‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ या दोन वाङमयीन नियतकालिकांद्वारे मराठी साहित्य क्षेत्रात साक्षेपी संपादनाचा मापदंड निर्माण करतानाच अनेक साहित्यिक ‘घडविणारे’ ज्येष्ठ संपादक राम पटवर्धन जन्म २१ मार्च १९२८ रोजी आगरगुळे-रत्नानगिरी येथे झाला.
राम पटवर्धन हे मौज या मराठीमधील सर्वात जुन्या व उल्लेखनीय प्रकाशन संस्थेचे मेहनती व साक्षेपी संपादक होते. नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रूळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. शालेय शिक्षण रत्नागिरीत संपवून मुंबईत येऊन त्यांनी बीए, एमए केले. शिक्षणासोबत सरकारी नोकरीही केली. सिडनेहॅम, रुइया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनही केले. वेळोवेळी शिष्यवृत्त्या मिळवून मराठीत एमए केलेल्या पटवर्धन यांनी पुढच्या काळात मराठीतील अनेक नवलेखक घडविले, अनेकांच्या प्रतिभेला पैलू पाडून मौजेच्या पुस्तकांतून ते वाचकांसमोर आणले.
प्रारंभी काही काळ त्यांनी मंत्रालयाती नोकरी केली. पण सरकारी खाक्यामध्ये रमणे त्यांच्या स्वभावात नव्हते. काही महिन्यांतच त्या नोकरीचा राजीनामा देऊन ते मौज प्रकाशनगृहात रूजू झाले. मराठी वाङ्मयीन क्षेत्रात दंतकथेचे स्वरूप प्राप्त झालेल्या ‘सत्यकथा’मध्ये आधी ते कार्यकारी संपादक आणि नंतर मुख्य संपादक होते. जया दडकर, मारूती चितमपल्ली, अनिल अवचट, नारायण सुर्वे, आशा बगे, सानिया , विलास सारंग, यशवंत पाठक, मीना प्रभू आदी मराठीतील अनेक नामवंत साहित्यिकांची पुस्तके त्यांनी संपादित केली.
‘मौज’ मधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले. अचला जोशी यांचे ‘आश्रम नावाने घर’ हे त्यांनी संपादित केलेले अखेरचे पुस्तक. संपादनाबरोबरच त्यांनी अनुवादित केलेली ‘पाडस’ आणि ‘योगदीपिका’ ही दोन पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. ‘पाडस’ तर भाषांतराचा उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते.
राम पटवर्धन यांनी ‘मौज’ बंद पडल्यावर १९६० साली सत्यकथाच्या कार्यकारी संपादकाची धुरा स्वीकारली आणि नव्या प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना सत्यकथाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ललितकथा आणि कविता यांच्याचबरोबर ललितलेखन, समीक्षा, विविध कलामाध्यमे यांचाही अंतर्भाव केला.
पु. ल. देशपांडे, न. र. फाटक, श्री. पु. भागवत वगैरे शिक्षकांमुळे राम पटवर्धन यांची वाङ्मयीन जाण चौफेर होत गेली. त्यांनी स्वत:देखील चेकॉव्हच्या काही कथांचे अनुवाद केले आणि ‘नाइन फिफ्टीन टू फ्रीडम’ ही कादंबरीही मराठीत आणली आहे. त्यामुळे ‘मौज’ साप्ताहिक आणि सत्यकथा हे मासिक मराठीतील सर्व नव्या लेखकांचे नव्या प्रयोगांचे केंद्र म्हणून मान्यता पावले. सत्यकथामध्ये जोपर्यंत आपले लेखन येत नाही तोपर्यंत लेखक म्हणून आपल्याला कुणी स्वीकारणार नाही, असे त्या वेळी समजले जाई. हे जे स्थान सत्यकथाला मिळाले ते काही वाचकांना व सत्यकथामध्ये स्थान न मिळालेल्या लेखकांना खटकू लागले आणि ते सत्यकथाबाबतचा आपला विरोध लघुनियतकालिकेत किंवा अनियतकालिकांच्या माध्यमातून व्यक्त करू लागले. तो विद्रोहाचा प्रवाह आजही ओसरलेला नाही. आजही जादा खप असलेल्या आणि प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या माध्यमांच्या विरोधात अनेक अनियतकालिके निघत आहेत.
एका दृष्टीने राम पटवर्धन यांनी सत्यकथाला जे कलावादी स्वरूप दिले त्याचा हा परिपाक होय. दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य यांचे जे पेव फुटले त्याचे श्रेयही मौज व सत्यकथाकडे जाते. राम पटवर्धन हे एक संपादक म्हणून आपल्याकडे येणाऱ्या लेखनावर विविध संस्कार करण्यामध्ये चोखंदळपणा दाखवत.
राम पटवर्धन ३ जून २०१४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply