ज्येष्ठ बालशिक्षणतज्ञ गणेश हरी पाटील उर्फ ग. ह. पाटील यांचा जन्म १९ ऑगस्ट १९०६ रोजी झाला.
ग. ह. पाटील हे लहान मुलांना आवडणाऱ्या कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी!
‘कळीचे फूल झालेले पाहणे व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे यासारखे सुंदर व मनोहर दृश्य नाही,’ असं ते म्हणत असत.
केशवसुतांनी म्हटल्यानुसार ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा बाणा कवीचा असे’ हे पूर्णपणे उमगलेले पाटील यांनीसुद्धा मुलांचं भावविश्व समजून उमजून कविता रचल्या.
वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ’बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली होती. ग.ह. पाटील शिक्षणतज्ज्ञही होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत असत. ‘पाखरांची शाळा’ या कविता संग्रहाला केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता.‘लिंबोळ्या’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने,बालसाहित्यासाठी ग.ह.पाटील यांच्या नावाचा पुरस्कार, कवींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू केला होता. ‘छान किती दिसते फुलपाखरू..’ ; ‘देवा तुझे किती सुंदर आकाश…’; ‘पाखरांची शाळा भरे पिंपळावरती…’ आणि ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो…’ यांसारख्या त्यांच्या सुंदर कविता आजही बहुतेकांच्या ओठांवर असतील. ‘शर आला तो धावुनी आला काळ; विव्हळला श्रावणबाळ’ सारखी हृदयाला भिडणारी कविता त्यांचीच!
बालशारदा, रानजाई, पाखरांची शाळा, लिंबोळ्या, एका कर्मवीराची कहाणी, आधुनिक शिक्षणशाळा, गस्तवाल्याची गीते ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
ज्येष्ठ लेखिका डॉ.मंदा खांडगे कविवर्य ग.ह. पाटील यांच्या कन्या होत.
ग.ह. पाटील यांचे १ जुलै १९८९ रोजी निधन झाले.
ग.ह. पाटील यांच्या प्रसिद्ध आणि मुलांच्या आवडत्या कविता.
अबलख वारूवरी बैसुनी येती हे पाटिल । भरजरी । शिरीं खुले मंदिल; डरांव डरांव, डरांव डरांव… का ओरडता उगाच राव?”; देवा तुझे किती सुंदर आकाश; पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती; फुलपाखरू छान किती दिसते; माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिलार्या बैलाची जोडी हो इ.
ग.ह.पाटील यांची पुस्तके : गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता (संकलन, संपादिका मंदा खांडगे); पाखरांची शाळा (बाल कवितासंग्रह); बालशारदा (गद्य); लिंबोळ्या (काव्यसंग्रह) इ.
Ya kavichya kavita amar ahet