
कारातीर्थ !!!
क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरीत जिथं स्थानबद्ध करून ठेवलं होतं, तो तुरुंग म्हणजे
कारातीर्थ !
तुम्हा आम्हा सर्वांचे एक श्रध्दास्थान !
स्वातंत्र्यदेवतेचा धगधगता मानवी अवतार रत्नागिरीत जेथे राहून गेला , ती जागा म्हणजे,
कारातीर्थ !
इंग्रजांना भाजून काढणारे आणि देशभक्तांना प्रेरणा देणारे विचारांचे अग्निलोळ जिथे अधिक प्रखर झाले ती जागा म्हणजे,
कारातीर्थ!
विधायक समाजसेवेचा आणि समतेचा संदेश कृतिउक्तीतून वास्तवात आणण्यासाठी जीवाचं रान ज्या जागी त्यांनी केलं ती जागा म्हणजे
कारातीर्थ!
ज्यांच्या पुण्यस्पर्शानं कारागृहातील साखळदंड , बेड्या, धरती, सगळं वातावरण , पावन आणि धन्य झालं ती जागा म्हणजे
कारातीर्थ!
रत्नागिरीकर भाग्यवान, कारण स्वातंत्र्यदेवतेचा साक्षात अवतार या भूमीत राहून गेला . ज्याच्या कर्तृत्वाला , त्यागाला , विजिगीषू वृत्तीला , देशभक्तीला , दूरदृष्टीला , विज्ञानवादी दृष्टिकोनाला , साहित्याच्या सर्व प्रांतात निष्ठेने दिलेल्या योगदानाला , जिद्दीला, साहसाला आणि अतुलनीय अशा त्यागमूर्तीच्या अविस्मरणीय कर्तृत्वाला प्रतिमा प्रतीकं आणि शब्दात साकारणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्याएवढं अवघड काम !
आपण सूर्याच्या दाहकतेला स्पर्श करू शकत नाही, पण क्रांतिसूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
कारातीर्थाचे
दर्शन घेऊन मनोमन कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना ?
२६ फेब्रुवारी ही क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी !
आपण सर्वांनी रत्नागिरीच्या तुरुंगात निर्माण झालेल्या कारातीर्थाला जायला हवं . दर्शन घ्यायला हवं . मनोबल जागवायला हवं . वाढवायला हवं .
सावरकर अभिवादन यात्रा आणि सावरकर विचार यांची एक चळवळ सुरू व्हायला हवी.
आपलं हे कर्तव्यच आहे, आपण आपल्या कुटुंबियांसह दर्शन घ्या.
स्मार्टफोन मध्ये गुंतलेल्या आपल्या तरुण पिढीला सांगा…
रत्नागिरी बाहेर असलेल्या सर्वाना, येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना, महाराष्ट्रातील सर्वाना सांगा…
रत्नागिरीत कारातीर्थ आहे,त्याचं दर्शन घ्या, तिथे असलेल्या बेड्या, साखळदंड यांना कृतज्ञतेने स्पर्श करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतेने अभिवादन करा.
आणि हो, एवढंच नाही तर २६ फेब्रुवारी हा दिवस सावरकर साहित्य वाचण्याचा दिवस म्हणून साजरा करा . व्हॉट्सअप, फेसबुक, आणि सोशल मीडियावर जिथे जिथे शक्य आहे तिथे सावरकर विचार व्यक्त होऊ द्या . बुजुर्गानी , त्यांच्या सावरकरांविषयी असण्याऱ्या आठवणी लिहा.
हा दिवस सावरकरांविषयी सर्वकाही असाच असू द्या.
कारण,
स्वातंत्र्यवीर सावरकर कर्तृत्वानं, विचारानं अजरामर आहेत.
फक्त त्यांची आठवण आपल्याला, आपल्या नव्या पिढीला व्हायला हवी असं मला वाटतं.
हीच वेळ आहे सजग होण्याची आणि हीन, दीन होऊन म्लान पडलेल्या , बधीर होत जाणाऱ्या आपल्या समाजाला जागविण्याची !
अंतर्मनात दडलेल्या आपल्यातल्या देशभक्तीला हाकारण्याची !
स्वातंत्र्यसूर्य तळपत राहायला हवा असेल तर आचारविचारांचं अर्घ्य द्यायला हवं !
क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून त्यांची पुण्यस्मृती जागविण्यासाठी कारातीर्थ दर्शन घ्यायला हवं !
डॉ.श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
८९५१९०६७०१
—————————-
मित्रानो, हा लेख नावासह सर्वदूर पसरू द्या आणि कारातीर्थ दर्शन एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणू या .
वंदे मातरम !
#क्रांतिसूर्य सावरक
Leave a Reply