बाळाजी प्रभाकर मोडक जन्म १८४७ साली रत्नागिरी येथे झाला.
बाळाजी प्रभाकर मोडकांनी रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र अशा विविध अभ्यासशाखांचा परिचय करून देणारी अनेक पुस्तके मराठीतून लिहिली. मूळचे रत्नागिरीचे असणारे मोडक सांगली, बेळगाव, पुणे अशा विविध ठिकाणी शिक्षण घेऊन कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या सुमारास डॉ. कूक या इंग्रज अधिकाऱ्याकडे काही शिक्षकांना सप्रयोग रसायनशास्त्र शिकण्यासाठी पाठविण्यात आले, त्यांत बाळाजी मोडक हेही एक होते. डॉ. कूककडे रसायनशास्त्र शिकून कोल्हापुरास परत आल्यावर त्यांनी ‘रसायनशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. ते साल होते १८७५. याआधी केरोपंत छत्रे यांचे ‘पदार्थविज्ञान’(१८५२ ) हे पुस्तक व डॉ. नारायण दाजी लाड यांच्या ‘रसायनशास्त्र’( १८६३) या ग्रंथात या विषयाचे विवेचन आले होते. परंतु ही दोन्ही पुस्तके इंग्रजी पुस्तकांच्या आधारे लिहिली गेली होती.
बाळाजी मोडक यांचा ‘रसायनशास्त्र’ हा ग्रंथ मात्र त्या विषयावरील मराठीतील पहिला स्वतंत्र ग्रंथ होता. पुढे १८९२ मध्ये तो ‘रसायनशास्त्राची मूलतत्त्वे’ या नावाने पुन्हा प्रकाशित केला गेला. दरम्यान, मोडक यांची निरिंद्रीय व सेंद्रीय रसायनशास्त्रावरील पुस्तकेही प्रकाशित झाली. १८७० ते १९०० या काळात राजाराम महाविद्यालयात प्रयोगशाळा प्रमुख होते. बाळाजी प्रभाकर मोडक यांनी कोल्हापूर जिल्ह्यांतील शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शने भरवायला सुरुवात केली. मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती. त्यांना कालाजंत्रीकार म्हणून ओळखत असत. मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली. मुख्यत: शास्त्रीय लेखनासाठी मोडक यांची ओळख असली तरी त्यांनी इतिहासविषयक लेखनही केलेले आहे. शास्त्रीय विषयांच्या प्रसारासाठी ‘मराठी विद्यापीठा’ची योजनाही त्यांनी मांडली होती. ग. ब. मोडक यांनी १९३१ साली लिहिलेले ‘प्रो.बाळाजी प्रभाकर मोडक हे चरित्र उपलब्ध आहे.
बाळाजी प्रभाकर मोडक यांचे २ डिसेंबर १९०६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply