ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित पुरुषोत्तम वालावलकर यांचा जन्म ११ जून १९२३ रोजी झाला.
पुरुषोत्तम वालावलकर यांना लहानपणापासूनच बालगंधर्वांचा सहवास मिळाला होता. बालगंधर्वांपासून पं.भीमसेन जोशी,जितेंद्र अभिषेकी, पं. सी.आर. व्यास, शोभा गुर्टू आदी दिग्गज कलाकारांना त्यांनी संवादिनीची समर्थ साथ केली होती. गंधर्वयुगाशी आजच्या पिढीचे नाते जोडणारा दुवा म्हणूनही वालावलकर यांच्याकडे आदराने पाहिले जात होते. गोविंदराव टेंबे, विठ्ठलराव कोरगावकर अशा बुजुर्ग मंडळींकडे त्यांनी शिक्षण घेतले होते. संवादिनीवर लीलया फिरणाऱ्या त्यांच्या बोटांचे रसिकमनावर गारूड असायचे. पं.वालावलकरांनी सुरुवातीला गोविंदराव टेंबे यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे धडे घेतले. त्यानंतर ते बेळगावला गेल्यावर वझे बुवांचा शेजार त्यांना लाभला आणि तिथे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी पैलू पडले. वझे बुवांनी त्यांची किराणा घराण्याचे विठ्ठलराव कोरगांवकर यांच्याशी भेट घालून दिल्यानंतर वालावलकरांनी त्यांच्याकडूनही किराणा घराण्याचे धडे घेतले; तर आग्रा घराण्याचे हणमंतराव वाळवेकर यांच्याकडूनही त्यांनी काही काळ आग्रा घराण्याची शैली शिकून घेतली. त्यामुळे वालावलकरांच्या अलौकिक प्रतिभेला जयपूर, आग्रा आणि किराणा घराण्याचा वसा मिळाला आणि या तीनही घराण्यांचा मिलाफ त्यांच्या शैलीत एकवटला. त्यामुळे गायक कोणताही असला तरी त्याला साथ देणं वालावलकरांना कधीच कठीण गेलं नाही. अब्दुल करीम खां साहेब, अल्लादिया खां साहेब अशा ज्येष्ठ कलाकारांना त्यांनी जवळून ऐकलं आणि त्यांना साथ करण्याची संधीही त्यांना मिळाली. मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती.
पं. वालावलकरांनी अनेक शिष्य घडवले. ते स्वतः एक उत्कृष्ट गायक होते. लाघवी स्वभावामुळे ते अनेकांना आपलेसे करायचे. पं.वालावलकर साथीला असतील तर त्या कार्यक्रमाला एक वेगळे वलय प्राप्त व्हायचे आणि त्यांच्या प्रतिभेचा प्रेक्षकांना साक्षात्कार व्हायचा.
स्वतंत्र विचार आणि बारीक निरीक्षण हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बेळगाव मधील प्रख्यात हामोर्नियम वादक पं.रामभाऊ विजापुरे यांच्या हस्ते वालावलकर यांना स्वरगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता.
पं. पुरुषोत्तम वालावलकर यांचे १३ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply