ज्येष्ठ वृत्तनिवेदक सूत्रसंचालक यांचा जन्म ९ नोहेंबरला झाला.
गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. भाषेचे संस्कार लहानपणापासूनच घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठय़ पुस्तकांबरोबरच अन्य अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन होतेच. पण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठय़ा आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. ‘विष्णुसहस्रनाम’ही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि ‘आवाज’ घडायला त्याची मोलाची मदत झाली.
‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून सुरवातीला काही काळ नोकरीही केली. मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ मध्ये सुरू झाले आणि १९७४ च्या डिसेंबर महिन्यात ते वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.
प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते. त्या कामातील साचेबद्धपणाचा कंटाळा आल्याने आणि स्वत:च्या ‘आवाजा’वर आर्थिक प्राप्ती करता येईल याचा आत्मविश्वास असल्याने त्यांनी त्या काळात नोकरी सोडण्याचे धाडस केले. पत्नी सुजाता यांनीही भिडे यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वत:ची एक इमारत होती. तिथे त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ, निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसविला आणि स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती, माहितीपट-लघुपट यावर आपला ‘आवाज’ ठसविला.
प्रदीप भिडे यांनी आत्तापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपट यांना ‘आवाज’ दिला असून सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदन केले आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला.
शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा १९९५ मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेही काही जाहीर कार्यक्रम आणि अशा अनेक महत्त्वाच्या राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले आहे. प्रदीप भिडे यांचा खार येथे प्रियंका स्टुडिओ आहे.
ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे ७ जून २०२२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply