धातू हे सामान्यपणे वातावरणात घन स्वरूपात आढळतात. त्यांचे रंग वेगवेगळे असतात, पृष्ठभाग चकाकणारा असतो, स्पर्शाला थंड लागतात, उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात आणि त्यांच्यापासून पातळ पत्रे आणि लांब तारा बनवता येतात. पृथ्वीवर आतापर्यंत ८६ धातू शोधले गेले.
माणसाला धातूंची माहिती साधारणपणे इ.स.पूर्व. ६००० वर्षांपासून आहे. परंतु सतराव्या शतकापर्यंत, म्हणजे जवळजवळ ७५०० वर्षे मानवाला फक्त १२ धातूंची माहिती होती. यातले आर्सेनिक, अँटिमनी, जस्त आणि बिस्मथ यांचा शोध तेराव्या आणि चौदाव्या शतकात लागला. तर फ्लॅटिनम सोळाव्या शतकात धातुरूपात वेगळे केले गेले. उरलेले सात धातू प्राचीन काळापासून माहिती होते.
सोने- इ.स. पूर्व ६०००, तांबे – इ.स.पूर्व ४२००, चांदी- इ.स. पूर्व ४०००, शिसे- इ.स.पूर्व ३५००, कथील- इ.स.पूर्व १७५०, लोखंड- इ.स.पूर्व १५०० आणि पारा- इ.स.पूर्व ७५०. मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीक, रोमन, भारतीय आणि चिनी या सगळ्या जुन्या संस्कृतींनी या धातूंचा वापर दागिने, -अवजारे आणि शस्त्रे या गोष्टींसाठी केला.
धातूंच्या वापराची सुरुवात सोने आणि तांबे या ‘धातूंपासून झाली कारण हे दोनच धातू पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या शुद्ध स्वरूपात सापडत असत. तांब्याच्या खनिजापासून तांबे मिळविण्याच्या प्रक्रियचा शोध पश्चिम आशियात इ.स.पूर्व ४०००च्या सुमारास लागला.
गॅलेना किंवा लेड सल्फाईड या खनिजांचे क्षपण करून शिसे आणि थोड्या प्रमाणात चांदी हे दोन धातू मिळतात. शिशाचा वापर इ.स. पूर्व ३५०० पासून तर चांदीचा वापर इ.स.पूर्व २५०० पासून सुरू झाला. कॅसिटेराइट या खनिजापासून धातू स्वरूपात कथील (टीन) बनवायला इ.स.पूर्व २००० पासून पश्चिम आशियात सुरुवात झाली. कथील तांब्यात मिसळून तयार होणारे ब्राँझ हे संमिश्र तांब्यापेक्षा कठीण असते. त्यामुळे कथिलाच्या शोधानंतर ब्राँझ युगाला सुरुवात झाली.
सामान्य तापमानाला द्रव स्वरूपात असणारा पारा हा एकमेव प्राचीन धातू आहे. कॅलोमेल या खनिजापासून ऊर्ध्वपातनाने पारा मिळवता येतो. पाऱ्याचा वापर इ.स.पूर्व ७५० पासून सुरू झाला. पारा विषारी असून त्याच्या वाफा हानीकारक असतात.
Leave a Reply