भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे यांचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी झाला.
राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.
वसुंधरा राजे या राजमाता विजयाराजे शिंदे आणि महाराजा जयाजीराव शिंदे यांच्या कन्या आहेत. शिंदे याच आडनावाला मध्य प्रदेशात शिंदिया असंही संबोधतात. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत जयाजीराव ग्वालियरचे राजे होते. मध्य भारतचा मध्य प्रदेशमध्ये समावेश होईपर्यंत त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. 1962 मध्ये राजमाता विजयाराजे शिंदे पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेल्या आणि ही शिंदे घराण्यातील राजकारणातील एंट्री ठरली. काँग्रेस पक्षाच्या त्या पहिल्या सदस्य होत्या आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ते १९७१ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. २००१ साली माधवरावांचं एका अपघातात निधन झालं आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजकीय वारसा सांभाळला.
राजमाता विजयाराजे यांच्या दोन्ही मुली भाजपमध्येच राहिल्या. वसुंधरा राजे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवलं होतं. तर यशोमती राजे या मध्य प्रदेशच्या राजकारणात होत्या. २००३ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी वसुंधरा राजे राज्याच्या राजकारणात परतल्या.
वसुंधरा राजे पहिल्यांदा २००३ साली मुख्यमंत्री बनल्या आणि राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनी मिळवला.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply