आम्ही दोघे रात्री बारा वाजता शिडीने कौलावर चढलो व शेजारच्या वाड्यात बघू लागलो. शुभ्र चांदणे असल्यामुळे सगळे नीट दिसत होते. खणण्याचे आवाज जोरात येत होते पण बाकी काहीच दिसत नव्हते. अशी पाचेक मिनिटे गेली असतील आणि अचानक एक गाईचे पांढरे वासरू या खोलीतून त्या खोलीत जाताना दिसले. आता इतक्या रात्री वासरू तिथे येणे शक्यच नव्हते. आमच्या दोघांच्या अंगावर सरसरून काटा आला. खरे तर आमची बोबडी वळली होती.
झाली असतील पन्नास एक वर्षे त्या गोष्टीला. त्यावेळी माझे वडील शिक्षण खात्यात नोकरीला होते. दर तीन ते पाच वर्षांनी त्यांच्या महाराष्ट्रात कुठेही बदल्या होत असत. त्यावेळी म्हणजे मी नववीत असताना बाबांची बदली कोंकणात सावंतवाडी गावी झाली. वडिलांकडे शाळा तपासणीचे काम असे. म्हणजे आम्ही नगर जिल्ह्यातून एकदम सावंतवाडी येथे राहण्यास गेलो होतो.
नवीन गाव, नवीन जागा बघणे आले. वडिलांनी आणि आईने मिळून सावंतवाडीतील उभा बाजार म्हणून एक भाग आहे. तिथे एक जागा पसंत केली. खानोलकर म्हणून घरमालक होते. त्यांचे स्वत:चे मेडिकल कम कटलरी असे दुकान बाजारपेठेत होते. भाडं इतर जागांपेक्षा कमी वाटले म्हणून बाबांनी ती जागा पसंत केली. घरमालक शेजारीच राहायचे. आमच्या पलीकडे एक घर होते. पण तिथे कुणी राहायचे नाही. चिऱ्याच्या भिंती होत्या पण कुणीच रहात नसल्यामुळे ते घर ओसाड वाटायचं. आमचे घर आणि ते घर यात जेमतेम तीन फुटांचे अंतर असेल. त्यावेळी स्लॅबची पद्धत नव्हती त्यामुळे सगळी घरे कौलारू असत. बाबांनी घर मालकांकडे त्या जागेची सहज म्हणून चौकशी केली, तर त्यांनी सांगितले त्या घराचे मालक मालक राजे म्हणून आहेत. ती सर्व मंडळी गेल्या दोन पिढ्या मुंबईत राहतात. त्यांना इथे परत येण्याची अजिबात इच्छा नाही. अपेक्षित किंमत येत नाही म्हणून विक्रीचा व्यवहार होत नाही.
आम्ही तिथे राहू लागलो. आजूबाजूची हिरवाई पाहून आई-बाबा मी आणि माझा धाकटा भाऊ अनिल खुश झालो. आम्हाला वडील शिक्षण खात्यातच असल्यामुळे शाळेत प्रवेश सहज मिळाला. वडील नोकरीमुळे सतत फिरतीवर असत. मी आणि भाऊ नरेंद्र डोंगर, माणगाव, अगदी जवळ असलेली ठिकाणे पायी फिरत असू. वर्गातील मुले आपसात मालवणीत बोलत असत. त्यातले चेडवा, झील, खयसून असे कितीतरी शब्द आम्हाला कळत नसत. दिवस असे मजेत चालले होते. आणि हळूहळू आम्हाला रात्रीच्या वेळी शेजारच्या राजेंच्या घरात कुणीतरी जमीन खणत असल्याचे आवाज येऊ लागले. त्यावेळी पौर्णिमा जवळ येत होती आणि दिवसेंदिवस ते आवाज वाढू लागले. रात्री बाराच्या सुमारास ते आवाज भीतिदायक वाटावेत एवढ्या मोठ्याने येत असत. घरमालक मात्र या बाबतील ताकास तूर लागू देईनात. त्यावेळी आमच्याकडे हिरा नावाची मोलकरीण कामाला होती. एक दिवस आईने हिराकडे हा विषय काढला. पहिल्यांदा हिरा काहीच बोलेना. आईने खोदून खोदून विचारल्यावर हिराने त्या शेजारच्या जागेविषयी एक विचित्र गोष्ट सांगितली.
त्या जागेत पूर्वीपासून राजे कुटुंब रहात होते. मोठा भाऊ शाळेत मास्तर होता आणि धाकटा मिलिटरीत होता. मिलिटरीतला भाऊ दर महिन्याला जवळ जवळ सगळा पगार मोठ्या भावाला पाठवीत असे. ते पैसे निवृतीनंतर उपयोगी पडतील असे त्याचे नियोजन होते. पंधरा वर्षानंतर तो मिलिटरीतून निवृत्त होऊन घरी आला व पाठविलेले पैसे मोठ्या भावाला मागू लागला. मोठ्या भावाने सर्व पैसे कुटुंबासाठी खर्च झाले असे सांगून कानावर हात ठेवले. तो कुठला हिशोबही देईना. धाकट्याचा राग अनावर झाला. त्याने समोरच्या दगडावर डोके आपटले व रक्तस्राव होऊन त्याचा अंत झाला. काही दिवसांनी घरात जमीन खणण्याचे आवाज येऊ लागले आणि काहीवेळा खरोखर एकेका कोपऱ्यात जमीन उकरल्याचे दिसू लागले. आपल्या भावाचे भूतच हे करते आहे या कयासाने मोठा भाऊ कुटुंबासहित मुंबईला निघून गेला. तेव्हापासून त्या घरात कुणीही रहात नाही. ते घर कुणी विकतही घेत नाही. मोठ्या भावाने पाठविलेले पैसे सोनेरूपात जमिनीत पुरून ठेवले असतील व ते खणून शोधण्याचा प्रयत्न धाकटा भाऊ भूतरूपाने येऊन करतो अशी वदंता आहे. अमावास्या आणि पौर्णिमा जवळ आली की खणण्याचे आवाज वाढत जातात आणि नंतर काही दिवस शांत असते.
ही वदंता ऐकल्यावर आम्ही सगळेच हादरलो. आणि जागा बदलायचे विचार करू लागलो. पण घरमालक वडिलांना म्हणाले, ‘तुम्ही काळजी करू नका. आवाज येतात हे जरी खरे असले तरी त्याचा इतर त्रास कुणालाही झालेला नाही त्यामुळे निश्चिंत रहा . शिवाय आपण आज विज्ञान युगात वावरतो आहोत. असल्या भाकडकथांवर किती विश्वास ठेवायचा?’ तसं तर खरोखर दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या आवाजाव्यतिरिक्त आम्हाला काही त्रास नव्हता. पण खणण्याचे आवाज का व कसे येतात ही उत्सुकता होती. एका पौर्णिमेला वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले असतांना आम्ही दोघा भावंडांनी आईला विश्वासात घेऊन सांगितले की आम्ही दोघे शिडीने कौलावर चढून काही दिसतं आहे का ते पाहतो. आईला पण उत्सुकता होतीच, तिने नाखुशीने का होईना परवानगी दिली. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे रात्री बारा वाजता शिडीने कौलावर चढलो व शेजारच्या वाड्यात बघू लागलो. शुभ्र चांदणे असल्यामुळे सगळे नीट दिसत होते. खणण्याचे आवाज जोरात येत होते पण बाकी काहीच दिसत नव्हते. अशी पाचेक मिनिटे गेली असतील आणि अचानक एक गाईचे पांढरे वासरू या खोलीतून त्या खोलीत जाताना दिसले. आता इतक्या रात्री वासरू तिथे येणे शक्यच नव्हते आणि त्याच्या अगोदर कुणी जनावर तिथे दिसले नव्हते. आमच्या दोघांच्या अंगावर सरसरून काटा आला. खरे तर आमची बोबडी वळली होती. भूत भूत हे शब्द सुद्धा तोंडातून बाहेर पडत नव्हते. कसेतरी शिडीवरून धडपडत खाली आलो आणि आईला सगळे सांगितले. आईने पाणी प्यायला दिले. दोघांच्या डोक्यावर हात फिरवत राहिली व आम्ही झोपी गेलो.
सकाळी आम्हाला दोघांना सणसणून ताप भरला होता. सुदैवाने दोन दिवस डॉक्टरचे औषध घेतल्यावर बरे झालो. वडील परत आल्यावर आम्ही ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेलो. नंतर सहा महिन्यांनी वडिलांची बदली पुण्याला झाली व आमचे सावंतवाडी कायमचे सुटले. आता आम्हाला दिसले ते खरे की भास हे सांगता येत नाही. मात्र त्या सहा महिन्यात आम्ही त्या घराच्या आसपासही फिरकलो नाही. आता ते घर तसेच आहे की पाडून नवीन बांधले गेले याची कल्पना नाही. पुढच्या महिन्यात गाडीने गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. तेव्हा सावंतवाडीला थांबून ते घर पाहावे अशी इच्छा आहे. बघा कंपनी म्हणून येत असाल तर चला, जरा वेगळे साईट सीईंग.
–अनंत जोशी
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply