नवीन लेखन...

आत्मनिर्भरता

परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे. आजकाल भारतातल्या भारतातही मुलं अंतरतात. नोकरी निमित्ताने काही जण पुणे, मुंबई, बंगलोर, कलकत्ता, दिल्ली येथे जाऊन सेटल होतात. त्यात काय चूक किंवा काय बरोबर याहीपेक्षा मी म्हणेन की पुढचा विचार करायला हवा. समजा आपला मुलगा किंवा मुलगी आर्मी-नेव्ही-एअर फोर्स मध्ये असते तर? देशांच्या सीमांवर संरक्षण करण्यात ते गुंतले असताना एक आई किंवा बाप म्हणून आपली छाती अभिमानाने भरून येतेच की! महिनोन्महिने मुलं तिथे देशाच्या संरक्षणासाठी झटत असतात. आई-वडील इथे एकटेपणाशी झटत असतात. थोडक्यात काय, आयुष्यात झगडत राहिलात तर आयुष्य जगता येतं, हार मानून शांत बसलात तर मग संकटांची मालिका समोर दिसायला लागते. प्रत्येक आई-वडिलांनी गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल करताना आपल्या भविष्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशोब मांडून पाहायला हवा. आजकाल मुलं प्रचंड हुशार आणि कर्तृत्वान झाली आहेत, त्यांना आकाशात उंच झेप घेताना पहायची असेल तर ते घरट्याकडे परततील अशी अपेक्षा ठेवणं आधी बंद करायला हवं. येणारे येतील, जाणारे जातील आपण आपल्या जीवनसाथीसोबत आणि खरं तर त्यांच्याकडूनही कसलीच अपेक्षा न करता कशा पद्धतीने जीवन जगू शकतो याचा विचार करायला हवा. प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, स्वतंत्र विचारांचा आहे आणि स्वतंत्र संस्कारात वाढलेला आहे. त्यामुळे आयुष्य जगत असताना एक गोष्ट आपण स्वतःच्या मनाला बजावली पाहिजे की, आपण आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कुणावरही अवलंबून राहता कामा नये. आयुष्यभर आपण इतरांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी धडपड करत असतो, जी धडपड एके काळी आपल्यासाठीही कुणीतरी केलेली असते. आपण उभारलेली माणसं पुढे दुसर्या कुणासाठी तरी जगणार असतात. त्यामुळे वयाच्या एका ठराविक टप्प्यावर जसं आहे तसं आणि जे आहे त्यात जीवनाचा सर्वाधिक आनंद आपण शोधायला हवा. निरोगी जीवन जगायला हवं. टेन्शन हे सर्व व्याधींचं मूळ आहे. त्यामुळे टेन्शन फ्री जगता येण्यासाठी जे जे शक्य ते ते करायला हवं. खर्या अर्थाने आत्मनिर्भर व्हायला हवं. ज्येष्ठांसाठी आजकाल कम्युनिटी लिव्हिंग सारख्या कल्पना प्रत्यक्षात येताहेत. आयुष्याच्या या सांजवेळी तरी आपण आपला आनंद शोधायला हवा. शोधलं की सापडतंच!

–नयना आपटे

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..