सीतारादेवी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० रोजी कोलकता येथे झाला. त्यांचे मूळ नांव धनलक्ष्मी असे होते. त्यांचे वडील सुखदेव महाराज हे नेपाळच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार होते. त्यांची आई मत्स्यकुमारी ही नेपाळच्या राजगुरूंची मुलगी होती. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव अलकनंदा आणि तारा . तारा या पं . गोपीकृष्ण यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या समवेत सीतारादेवी यांनी नृत्याचे शिक्षण घेतले. त्यांना गुरु म्ह्णून त्यांच्या वडिलांनी म्हणजे सुखदेव महाराज यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी उच्च समाजातील मुलींनी नृत्य करणे अमान्य असल्यामुलें त्यावेळच्या समाजाने त्यांच्या कुटूंबावर बहिष्कार टाकला होता. परंतु या बहिष्काराला न जुमानता त्यांच्या वडिलांनी म्हणजे सुखदेव महाराज यांनी त्यांच्या मुलींना नृत्याचे शिक्षण दिले. त्यांचे वडील त्यांच्याकडून रोज दहा ते बारा तास नृत्य करवून घेत , ते शिस्तीचे खूप कडक होते. परंतु मुलींचे नाचून झाले की प्रेमाने त्यांच्या पायाला तेलही चोळत होते. त्यांचे मन खरेच प्रेमळ होते , साधना करण्यासाठी जी ताकद लागते त्यासाठी ते त्यांच्या मुलींना पौष्टिक , शक्ती येण्यासाठी योग्य आहार त्यांच्या मुलींना देत असत. त्यांच्या कडक शिस्तीमुळे सितारादेवी यांना साधनेची आवड निर्माण झाली .
सितारदेवी पण स्वतः खूप परिश्रम करीत असत , पायाची ताकद वाढवण्यासाठी त्या तासनतास समुद्राच्या रेतीमध्ये तत्कार करीत असत. असे म्हणतात की सितारादेवी यांचे लग्न वयाच्या ८ व्या वर्षी झाले होते परंतु त्या शाळेत जात असल्यामुळे हे लग्न मोडले . त्यांचे शिक्षण तेथील ‘ कामछगढ़ हाई स्कूल ‘ मध्ये झाले. त्यांच्या शैलीत त्यांनी सत्यवान , सावित्री यांच्या पौराणिक नाटकीकेमध्ये त्यांनी सुंदर नृत्य केले त्यामुळे त्यांना त्यांच्या शाळेमधील त्यांच्या बरोबरील कलाकारांना नृत्य शिकवण्याची संधी लहानपणीच मिळाली.
सितारादेवी यांना त्यांचे वडील पं. सुखदेव महाराज यांच्याबरोबच कथक नृत्यात श्रेष्ठ असणारे पं. लच्छू महाराज आणि त्यांचे बंधू पं . शम्भू महाराज यांच्याकडेही नृत्य शिकण्याचे भाग्य लाभले. या दोन श्रेष्ठ बंधूच्या नृत्यामधील तडफ आणि चमक सितारादेवी यांच्या नृत्यात दिसून येते. चित्रपट निर्माते निरंजन शहा यांना त्यांच्या चित्रपटात नृत्यांगनेची गरज होती तेव्हा त्यांना कुणीतरी सीतारादेवी यांचे नृत्य बघा म्ह्णून सल्ला दिला त्यांनी त्यांचे नृत्य बघीतले आणि त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. परंतु सितारादेवी यांच्या वडिलांना ते मान्य नव्हते. तरीपण निरंजन शर्मा यांनी त्यांची समजूत घातली आणि सितारादेवी , त्यांची आई आणि बुआ यांना ते घेऊन मुंबईला आले . त्यानंतर त्यांनी काही चित्रपटात कामे केली.
सितारादेवी यांनी कथक नृत्यशिवाय भरतनाट्यम , मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीचा अभ्यास केला . लोकनृत्य , परदेशी नृत्याची देखील त्यांना आवड होती. त्याचप्रमाणे त्यांना मैदानी खेळ , पोहणे यांचीही आवड होती. त्यांचे व्यक्तीमत्व खूप वेगळे होते त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतही स्वतःची छाप पडली होती. नर्तिका म्ह्णून त्यांनी चित्रपटात कामे केली तसेच अभिनयातही त्या उत्तम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिकाही साकारायला मिळाली. मोठमोठया कलाकारांचा सानिध्य त्यांना लाभले त्यामध्ये पं .रविशंकर , उस्ताद अल्लारखाँ , बडे गुलाम अली खाँ यांनी सीतारादेवी यांच्या नृत्याचे कौतुक केले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून ‘ क्वीन ऑफ कथक डान्स ‘ ही उपाधी त्यांना मिळाली. त्यांनी १९६९ मध्ये ‘ बिर्ला मातोश्री ‘ सभागृहात सतत बारा तास नृत्य करण्याचा विक्रम केला. मला आठवतंय त्यांनी ठाण्याला ‘ गडकरी रंगायतन ‘ मध्ये एक अप्रतिम नृत्य केले होते त्यावेळी त्या फक्त बहात्तर वर्षांच्या होत्या. त्यांची त्यावेळची नृत्यातील चपळता आणि हावभाव इतके अप्रतिम होते की त्याचे वर्णन करणे अशक्य होते. त्यांचे पहिले लग्न प्रसिद्ध फ़िल्म निर्देशक के .आसिफ़ आणि दुसरे लग्न प्रदीप बरोट यांच्याशी झाले.
सितारादेवी यांना भारत सरकारने १९७० मध्ये ‘ पद्मश्री ‘ देऊन त्यांचा सन्मान केला त्याचप्रमाणे त्यांना १९९५ साली ‘ कालिदास सन्मान ‘ देखील मिळाला. १९९१ मध्ये त्यांना ‘ शिखर सम्मान ‘ मिळाला तर २००६ मध्ये त्यांना ‘ पद्मभूषण ‘ देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला.
सीतारादेवी यांनी ‘ शहर का जादू ‘ , ‘ नगीना ‘, ‘ बागबान ‘, ‘ वतन ‘ , ‘ मेरी आंखें ‘ , ‘ होली ‘, ‘ पागल ‘, ‘ स्वामी ‘ , ‘ रोटी ‘ , ‘ चांद ‘ , ‘ लेख ‘ , ‘ हलचल ‘ मदर इंडिया , पूजा , भगवान या चित्रपटात कामे केली होती. तर काही चित्रपटांसाठी ‘ कोरिओग्राफी ‘ ही केली होती. सीतारादेवी यांचा मृत्यू २५ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबईत झाला.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply