ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव भोसले उर्फ वाय.जी. भोसले यांचा जन्म १ सप्टेंबर १९२६ रोजी झाला.
चित्रपट व व्यावसायिक नाटयसृष्टीला अनेक कलावंत देण्यात यशवंतराव गणपतराव तथा वाय. जी भोसले यांचे मोठे योगदान होते. त्यांना चित्रपट व नाट्य क्षेत्रातील सृजनशील शिक्षक तसेच ध्येयवेडा दिग्दर्शक असे म्हणले जायचे. त्यांचे वडील गणपतराव हे शाहू महाराजांच्या दरबारात चोपदार होते. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी ‘हॉटेल चोपदार’ सुरू केले. त्यांचे शिक्षण बेताचेच होते. गणपत पाटील, दिग्दर्शक माधव भोईटे, जी. बी. अष्टेकर हे त्यांचे शाळेतील मित्र. बालवयातच त्यांना नाटकाची गोडी लागली. वाय. जी. भोसले यांनी प्रारंभीच्या काळात मास्टर विनायक व चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे असिस्टंट म्हणून काम केले. नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांच्या सुचनेनुसार ते चित्रपटसृष्टी सोडून रंगभूमीकडे वळले. त्यांनी रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम केले. शहरातील अनेक नाट्यसंस्था, महाविद्यालये, बँका, साखर कारखाने, कोल्हापूर पोलिस दलाच्या नाटकांचे दिग्दर्शन केले. रंगभूमीच्या माध्यमातून तरुण व हौशी कलाकार घडविले. व्ही. शातांराम यांचा ‘चानी’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून तर जयसिंगराव कुसाळे यांच्या ‘सुळावरची पोळी’ चित्रपटाचे दिग्दर्शक होते. भोसले यांनी स्वप्नगंधा थिएटर नावांची संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे शंकर खंडू पाटील यांच्या कांदबरीवर ‘भल्या घरची कामिनी’ हे नाटक रंगभूमीवर आणले त्यांनी ७०० हून अधिक हौशी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली अरुण सरनाईक, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील, राजशेखर, अभिनेत्री पद्मा चव्हाण, उमा, कामीनी भाटिया, संध्या रायकर, नीला गांधी, शांता तांबे, पद्मीनी बिडकर या कलावंतानी नाट्य कलेचे धडे घेतले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, संगीतसूर्य केशवराव भोसले जन्मशताब्दी सोहळा, चित्रतपस्वी व्ही. शातांराम यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. कलाजंली संस्थेतर्फे नाट्य कलायोगी, संस्कार भारती तर्फे करवीर भूषण पुरस्कार विठ्ठल उमप स्मृतिल गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
वाय. जी. भोसले यांचे ४ जुलै २०१६ रोजी निधन झाले.
Leave a Reply