जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १०८
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – १२
निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग २
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आपल्यासाठी हितकर काय आहे आणि अहितकर काय आहे, हे एकतर वैद्यबुवा सांगतील किंवा आपले स्वतःचे शरीर सांगेल. तसंच करावं. इतर कोणाचंही ऐकू नये. याचा अर्थ मनमानीपणा नव्हे. पण बिनधास्त खावं बिनधास्त फिरावं. खाताना भीती नको, खाल्ल्यानंतर खाल्लेल्याची आठवण नको. पावसात भिजताना सर्दीची आठवण नको. सर्दी झालीच तर रडतराहूपणा नको. सतत वर्तमानातील आनंद घेत राहवे.
उत्तम प्रकृती मिळवण्यासाठी उत्तम समीक्षा करता यायला हवी. या परिस्थितीमधे योग्य काय अयोग्य,काय हे समजावून घ्यायला हवे. जे आपल्याला अनुकुल नाही, ते सोडून न देता, ते अनुकुल करवून घेणारा हवा. शिवरायांसारखा !
विषयवासनांवर विजय मिळवायला हवा. काम ही मूळ भावना आहे. एक पुरूषार्थ आहे. त्याचा योग्य तो मान राखायलाच हवा. त्याला टाळून चालणार नाही. पण त्याला युक्तीने संयमाचा लगाम घालायलाच हवा. विषयाला सोडून देणे म्हणजे स्वैराचार !
केवळ कामविषयच नाही तर क्रोध, मद मोह, मत्सर, दंभ आदि षड रिपुना देखील संयमात ठेवायला हवे. आणि हे नित्य करायला हवे असे वाग्भटजी म्हणत आहेत.
एक दिवस विठोबा बाकी मात्र पोटोबा
एक दिवस शिवाचे शौर्य आणि इतर दिवस रूद्राचे क्रौर्य
एक दिवस मांडव आणि बाकी दिवस तांडव,
एक दिवस आपलेपणा आणि बाकी दिवस ‘मी’ पणा,
एक दिवस उपासाचा आणि बाकी दिवस चरण्याचा
एक दिवस संयमाचा आणि बाकी सुटण्याचा
एक दिवस ‘काय खाऊचा’ आणि बाकी दिवस ‘कायकाय खाऊचा’
एक दिवस पोटासाठी, बाकी दिवस फोटोसाठी.
असं करून चालणार नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीमधे सातत्य हवे, त्याची सवय लागायला हवी….
अंतिम समयी हवे जर देवाचेच नाव ओठी, तर त्याचीही जिभेला सवय हवी मोठी
विषयांच्या आधीन होणे म्हणजे मनाचे संतुलन घालवणे आणि विषयावर संयम ठेवणे म्हणजे मनाची ताकद वाढवणे. म्हणजेच मनाला स्वस्थ ठेवणे. मनात येणारे सर्व विचार नियंत्रणात ठेवणे हे मानसिक आरोग्य सांभाळून ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
मन म्हणजे सर्व हार्मोन्स! आज पीसीओडी, थायराॅईड सारखे सोकाॅल्ड व्याधी हार्मोन्सचे असंतुलन झाल्याने होत आहेत. यासाठी केवळ आयुष्यभर गोळ्या खाणे म्हणजे एक अंधश्रद्धाच आहे. ज्या गोळ्या केवळ पोटात जातात, पण मनापर्यंत कधीच पोचत नाही.
ज्या मनाचा, अथपासून इतिपर्यंत विचार केवळ आयुर्वेदच करू शकतो. त्या आयुर्वेदाला पूर्ण समर्पित झाल्याशिवाय संपूर्ण स्वास्थ्य मिळणे शक्य नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply