ज्येष्ठ समालोचक सुरेश सरैया यांचा जन्म २० जून १९३६ रोजी मुंबई येथे झाला.
सुरेश सरैय्यांचे समालोचन म्हणजे प्रामाणिकपणे केलेले ‘बॉल टू बॉल’ वर्णन यात षटकार, चौकार, दुहेरी अन् एकेरी धावांसाठी होती संथ लयीतली शैली आरोह अवरोहाना स्थान नसलेली. परंतु यात पक्षपातीपणा नव्हता. भारताच्या विजय-पराजयांचे निवेदन नि:सत्त्व शैलीत होत असे. त्यात शब्दांचे धुमारे नव्हते, किंचाळणे नव्हते की सुस्कारे नव्हते. यामुळे सुरेश सरैय्यांचा पण एक चाहता वर्ग होता, १९६५ सालापासून प्रथमश्रेणी आणि १९६९ सालापासून क्रिकेटचे धावते समालोचन करणाऱ्या सुरेश सरैयांनी शंभर हून अधिक कसोटी सामन्यांत समालोचन केले होते. सुरेश सरैया यांचे घराणे नवसारीचे. परंतु वडील ‘स्टेशन मास्तर’ असल्यामुळे त्यांचे बालपण मुंबईतील माटुंग्याच्या मध्यमवर्गीय वस्तीत गेले. पाचवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत तर ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण अंधेरीच्या शेठ माधवदास अमरसी हायस्कूलमध्ये झाले. गिरगाव चौपाटी येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र घेऊन कला शाखेची पदवी, सिद्धार्थ महाविद्यालयात एल.एल.बी.चे शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या सुरेश सरैयांनी भवन्स महाविद्यालयातून ‘जनसंपर्क आणि प्रसिद्धी’ तसेच पत्रकारितेचा डिप्लोमाही पूर्ण केला. १९६९ पासून कसोटी समालोचन करणाऱ्या सुरेश सरैयांना तेव्हा विजय मर्चंट, देवराज पुरी, डिकी रत्नागरसारख्या दिग्गजांसमोर उभे ठाकावे लागली. ४ नोव्हेंबर १९६९ रोजी त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध हिंदुस्थान या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या कसोटीत ‘रनिंग कॉमेण्ट्री’च्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता बिल लॉरी तर हिंदुस्थानचा मन्सूर अली खान पतौडी. त्यानंतर त्यांनी द. आफ्रिकेत केपटाऊन येथील चौथ्या कसोटीत ‘धावत्या समालोचना’ची पन्नाशी गाठली. त्यावेळी हर्षा भोगले त्यांचे सहकारी होते. त्यानंतर १४ ऑक्टोबरला २०११ रोजी नागपूर येथे हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्याविरुद्ध सामन्यात समालोचन करून ‘रनिंग कॉमेण्ट्री’ची सेंच्युरी ठोकली. या बरोबरच त्यांनी १५० वन-डे साठी समालोचन केले. यात चार विश्व कप सामिल आहेत. या वाटचालीत आपल्या सर्व वयोगटाच्या सहका-यांशी ते सहजपणे वावरले. ‘वाटाण्या’ अशी हाक सुरेश सरैय्या आल्याची वर्दी असायची. प्रथमच तसा उल्लेख केल्यानंतर काही व्यक्ती रागवायच्याही, परंतु नंतर मिश्कील स्वभावाच्या सरैय्यांशी बातचीत झाल्यानंतर आधीची कटुता विरून जायची. जॉन आर्लट यांच्या क्रिकेट समालोचनावर ते फिदा होते. त्यामुळे सरैय्यांना ‘नवसारीचा आर्लट’ असेही संबोधले जायचे. अशा मिश्कील स्वभावाच्या क्रिकेट सरस्वतीचे वरदान असलेल्या भाषाप्रभूला पत्नीही तशीच लाभली होती. आकाशवाणीवर ‘आपली आवड’ या कार्यक्रमाद्वारे तमाम मराठी श्रोत्यांवर कित्येक दशके राज्य करणा-या मीरा प्रभू या त्यांच्या पत्नी होत्या.
सुरेश सरैया यांचे १८ जुलै २०१२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply