अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१२ रोजी झाला.
मदनपल्लीच्या बेझंट थिऑसॉफिकल महाविद्यालयाचे प्राचार्य चिंतामणी त्रिलोकेकर यांनी अर्णीकरांचे गुण आणि बुद्धी लक्षात घेऊन त्यांची बनारस हिंदू विद्यापीठात पुढील शिक्षणाची सोय करून दिली. तेथे बी.एस्सी. आणि एम.एस्सी. या दोन्ही पदव्या त्यांनी पहिल्या श्रेणीत, पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन डॉक्टरेट पदवीसाठी संशोधन सुरू केले. त्यांना प्रा. श्रीधर सर्वोत्तम जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक होते, ‘कोरोना प्रेशर अँड दी जोशी इफेक्ट इन गॅसेस अंडर डिस्चार्ज.’ त्यांचा प्रबंध सातशे पृष्ठांचा होता आणि तीन परदेशी प्राध्यापकांनी त्याची प्रशंसा केली होती.
१९५५ साली त्यांना भारत सरकारची ‘ओव्हरसीज मॉडिफाइड स्कॉलरशिप’ मिळाली. त्यानुसार ते पॅरिसमधील मेरी क्यूरी यांनी स्थापन केलेल्या प्रयोगशाळेत रुजू झाले. पॅरिस विद्यापीठाने त्यांच्या प्रबंधाचे मूल्यमापन करून त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ ही पदवी दिली.
१९५८ साली ते बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्रपाठक म्हणून रुजू झाले. या ठिकाणी त्यांनी अणुरसायनशास्त्र विभागाची उभारणी केली. डॉ. के. एन. उडुपा यांच्याबरोबर वैद्यकशास्त्रामध्ये कल्पकतेने जेथे-जेथे किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (आयसोटोपचा) उपयोग करता येईल, तेथे-तेथे यशस्वीपणे करून दाखवला.
मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या सहकार्याने त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये अणुरसायनशास्त्राच्या अध्ययन व संशोधनासाठी आवश्यक असणार्या पायाभूत सुविधा विकसित केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ विद्यार्थ्यांनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली. त्यातून ३०० शोधनिबंध प्रकाशित झाले.
१९७७ साली ते सेवानिवृत्त झाले. तरीही विद्यापीठाने त्यांना मानद प्राध्यापक म्हणून अध्यापन-संशोधन करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. ‘युनिव्हर्सिटी केमिकल सोसायटी’च्या वतीने त्यांनी काही उपक्रम राबवून विज्ञान प्रसारासाठी फिरत्या प्रयोगशाळेचाही उपयोग केला होता.
१९६२ साली त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात मॅनहॅटन प्रकल्पातील शास्रज्ञ प्रा. जॉन विलार्ड यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली होती.
रसायनशास्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी ‘युनेस्को’ने त्यांची ‘पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री’ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली होती.
कृत्रिम किरणोत्सर्गाच्या शोधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी १९८५ साली भाभा अणू संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने एक भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले होते.
१९८८ साली लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’चे (एफ.आर.एस.सी.) ते मानद सदस्य झाले. १९७४ साली उत्कृष्ट शिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांचा गौरव केला. पुणे विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना १९९९ साली ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘विद्या व्यास पुरस्कार’, ‘एम. व्ही. रमणय्या पुरस्कार’, ‘शारदा ज्ञानपीठ पुरस्कार’, ‘प्रो. फ्रेडरिक ज्योलियो क्यूरी एंडोमेंट अवॉर्ड’, ‘फुलब्राइट शिष्यवृत्ती’ आदी सन्मानांचे ते मानकरी ठरले.
‘एसेन्शियल्स ऑफ ऑकल्ट केमिस्ट्री’ हा ग्रंथ त्यांनी २००० साली, वयाच्या अठ्ठयाऐंशीव्या वर्षी लिहून पूर्ण केला.
२२ नोव्हेंबर २000 रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply