ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा जन्म २४ जुलै १९३२ अहमदनगर येथे झाला.
मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईत शाळेपासून झाली. नाटय़शिक्षणाचे प्राथमिक धडे त्यांनी तिथेच गिरवले. दहा वर्षांचे असताना पितृछत्र हरपले. मधुकर तोरडमल यांचे काका मुंबईत सांताक्रुझला पोलीस ठाण्यात अधिकारी होते. त्यांनीच तोरडमल यांना शिक्षणासाठी मुंबईत आणले. शेठ आनंदीलाल पोद्दार ही त्यांची शाळा. शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला नाटकात काम करण्याची आवड असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. चिं. वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक मामांनी बसवले. दिग्दर्शन आणि अभिनयाची सुरुवात तिथूनच झाली. नंतर झालेल्या अनेक स्नेहसंमेलनात, अन्य कार्यक्रमांत नाटक बसवण्याची जबाबदारी मामांवरच आली जी त्यांनी यशस्वी पार पाडली.
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर कुर्ला येथे प्रीमिअर ऑटोमोबाईल कंपनीत काही काळ लिपिक म्हणून काम केले. नंतर नगर येथे महाविद्यालयात १९६८ साली इंग्रजीचे प्राध्यापक झाले. तेथील काळात भोवरा, सैनिक नावाचा माणूस आदी नाटके केली. राज्य नाटय़स्पर्धेत तर सहभाग होताच. स्पर्धेत ‘एक होता म्हातारा’ हे नाटक सादर केले. त्यात त्यांची बळीमामाची भूमिका होती. पुढे याच भूमिकेने त्यांना मामा ही ओळख दिली. आणि बघता बघता सिने आणि नाटय़सृष्टीचे ते आवडीचे मामा झाले.
नगरच्या महाविद्यालयात इंग्रजीचे शिस्तप्रिय प्राध्यापक असा त्यांचा परिचय होता. नाटक आणि नोकरी ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागत असे. महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस हेही तोरडमल यांच्या कला-गुणांना वाव देणारे होते. व्यावसायिक रंगभूमीवर जायचे असेल तर अवश्य जावे. वर्षभर अनुभव घ्यावा. नाहीच जमले तर कॉलेजात नोकरी आहेच असे सुचवले. प्रत्यक्षात मात्र तोरडमल यांनी चित्रपट आणि रंगभूमीच्या क्षेत्रात आपली चौफेर वाटचाल कायम ठेवली. तोरडमलांच्या प्रवासात काका, शिक्षिका आणि प्राचार्य यांचे भरीव योगदान एकूण महत्त्वाचे व प्रेरणादायी ठरले.
प्रा. मधुकर तोरडमल यांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका असे हे बहुपदरी नाटक खूप गाजले. त्यातील इरसाल प्राध्यापक बारटक्के मधुकररावांनी भन्नाट रंगवला. त्याचे पाच हजारांवर प्रयोग झाले. या नाटकाचे समीक्षण करताना एका समीक्षकाने स्पष्ट म्हटले होते ‘सुशिक्षित आणि सुसंस्क़ृत आणि विशेषतः पांढरपेशी स्त्रीयांनी हे नाटक अजिबात बघू नये’ पण प्रत्यक्षात झाले उलटेच. समीक्षकांच्या टीका टिप्पणीनंतर या नाटकाची उत्सुकता, लोकप्रियता अधिकच वाढली. पुण्याच्या बालगंधर्व नाटय़गृहात या नाटकाचे एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. मकरसंक्रांतीचा दिवस होता. रसिकांनी रांगा लावून या प्रयोगास गर्दी केली. १४ जानेवारी १९७२ या दिवशी हा इतिहास घडला. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुपारच्या प्रयोगाला ग. दि. माडगूळकर आणि संध्याकाळच्या प्रयोगाला संगीतकार वसंत देसाई हजर होते. या रेकॉर्डब्रेक प्रयोगात ह हा हि ही च्या बारखडीने हास्यस्फोट करीत खूप धमाल केली. मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रा. तोरडमल यांनी रंगवलेला इरसाल प्रा. बारटक्के कमालीचा अजरामर झाला.
नाटय़क्षेत्राच्या बाबतीत त्यांचा अभिनयातील दमदारपणा, बोलके डोळे यामुळे एकूणच साकारली जाणारी भूमिका भारदस्तच होत असे. मधुकर तोरडमल यांनी कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले. मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता.
मधुकर तोरडमल यांनी धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला होता. त्याशिवाय, २० पुस्तके लिहिली आहेत. तोरडमल यांचा आजपर्यंतचा सर्वच प्रवास ‘तिसरी घंटा’ या आत्मकथनात विस्ताराने आला आहे. ‘उत्तरमामायण’ या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे मधुकर तोरडमल यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.
सिने आणि नाटय़सृष्टीतील योगदानाबद्दल राज्य शासनाच्या २००९-१०चा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि संभाजीनगरच्या मराठवाडा साहित्य परिषदेचा २०१२ सालचा नटवर्य लोटू पाटील यांच्यासारख्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मान झाला. नगर येथे २००३ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनात त्यांची भूमिका आयोजकांची होती. राज्य सरकारने २००९-१०च्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. ‘अखेरचा सवाल’, ‘बेईमान’, ‘मत्स्यगंधा’, ‘घरात फुलला पारिजात’ ही त्यांची अन्य गाजलेली नाटके. प्रा. तोरडमल यांनी मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. ‘आत्मविश्वास’, ‘आपली माणसे’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘राख’, ‘सिंहासन’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. मधुकर तोरडमल यांचे २ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply