भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांचा जन्म २९ डिसेंबर १९४९ रोजी झाला. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीवर यष्टिरक्षण करताना त्यांना हेल्मेट वापरण्याची कधी गरजच भासली नाही. किरमाणी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २७५ सामन्यांत ३६७ झेल व ११२ यष्टिचीत अशी कामगिरी नोंदविली. त्यांच्या नावावर एक कसोटी बळीही आहे.
फारूख इंजिनियर यांच्यानंतर किरमाणी यांनी भारतीय संघात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली. १९७६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणार्यान किरमाणी यांनी भारताच्या बड्या स्पिनर्सच्या गोलंदाजीवर कठीण प्रसंगी नेटाने यष्टिरक्षण केले. आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत त्यांची मैदानावरील ऊर्जा आणि मैदानावरील वावर विलक्षणीय असे. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊनही त्यांनी दोन कसोटी शतके झळकावली.
१९८१-८२ मधील भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन कसोटींमध्ये किरमाणी यांनी एकही बाय दिला नव्हता. १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये टनब्रिज वेल्स येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत किरमाणी यांनी कपिल देवसह नाबाद १२६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. त्यावेळी बलाढ्य समजल्या जाणार्याी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सहाव्या कसोटीत किरमाणी यांनी सुनील गावसकर यांच्यासह नवव्या विकेटसाठी रचलेली नाबाद १४३ धावांची भागीदारीही खास ठरली होती. त्यावेळी गावसकर यांनी नाबाद २३६ धावा केल्या होत्या. तेव्हा एखाद्या भारतीयाने विंडीजविरुद्ध केलेली ती सर्वोच्च खेळी ठरली होती.
ऑक्टोाबर १९८३ मध्ये नागपूर येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. औपचारिक ठरलेल्या पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात किरमाणी यांनी हातातले ग्लोव्हज काढत गोलंदाजी केली. पाकिस्तानचा सलामीवीर अझीम हाफीज याचा त्रिफळा उडवून गोलंदाजीतील “बळी’ही मिळविला. भारतीय सरकारतर्फे सय्यद किरमाणी यांना १९८२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ते कर्नाटकचे उपकर्णधार होते, तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट