रईस खान यांच्या मातोश्री उत्तम गायिका होत्या व वडील उत्कृष्ट बीनवादक होते.त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३९ रोजी इंदौर मध्य प्रदेश येथे झाला.मामा इनायत खान मेवात घराण्याचे पट्टीचे गायक होते. रईस खान यांनी तर अगदी बालवयात सूर आणि स्वर यावर इतके प्रभुत्व मिळविले होते की, मुंबईच्या सुंदराबाई हॉल मध्ये त्यांनी, मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर महाराज सिंह यांच्या समोर आपल्या कलेचे पहिले जाहीर सादरीकरण केले तेव्हा ते केवळ आणि केवळ पाच वर्षांचे होते. १९५५ साली पोलंड देशातील ‘ वॉर्सा ‘ या राजधानीच्या शहरात संपन्न झालेल्या यूथ फेस्टिव्हल साठी त्यांची निवड होऊन त्यांनी तिथे आलेल्या देशोदेशीच्या शंभराहून अधिक तंतु-वादकांमध्ये सर्वोत्तम वादन करून, भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तेव्हाही ते फक्त आणि फक्त सोळा वर्षांचे होते. ते उत्तम रागदारी गात असत परंतु ते जगभर विख्यात झाले ते त्यांच्या सतार वादनामुळे. त्यांनी आपल्या सतारवादनाची साथ अनेक दिग्गज हिंदुस्थानी गायकांना केली होती. बिस्मिल्ला खान, हरिप्रसाद चौरसिया, एल. सुब्रह्मण्यम यांच्या बरोबर त्यांची जुगलबंदी गाजलेली होती.
पाकिस्तानी गायिका, बिल्किस खातूम, यांच्याशी लग्न केल्याने ते पाकिस्तानातील कराची शहरात राहत असत. तेथे त्यांनी आपली मूळची इंदौरी मेवात घराण्याची गायकी जपली होती व हिदुस्थानी रागदारी पाकिस्तान मध्ये पोहचवण्याचे काम केले. पाकिस्तानात वास्तव्य असतानाही ते भारतीय चित्रपट -संगीताशी समरस झालेले होते. संगीतकार मदन मोहन हे त्यांचे खास मित्र होते. मा.मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटातल्या गाण्याना रईस खान यांनी सतारीचा स्वरसाज चढविला आहे. १९६४ च्या ” पूजा के फूल ” या चित्रपटातले लता मंगेशकर यांच्या आवाजातले गाणे, ” मेरी आँखों से कोई नीन्द लिये जाता है ” या गाण्याला रईस खान यांच्या सतारीची साथ आहे. अगदी अलीकडचा, ” गॉड तूसी ग्रेट हो ” असो अथवा आणि साजिद -वाजिद या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेला ” पार्टनर ” चित्रपट असो, रईस खान यांच्या सतारीचे स्वर त्यातल्या गीताना होते. उस्ताद रईस खान यांचे काल ६ मे २०१७ रोजी कराचीतच निधन झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply