नवीन लेखन...

मूर्तिकार केशव बाबूराव लेले

भारतातील विविध प्रांतांतच नव्हे, तर पदेशांतही आपल्या मेणाच्या हलत्या चित्रांच्या प्रदर्शनाने १९२८ ते १९४५ हा काळ गाजविलेले व जन-मान्यता मिळवलेले मूर्तिकार व प्रदर्शनकार म्हणून लेले प्रसिद्ध होते. केशव बाबूराव लेले यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील मुटाट या गावी झाला. त्यांचा जन्म १३ मार्च १९०१ रोजी झाला.

वडील बाबूराव हे शेतीसोबत सावकारी करीत व त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे ते सहृदय सावकार म्हणून ओळखले जात. शिवाय ते गणपतीच्या मूर्ती बनवून आप्तेष्टांना गणेशोत्सवासाठी विना-मोबदला देत. केशव लेले यांच्या आईचे नाव वाराणसी होते. बाबूराव व वाराणसी लेले या दांपत्याला सहा मुले होती व केशव हे दुसर्या क्रमांकाचे अपत्य होते. त्यांचे वडील बाबूराव लेले यांचे १९१४ मध्ये निधन झाले.

शेती कमी होती व सावकारीतही सहृदय स्वभावामुळे फार प्राप्ती झाली नव्हती. परिणामी, आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे गणेश या ज्येष्ठ मुलाने शिक्षण सोडले व मुंबईला येऊन नोकरी करण्यास सुरुवात केली. पण अल्पावधीतच त्यांना क्षयाचा विकार जडला व नोकरी सोडून गावी परतावे लागले. मग अर्थार्जनाची जबाबदारी सतरा वर्षांच्या केशववर येऊन पडली. केशवचे शालेय शिक्षण मुटाट या जन्मगावी झाले होते व त्यास वडिलांमुळे लहानपणापासूनच गणपती तयार करण्याची आवड होती. पण परिस्थितिवश शिल्पकलेचे शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे अर्थार्जनासाठी ते वसईचे विख्यात शिल्पकार र.कृ. फडके यांच्याकडे १९१८ पासून काम करू लागले व अल्पावधीतच त्यांचे आवडते शिष्य झाले.

त्या काळात फडके मेणाचे पूर्णाकृती हलते पुतळे बनवून, त्याची प्रदर्शने भरवीत असत. लेले यांनी १९१८ ते १९२५ या काळात उमेदवारी करून ही कला व प्रदर्शन भरविण्याचे तंत्रही शिकून घेतले. इंग्लंडमधील वेम्ब्ले येथे १९२५ मध्ये फार मोठे औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात आले होते व त्यासाठी ब्रिटिश साम्राज्यातील विविध देशांतील उद्योजक व कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते. हे आमंत्रण हलत्या चित्रांचे प्रदर्शन करणार्याज र.कृ. फडके यांना मिळाले पण त्यांनी बोटीचा एवढा लांबचा प्रवास करण्याचे नाकारले व ही जबाबदारी लेले यांच्यावर सोपविली. लेले यांनीही हे आव्हान स्वीकारले व काहीही पूर्वानुभव नसताना वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी ‘फडकेज फाइन आर्ट वर्क्स’चे व्यवस्थापक म्हणून ते इंग्लंडला रवाना झाले. तीन इंग्रज पुरुष व तीन इंग्रज स्त्रियांच्या मदतीने हे हलत्या चित्रांचे प्रदर्शन उभारून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले. प्रदर्शनातील कलात्मक व जिवंत भासणार्याच हलत्या मूर्तींची वाहवा झाली व तसा अहवाल भारतात मिळताच, येथील वृत्तपत्रांनीही त्याचा वृत्तान्त स्थानिक वृत्तपत्रांत छापला.

त्यानंतर लगेचच १९२६ मध्ये अमेरिकन स्वातंत्र्याला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या फिलाडेल्फिया येथील भव्य प्रदर्शनात फडके यांच्या हलत्या पुतळ्यांचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाला खूप मोठ्या संख्येने अमेरिकन लोकांनी भेट दिली. शिवाय या प्रदर्शनात फडके यांच्या मेणाच्या हलत्या पुतळ्यांखेरीज त्या काळातले प्रथितयश चित्रकार परांडेकर, हळदणकर व कुळकर्णी यांची चित्रे मांडली होती. या सर्वांचीच खूप वाहवा झाली. बोटीने प्रवास करून हा सर्व कलासंग्रह दूर अमेरिकेत यशस्विरीत्या प्रदर्शित करण्यात इतर कलावंतांसोबतच केशव लेले यांचाही फार मोठा वाटा होता व अशा प्रदर्शनांतून जनसामान्यांच्या मनांत कलाविषयक जाणिवा समृद्ध करण्यासोबत त्यांना संदेश देत असतानाच ज्ञान-शास्त्र सन्मुख करावयाचे असते हे लेले यांना उमगले.

त्यातूनच समाजप्रबोधन, कला व शास्त्रे यांचा विकास होऊ शकतो याची जाणीव त्यांना झाली आणि पुढील काळात ते याच क्षेत्रात कार्यरत राहिले.

त्यांनी १९२७ मध्ये मुंबईतील रामबाग-सी.पी. टँक येथे चित्र-शिल्प व फडके यांच्या मेणाच्या हलत्या व मनोरंजक पुतळ्यांसोबतच कलाकुसरीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. त्या काळी त्याची प्रवेश फी चार आणे होती व हे ‘विविध कला’ प्रदर्शन मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील विशेष घटना ठरली. त्याला वृत्तपत्रांतून भरपूर प्रसिद्धी मिळाली.

पेस्तनजी बोमनजी, धुरंधर, त्रिंदाद, चुडेकर, परांडेकर, हळदणकर, नगरकर, पीठावाला अशा पुढील काळात लोकप्रिय ठरलेल्या चित्रकारांची जलरंग, तैलरंग व पेस्टल या माध्यमांतील चित्रेही, फडके यांच्या मेणाच्या हलत्या पुतळ्यांसोबत महत्त्वाचे आकर्षण ठरली. या सोबतच शिल्पकार म्हात्रे व तालीम यांची शिल्पेही लक्षणीय ठरली. याशिवाय या भव्य प्रदर्शनात स्त्रियांनी केलेल्या कलाकृतींचा विशेष विभाग होता व त्यात चित्रांसोबत, शिवणकाम, भरतकाम, विणकाम अशा कलाकृती होत्या.

केशव लेले यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या या भव्य प्रदर्शनाने सर्वसामान्यांमध्ये कलेची अभिरुची वाढविण्यासोबतच कलावंतांना प्रोत्साहन दिल्याचे व त्यांच्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचविल्याचे मत सर्वच वृत्तपत्रांनी व्यक्त केले. यावरून लेले यांची अंगीकृत कार्यावर अपार निष्ठा व ते कार्य तडीस नेण्याची जिद्द होती हे सिद्ध होते. त्या काळी आधुनिक सोयी नसतानाही, कलावंत अशा प्रदर्शनांसाठी आपल्या कलाकृती विश्वाेसाने सुपूर्त करतील असा विश्वानस कलावंतांच्याही मनांत लेले यांनी निर्माण केला होता हे विशेष! परंतु या प्रदर्शनानंतर लेले व त्यांचे गुरू शिल्पकार र.कृ. फडके यांच्यात व्यवसायेतर कारणामुळे मतभेद निर्माण झाले.

फडके यांनी तत्कालीन प्रसिद्ध कलासमीक्षक बी.जी. हॉर्निमन यांच्या अभिप्रायामुळे त्यांचे कमालीचे लोकप्रिय ठरलेले ‘मेणाच्या हलत्या पुतळ्यांचे’ प्रदर्शन बंद करून पूर्णपणे शिल्पकलेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. फडके आपला निर्णय बदलणार नाहीत याची खात्री पटताच गुरूच्या आशीर्वादाने लेले यांनी आपला स्वतंत्र स्टूडिओ स्थापन करण्याचे ठरविले व त्यांचे नातलग हरी पांडुरंग लेले यांच्याकडून दहा हजार रुपये अल्पव्याजाने कर्जाऊ घेऊन ते झपाट्याने कामाला लागले.

स्वतंत्र स्टूडिओ उभारून त्यांनी नवीन पुतळे तयार केले व कराची शहरात बंदर रोडवर, स्टार सिनेमाशेजारी २२ मार्च १९२८ रोजी ‘लेलेज फाइन आर्ट वर्क्स’ या प्रदर्शनाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे हे प्रदर्शन स्त्रियांसाठी बुधवार व शुक्रवारी दुपारी दोन ते पाचपर्यंत खास उघडे राहील अशी व्यवस्था करण्यात आली होती. तशी वृत्तपत्रांतून प्रसिद्धीही देण्यात आली. स्त्रियांनी त्याचा लाभ घेतला व हे प्रदर्शन यशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी १९२८ च्या अखेरीस आपले हे प्रदर्शन विदर्भ व मध्यप्रांताची राजधानी असलेल्या नागपूरमध्ये भरविले.

त्याबद्दलच्या अभिप्रायात, ‘ही मेणाची हलती चित्रे हुबेहूब साधली असून खरोखरीच माणसेच तेथे बसली आहेत की काय, असा भास होतो’, असे अभिप्राय व्यक्त करण्यात आले. हे मेणाचे पुतळे त्यावर प्रत्यक्ष कपडे घालून सजवीत आणि त्यातील हालचाल यांत्रिक करामतीच्या साहाय्याने मुख्य विषयाला पूरक अशी योजत. त्यातील सफाई व नैसर्गिकता यांसोबतच पुतळ्यांचे रंगकाम, त्यांना लावलेले काचेचे, पण खरे वाटणारे डोळे आणि डोके, दाढी-मिश्यांच्या जागी प्रत्यक्ष केसांचा केलेला वापर यांमुळे हे पुतळे नसून सजीव माणसेच असल्याचा भास निर्माण होई.

प्रदर्शनात तत्कालीन समाजजीवनातील मुंबईचा पाटीवाला हमाल, कचेरीतील पट्टेवाला शिपाई, फळफळावळ विकणारा घाटी दुकानदार, पंचांग पाहणारा ज्योतिषी, मणी विकणारा मुसलमान फेरीवाला अशा दृश्यांसोबतच विश्वा,मित्र-मेनका, कृष्णजन्म असे धार्मिक प्रसंगही असत. याशिवाय तत्कालीन समाजजीवनातील वाईट प्रवृत्तींचा निषेध करणारे ‘सावकारी पाश’ व ‘मद्यपान निषेध’ यांसारखे प्रसंगही असत.

यां सोबतच लोकमान्य टिळकांचे अखेरचे आजारपण, गांधीजींची तुरुंगातील शस्त्रक्रिया, दांडीयात्रा यांसारखे त्या स्वातंत्र्यपूर्वकाळात जनभावनेला आवाहन करून प्रेरणा देणारे प्रसंगही असत. नागपूर येथील प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. नागपूरचे राजे श्रीमंत रघुजीराव भोसले यांनी सुवर्णपदक देऊन लेले यांचा सत्कार केला.

त्यानंतर मद्रास, तंजावर व कुंभकोणमलाही ही प्रदर्शने रसिकांच्या आमंत्रणामुळे गेली व यशस्वी ठरली. मार्च १९३१ मध्ये ‘खादी प्रदर्शन कचेरी’ या संस्थेच्या वतीने कराचीला झालेल्या प्रदर्शनातील लेले यांची हलती चित्रे भलतीच गाजली व त्याला महात्मा गांधींनी दिलेली भेट ही महत्त्वाची घटना ठरली. या प्रदर्शनाची गुणवत्ताच अशी होती, की आयोजक व कार्यकर्त्यांना गांधींजींनी हे प्रदर्शन बघावे असे मन:पूर्वक वाटत होते. त्यानुसार त्यांनी व्यवस्था केली; पण हे जाहीर झाल्यास गांधीजींच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली असती व ती गर्दी आवरणे अशक्य होते, म्हणून २५ मार्च १९३१ रोजी खास बैठक होऊन दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजता गांधीजी प्रदर्शन बघण्यास येतील असे ठरले.

त्यानुसार दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजता विठ्ठलभाई पटेल यांच्या सोबत गांधीजींनी हे प्रदर्शन बघून संतोष व्यक्त केला. विशेषत: त्यातील ‘गांधीजींची शस्त्रक्रिया’ या दृश्यासमोर ते स्तब्ध उभे राहिले व त्यानंतर त्यांच्या चेहर्याीवर निर्मळ हास्य उमटले. यानंतर अभिप्रायाची मागणी करताच गांधीजींनी त्या बदल्यात शिल्पकाराने खादी वापरायची शपथ घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पुढील काळात लेले विशेष प्रसंगी खादीचे कपडे आवर्जून वापरत असत.

याच वर्षी त्यांचा विवाह कुर्ल्याच्या हरी वासुदेव जोशी (चितळे) यांची कन्या अंबू हिच्याशी झाला. लग्नानंतर तिचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर दक्षिण भारतातील त्रिचनापल्ली येथे १९३२ साली काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी झालेल्या ‘ऑल इंडिया स्वदेशी’ प्रदर्शनात लेले यांच्या मेणाच्या हलत्या पुतळ्यांचे प्रदर्शन होऊन ते लोकप्रिय ठरले व त्यांना आयोजकांतर्फे सुवर्णपदक देण्यात आले. त्यानंतर १९३३ मध्ये लेले यांनी कलकत्ता, कुंभकोणम व मदुराई येथील स्वदेशी प्रदर्शनांत स्वत:चे प्रदर्शन भरवून लोकप्रियतेसोबतच आयोजकांकडून सुवर्णपदकाचा सन्मान प्राप्त केला.

यानंतर १९३४ मध्ये मुंबईतील काँग्रेस अधिवेशन, तसेच जळगाव आणि अमृतसरलाही प्रदर्शने भरवली. १९३६ मध्ये काँग्रेसच्या लखनौ येथील व १९३७ साली जळगावमधील फैजपूर अधिवेशनातही त्यांची प्रदर्शने लोकप्रिय ठरली. यानंतर १९३७ मध्ये अहमदनगरच्या स्वदेशी आर्ट अॅण्ड इंडस्ट्रिअल एक्झिबिशन, १९३८ मधील हरिपुरा व १९३९ मधील त्रिपुरी येथील काँग्रेस अधिवेशनांतील त्यांची प्रदर्शने गाजली. याखेरीज १९३१ ते १९३९ या काळात त्यांनी अकोला, अमरावती, अलाहाबाद, आग्र, इंदूर, कानपूर, कोईमतूर, ग्वाल्हेर, त्रिवेंद्रम, राजकोट, सुरत अशा अनेक प्रदर्शनांतून आपली व काही वेळा इतर कलावंतांची कलाही प्रदर्शित केली. त्यांनी १९३९ पासून आपली क्षमता कमी झाली आहे हे लक्षात घेऊन मुंबईबाहेरची प्रदर्शने बंद केली. ते १९४० पासून दरवर्षी मुंबईतील नायगाव, कुर्ला, माहीम, प्रभादेवी, वांद्रे या ठिकाणी जत्रा, उरूस या निमित्ताने आपली प्रदर्शने भरवीत असत.

डिसेंबर १९४४ मध्ये प्रभादेवी येथील जत्रेला सुरुवात झाली व त्यामध्ये लेले यांचे प्रदर्शन होते. तब्येत बरी नसतानाही त्यांनी ते मांडले. सुरुवातीला ते हजर असत; पण हळूहळू ते थोडा वेळ थांबून घरी परतू लागले. प्रदर्शनांच्या आयोजनाचा व्याप प्रचंड असला तरी अल्पशिक्षित पत्नीने त्यांच्या प्रदर्शनांचा व्यवसाय चालू ठेवला व १९४६ ते १९५१ या काळात मुंबई व मुंबईबाहेर प्रदर्शने भरवली. कालांतराने या मेणाच्या शिल्पाकृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या.

शिल्पकार र.कृ. फडके यांनी सुरू केलेल्या व केशव लेले यांच्या अशा प्रदर्शनांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांची यथार्थदर्शी वास्तववादी कलेप्रती असलेली अभिरुची वाढवली. त्यातूनच कलेच्या विविध शैलींतील प्रगल्भतेऐवजी आजही महाराष्ट्रात याच प्रकारच्या यथार्थदर्शी कलेचा प्रभाव आढळून येतो. आजच्या महाराष्ट्राला ही मेणाच्या हलत्या पुतळ्यांची प्रदर्शने व ती घडविणारे कलावंत अज्ञात आहेत.

केशव बाबूराव लेले यांचे निधन ५ जानेवारी १९४५ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..