकण्याची ओढ निर्माण झाली. तेव्हा मोठ्या प्रयत्नांती वडिलांचे मन वळवून रामभाऊ अब्दुल करीमखाँसाहेबांकडे गाणे शिकण्यास गेले. आवाज फुटल्यामुळे व बोजड झाल्यामुळे खाँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंनी त्यांचा स्वत:चा आवाज मोठ्या कष्टाने ताब्यात आणला. खाँसाहेबांकडे सुमारे सात-आठ वर्षे तालीम घेतल्यानंतर बीनच्या अंगाने कसे गावे याचे तंत्र रामभाऊंना अवगत झाले व त्यातून त्यांनी स्वत:ची विशेष आक्रमक गायकी बनवली. पुढे, सुमारे १९०८ पासून, त्यांनी संगीत नाटकांमध्ये कामे केली. त्यांना ‘नाट्यकला संगीत प्रवर्तक मंडळी’ या संस्थेतर्फे होणाऱ्या ‘सौभद्र’ नाटकातील सुभद्रेची भूमिका मिळाली. त्यांच्या सभ्य, सौम्य, प्रतिष्ठित व सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची सुभद्रेची भूमिका लोकप्रिय होऊ लागली. मुख्य म्हणजे त्यांचा गाण्याचा ढंगही वेगळा व प्रेक्षकांवर छाप पाडणारा असायचा. एके दिवशी अमरावतीला ‘सौभद्र’चा प्रयोग चालू असताना त्या प्रयोगाला हजर असलेले पुढारी व वऱ्हाडचे अनभिषिक्त राजे दादासाहेब खापर्डे यांनी रामभाऊंच्या भूमिकेवर व गाण्यावर खुश होऊन ‘हे तर सवाई गंधर्व’ असे उत्स्फूर्तपणे उद्गार काढले! तेव्हापासून लोक रामभाऊ कुंदगोळकरांना ‘सवाई गंधर्व’ या नावाने ओळखू लागले.
सवाई गंधर्वांनी १९०८ ते १९३१ पर्यंत संगीत नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘विनोद’ या नाटकातील त्यांचे वामनरावाचे काम; तसेच, ‘मिराबाई’ नाटकातील दयानंदाची भूमिका व ‘सुखसाधना भजना गणा’ हे पद खूप गाजले. त्यांनी नाट्यजीवनाला १९३१ नंतर पूर्णविराम दिला. त्यानंतर ते फक्त खासगी बैठकीत गात असत. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत.
किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्याप आणि अधिकच उजळविणार्या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या त्यांचे शिष्य यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली. मा.सवाई गंधर्व यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply