आजच्या स्त्रिया शिकल्या, सावरल्या, देश चालवत्या झाल्या, परंतु धर्म-प्रथा-परंपरांमधलं स्त्रियांवर अन्यायकारक वाटणारं, कालबाह्य झालेली जोखडं त्या आजही पूर्णपणे फेकून देऊ शकल्या आहेत, असं ठामपणे म्हणता येत नाही. धर्म-प्रथा-परंपरांच्या नांवाखाली स्त्रियांचं दमन आजही सुरू आहे. आणि आपलं हे दमन पाप-पुण्याच्या नांवाखाली स्त्रिया आनंदाने (की मुकाट्याने !) सहन करतात, हेच मला न पटण्यासारखं आहे. असं करणारात अशिक्षित-सुशिक्षित अशा सर्व थरातल्या स्त्रिया असलेल्या आढळून येतात. पुन्हा या अन्यायकारक प्रथा-परंपरांचं समर्थन स्त्रिया मोठ्या हिरीरीने करताना दिसतात.
उदाहरणच द्यायचं तर नुकत्याच घडून गेलेल्या शबरीमला प्रकरणाचं देता येईल. केरळातील हरिहराच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही, ही प्रथा गेली अनेक शतकं सुरू आहे. ही प्रथा जेंव्हा केंव्हा सुरू झाली, तेंव्हाच्या काळातील समजुतीप्रमाणे कदाचित तेंव्हा ती बरोबर असेलही, परंतु आता त्या समजुती कालबाह्य ठरल्या असुनही अजून त्यांच्या नांवाखाली तेंव्हा सुरू झालेल्या प्रथा सुरूच आहेत. त्यापैकी ही एक. देवाच्या आणि प्रथा-परंपरांच्या नांवाखाली स्त्रियांना मंदिर प्रवेश निषिद्ध ही गोष्टच आजच्या समानतेच्या समाजात, समाजाच्या अर्धांगावर अन्याय करणारी आहे, हे कुणाला पटेल न पटेल, पण स्त्रियांना मात्र ते पटायला हवं. परंतु ह्या प्रथेच्या विरोधात जेंव्हा न्यायालयाने निर्णय दिला, तेंव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाच्या विरोधात स्त्रियाही मैदानात उतरलेल्या पाहून मला तर आश्चर्यच वाटलं होतं. ह्यात सुशिक्षित-अर्धशिक्षित-अशिक्षित तशाच, शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियाही होत्या. केरळात तर शिक्षणातं प्रमाण १०० टक्के आहे असं म्हणतात. असं असताना, शिकल्या-सवरल्या स्त्रियांचं हे वागणं मला विपरीत वाटलं..!
शबरीमला हे एक उदाहरण झालं. स्त्रीला दुय्यमत्व देणाऱ्या अशा अनेक प्रथा-परंपरा सांगता येतील. मी असं का म्हणतो, ते सांगतो. एके काली भारतात स्त्रियांनी शिकणं निषिद्ध मानला गेलं होतं. त्याकाळच्या चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत तर क्षुद्र समजल्या जाणाऱ्या वर्गात तर कुणालाही शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा काळात त्या अन्यायकारक प्रथा-परंपरांच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या. १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. जेव्हा ही शाळा सुरु केली, तेंव्हा त्या काळच्या समाजव्यवस्थेने संताप व्यक्त केला. सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे, चिखल फ़ेकणे, अचकट-विचकट भाषेचा वापर करणे, निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते. परंतू सावित्रीबाई फ़ुले अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही. कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्य निर्माण करणारे होते .त्याकाळी स्त्रीयांना अजिबातच स्वातंत्र नव्हते. स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे. या अन्यायकारक समजुती/प्रथांविरुद्ध श्री व सौ फुले उभे राहिले. मुलींसाठी शिक्षण प्रसार करुनच हे दांपत्य थांबलं नाही, तर समाजातील विधवाविवाह, केशवपन, सहगमन इत्यादी त्या काळच्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या प्रथाविरुद्धही ते ठामपणे उभे राहिले. हेच कार्य भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वेंनीही पुढे चालवलं. या व अशा महान समाजसुधारकांमुळेच आजच्या स्त्रिया स्वत:च्या पायावर सुशिक्षित, स्वयंसिद्धा होऊन उभ्या राहीलेल्या दिसतात.
जुन्या काळातल्या स्त्रियांवर होणाऱ्या सामाजिक प्रथा-अन्यायाविरुद्ध काही लोक ठामपणे उभे राहिले म्हणून आजच्या स्त्रिया स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करू शकतात, वावरु शकतात. परंतु याच स्त्रिया जेंव्हा शबरीमलासारख्या प्रकरणात किंवा तत्सम जुनाट व अन्यायकारक प्रथांच्या बाजुने उभ्या राहताना दिसतात, तेंव्हा मात्र फुले-कर्वे यांचं त्या काळच्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या प्रथा-परंपरांच्या विरोधात उभे राहाण्याचं कार्य व त्यामागचा अर्थ या स्त्रियांना समजलाच नाही की काय, असं वाटू लागतं. स्वत:ला मोठ्या अभिमानाने ‘सावित्रिच्या लेकी’ म्हणवून घेणाऱ्या आजच्या आधुनिक स्त्रिया शिक्षणाने फक्त साक्षर झाल्या, सुशिक्षित व्हायचं मात्र विसरल्या, असं म्हटलं तर चुकू नये. मला वाटतं सावित्रीच्या कार्याचा अर्थ स्त्रियांना केवळ साक्षर करणं एवढाच नव्हता, तर त्यांना त्यांचा त्या त्या काळातील अधिकार मिळवून द्यायचा, असाही होता. हे जर आजच्या स्त्रियांना समजत नसेल, तर मग आजच्या स्त्रियांना स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असं मी समजतो. धर्म-प्रथा-परंपरा आणि आता राजकारणही यांच्या नांवाखाली जेंव्हा जुनाट प्रथा परंपरांचं पालन करण्याची बंधन स्त्रियांवर घालण्यात येतात, त्या त्या वेळी त्या विरुद्ध जेंव्हा आजच्या स्त्रिया उभ्या राहतील, तेंव्हाच त्या सावित्रीच्या लेकी म्हणवून घेण्याच्या पात्रतेच्या ठरतील. सावित्रीच्या कार्याचा तो खऱ्या अर्थाने गौरव झालेला असेल. तो दिवस लवकर उजाड एवढीच ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनी’ माझी अपेक्षा आहे.
— नितीन साळुंखे
9321811091
08.03.2019
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेला लेख
Leave a Reply