ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण होर्णेकर यांचा जन्म २५ मार्चला झाला.
मराठी रंगभूमीवरील अरुण होर्णेकर हे महत्त्वाचे नाव आहे. गेली अनेक वर्ष अरुण होर्णेकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अनेक भूमिका साकारल्या आहेत. अतिशय हुशार दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. गेली चार दशकं ते मराठी रंगभूमीवर निष्ठेनं काम करत आहेत.
रंगभूमीवर सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहणारे हरहुन्नरी रंगकर्मी अरुण होर्णेकर हे लेखक, दिग्दर्शक कलावंत आहेत. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये थिएटर ऑफ ॲब्सर्डच्या अचाट प्रयोगांपासून ते अलीकडच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ पर्यंत ते सतत काही ना काही करून बघत असतात. अरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲटब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत.
सुरुवातीला नाटकाशी दुरान्वयानेही संबंध नसलेले, उपजीविकेचं साधन म्हणून कमर्शियल आर्टचं काम करणारे होर्णेकर एकदा सहज म्हणून साहित्य संघातील अमृत नाट्यभारतीच्या शिबिरात मित्राला प्रवेश घ्यायचा होता म्हणून त्याच्यासोबत गेले होते. मित्राबरोबरच गंमत म्हणून त्यांनीही अर्ज भरला. त्या अर्जात त्यांनी दिलेल्या विचित्र उत्तरांनी कमलाकर सोनटक्के यांनी त्यांची शिबिरासाठी निवड केली आणि ज्याच्यासोबत ते तिथं गेले होते, त्या मित्राची मात्र निवड झाली नाही. इथून होर्णेकरांचा ट्रॅक बदलला तो कायमचाच!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply