ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३८ रोजी मेहसाणा गुजराथ येथे झाला.
वासूदेव जगन्नाथ परांजपे क्रिकेट जगतात वासू परांजपे या नावाने प्रसिद्ध होते.
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते. सुनील गावसकरांना सनी हे त्यांनी टोपननाव दिले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे हे वडील आहेत. मुंबई आणि बडोद्याकडून २९ फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या वासु परांजपे यांनी २९ सामन्यांमध्ये ७८५ रन्स केल्या ज्यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या व्यतिरीक्त गोलंदाजीत परांजपेंच्या नावावर ९ विकेट जमा आहेत. परांजपे यांनी नंतर त्यांचे सर्व आयुष्य क्रिकेट प्रशिक्षणासाठी वेचले होते. त्यांनी काही काळासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सांभाळली होती. मोठा क्रिकेटपटू ओळखण्याची नजर त्यांच्याकडे होती. त्यांनी राहुल द्रविडला वयाच्या १४ व्या वर्षीच तू भारताकडून खेळणार आहे. पण त्याकरिता विकेटकिंपिंगपेक्षा बॅटींगवर अधिक फोकस कर, असा सल्ला देखील दिला होता.परांजपे यांचा हा सल्ला द्रविडने अंगी करून घेतला. त्यानंतर पुढे जे घडले, तो इतिहासच घडला.
भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माच्या कारकिर्दीतही परांजपे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. वानखेडे स्टेडियमवर १७ वर्षांखालील क्रिकेट शिबिर सुरू होते. ३० संभाव्य खेळाडूंपैकी १५ जणांची संघात निवड होणार होती. रोहित नेट्समध्ये फलंदाजी करत होता. वासू परांजपे हे रोहितची फलंदाजी पाहत होते. त्यावेळी त्यांनी संघाच्या कर्णधाराला जाऊन रोहित संघात असायला हवा, असे सांगितले. तेव्हा प्रशांत नाईक संघाचा कर्णधार होता. प्रशांत तेव्हा रोहितला ओळखतही नव्हता, त्याने रोहितला वासू सरांनी त्याच्याशी केलेली चर्चा सांगितली होती. वासू परांजपे यांच्या आग्रहाखातर रोहित पुढचे सामने खेळला आणि त्यांची दूरदृष्टी आज सर्वांसमोर आहे.
जतीन परांजपे हे त्यांचे सुपुत्र होत, ते स्वतःही रणजी खेळाडू असून, ते काही काळ राष्ट्रीय निवड समितीत होते.
सप्टेंबर २०२० मध्ये जतीन परांजपे यांनी वासू परांजपे यांच्या जीवनावर पुस्तक लिहिले असून त्या पुस्तकाचे नाव आहे…Cricket Drona. For the love of Vasoo Paranjape.
वासू परांजपे यांचे ३० ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply