नवीन लेखन...

ज्येष्ठ दिग्दर्शक दिनकर द. पाटील

ज्येष्ठ दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील बेनाडी या गावी झाला.

मराठी सिनेमासृष्टीत १९५० ते १९९६ या ४६ वर्षांत ज्यांनी आपल्या अस्सल ग्रामीण संवादाने सामाजिक, तमाशाप्रधान आणि ऐतिहासिक चित्रपटात ठसा उमटविला, मराठमोळ्या प्रेक्षकांची मनोभावे सेवा केली, रजत पटलावर स्वत:ची पाटीलकी मिरवली, त्या सिने-नाट्य दिग्दर्शक दिनकर पाटील यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. शालेय वयातच त्यांना सिनेमा बघण्याची गोडी लागली. कारण तेव्हा त्यांचे जीवाभावाचे मित्र होते आनंदराव पेंटरांचे चिरंजीव वसंत पेंटर. वसंतराव आपले काका बाबूराव पेंटर यांना मामा म्हणायचे. त्यांच्या संगतीमुळे म्हणा, सहवासामुळे म्हणा. त्या काळात शाळा चुकवून दिनकरराव पाटील मंगळवार पेठेतल्या स्टार सिनेमागृहात जाऊन कधी इंग्रजी चित्रपट पहायचे, तर कधी शनिवारपेठेतल्या ‘आरूढ’ सिनेमा गृहात जायचे. अगदीच लहर आली तर रंकाळा वेशीजवळच्या मॅजेस्टीक सिनेमागृहात जावून, स्टंटबाज इंग्रजी चित्रपट पहायचे नाहीतर रविवार पेठेतल्या अमेरिकन इंडियन सिनेमागृहात मनाची करमणूक करून घ्यायचे. हे सगळे शोक ते शाळा चुकवून करायचे. त्यासाठी त्यांची अनेकदा घरच्यांचा मारही खाल्ला. पण सिनेमा बघायची त्यांची सवय काही सुटली नाही.

भक्तीसेवा विद्यापीठात शिकताना त्यांना विनायक गुरू म्हणून लाभले तर महाविद्यालयीन जीवनात राजाराम कॉलेजमध्ये शिकताना कादंबरीकार प्रा.ना. सी. फडके, कवी माधव ज्युलीयन यांचा सहवास लाभला. त्या काळात कोल्हापुरात गणपती उत्सवात अनेक कलापथके सादर व्हायची. त्या गणपतीतल्या कित्येक कलापथकांना, मेळ्यांना संवाद लिहून देण्यात दिनकरराव अग्रेसर होते. इथेच त्यांना खटकेबाज संवाद लिहायची सवय लागली. कारण, समोरचा प्रेक्षक हा सामान्य कुटुंबातला आहे. तेव्हा त्याला कळेल, समजेल अशा भाषेत लेखन करणे गरजेचे होते. ती गरज त्यांनी ओळखली आणि जाणीवपूर्वक त्यांच्याच लोकभाषेत संवादलेखन करण्यात धन्यता मानली.

आपल्या या संवाद लेखनाचे इंगीत सांगताना, स्वत: दिनकरराव म्हणत, ‘मेळ्याचे संवाद लिहिताना संवाद लेखनाची गुरूकिल्ली सापडली. संवाद कलापथक-नाटक अथवा चित्रपटातले असोत, ते बोलीभाषेत लिहावेत, ऐकता क्षणीच प्रेक्षकांना कळलं पाहिजे. भालजी पेंढारकरांच्या साध्या-सोप्या-खटकेदार संवादाची छाया माझ्या संवादलेखनावर पडली आहे. त्यामुळे या क्षेत्रातले ते माझे गुरू आहेत.’ असे आवर्जून ते कबूल करताना आणि संवाद-लेखनाचे महत्त्व पटवून देताना गुरूबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करत असत. दिनकररावांनी लिहिलेल्या ‘वाघ्याची मुरळी’ या कथेवर ‘जय मल्हार’या ग्रामीण तमाशाप्रधान चित्रपटाची निर्मिती झाली. तो अस्सल ग्रामीण तमाशापट दिग्दर्शित केला होता बाबूराव पेंढारकरांनी. त्यामुळे १९५० ते १९६० या दशकातला पडद्यावरचा दिनकरराव पाटलांचा चेहरा जो ठळक बनत गेला तो याच चित्रपटापासून हे आवर्जून सांगावे लागेल.

तसे पाहिले तर या कालखंडात, ‘पाटलाचं पोरं’, ‘कसं काय पाटील बरं हाय कां?’ ‘पाटलीण,’ ‘पाटलाची सून’ या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. कारण प्रेक्षकांच्या तनामनांवर पाटीलकी गाजवणाऱ्या पाटलांना बदनाम करणारा सिनेमा निर्माण करणारा एक पाटील आहे. त्याचं नाव आहे, दिनकर द. पाटील, असे ग.दि.माडगूळकर गमतीने एका कार्यक्रमात म्हणाले खरे. पण, त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर तितक्याच गमतीने देताना, दिनकरराव पाटील म्हणाले, ‘मी पाटलांना बदनाम नाही केला. पण पाटील आहे तसा दाखविला, तो रगेल आणि रंगेल पाटील पडद्यावर साकारला चंद्रकांत मांडरे यांनी. त्यामुळेच पाटील ठसठशीत, ठाशीव रूपात त्यांच्या जीवंत अभिनयाने पडद्यावर साकारला गेला,’ याची जाणीव ते करून देत.

तसे पाहिले तर विनायक यांच्या करंगळीला धरून दिनकरराव पाटील या क्षेत्रात आले कारण पाटलाच्या पोरानं पाटीलकी करावी नाहीतर छोटी मोठी नोकरी करावी, असा तो कालखंड होता. नोकरीच्या शोधात असलेल्या दिनकररावांना विनायक म्हणाले, ‘तुम्हाला जो पगार बाहेर मिळतो तेवढा मी देईन. तुम्ही माझे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रहा,’ आणि शेवटी गुरूआज्ञा शिरसावंध मानून दिनकररावांनी चालून आलेली नोकरीची संधी सोडून या बेभरवशाच्या धंद्यात प्रवेश केला. ज्या गुरूने आपले लग्न लावून दिले. घरी रहायला आसरा दिला अशा माणसाला सोडून जाणे त्यांनाही आवडले नव्हते. पण, गोष्टी योगायोगाच्या असतात म्हणा किंवा ‘बेला फुलाला गाठ पडावी,’ तसे झाले विनायकरावांचे असिस्टंट म्हणून वावरणारे दिनकरराव १९४८ मध्ये त्यांच्या अकाली निधनामुळे अर्धवट राहिलेला ‘मंदिर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून सहदिग्दर्शकाचे दिग्दर्शक बनले. येथेच त्यांच्या आयुष्याने टर्निंग पॉइंट घेतला आणि जी घोडदौड सुरू केली ती पुढे चार दशके थांबलीच नाही. या चार दशकांत त्यांना असंख्य अडचणी आल्या. त्या अडचणींवर मात करून, जिद्दीने, लढाऊवृत्तीने दिनकरराव या क्षेत्रात स्वत:चे स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले. दिनकरराव पाटील यांनी आपल्या या ४६ वर्षांत ३६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

साहित्यक्षेत्रातही त्याची कर्तबगारी उल्लेखनीयच होती. पाच नाटके, दोन एकांकिका संग्रह, चार कथासंग्रह, चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रूपेरी पडदा’, ‘तंत्रमंत्र’ हे चित्रपटविषयक पुस्तक आणि ‘पाटलाचा पोर’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ‘साहित्यसंपदा’ आहे. दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर , प्रेम आंधळं असतं व ते माझे घर या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते.

दिनकर पाटील यांचे २१ मार्च २००५ रोजी निधन झाले.

आपल्या समूहातर्फे दिनकर पाटील यांना आदरांजली.

दिनकर पाटील यांचे चित्रपट

वरदक्षिणा

https://www.youtube.com/watch?v=E7nTbu5nm9o

उमज पडेल तर

http://www.dailymotion.com/video/xv8jdm_umaj-padel-tar_people

मल्हारी मार्तंड

http://www.dailymotion.com/video/xv5iza_malhari-martand_shortfilms

जय मल्हार

https://www.youtube.com/watch?v=y49H5kUndXU

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..