ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला.
डॉ. दत्तात्रय सामंत उर्फ डॉ.दत्ता सामंत यांचा जन्म कोकणातील देवगडचा.त्यांचे वडील वैद्य व शेतकरी होते. ते आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि जडीबुटीच्या आधारावर लोकांचे उपचार करत. वडीलांना त्या कामात मदत करताना, दत्ता सामंत यांना डॉक्टरी पेशात रस निर्माण झाला आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले व मुंबईत आपली प्रक्टिस चालू केली. मुंबईतील पंत नगरचा एरिया हा खाणकाम मजुरांचा होता. हे मजूर डॉ. सामंताकडे उपचार घेण्यासाठी येत असत. त्यांची दयनीय अवस्था बघून डॉ. सामंत अगदी माफक दरात त्यांचे उपचार करत असत.
मजुरांच्या नेहमीच्या येण्याने व जगण्याचा संघर्षाला बघून तसेच त्यांचा पदरी अथक मेहनत करून देखील आलेल्या अठरा विश्वे दारिद्र्याला बघून डॉ.दत्ता सामंत व्यथित झाले होते.
अखेरीस त्यांनी ह्या कामगारांसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी कामगारांचे संघटन उभे केले. हे करण्यासाठी त्यांना तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी मदत केली. डॉ.दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली बघता बघता खाणकाम मजुरांचा मोठा लढा उभा राहिला आणि संघर्षाला सुरुवात झाली. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपोषणं, काम बंद आंदोलन करण्यात आले. ज्याचा परिणाम स्वरूप कामगारांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत झाली. डॉ.दत्ता सामंत यांचे नेतृत्व बघता, इतर कामगार संघटनाही त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांना नेतृत्व स्वीकारण्याचा मागण्या करू लागल्या आणि दत्ता सामंत यांनी त्या कामगार संघटनांचे नेतृत्व स्वीकारले. दत्ता सामंत यांनी अनेक विविध उद्योगात काम करणाऱ्या अश्या वेगवेगळ्या २०० कामगार संघटनांचे अध्यक्षपद आणि ५०० संघटनांचे उपाध्यक्षपद भूषवले होते.
१९७० च्या दशकात क्षितिजावर आलेल्या दत्ता सामंत यांनी पुढील दोन दशके कामगार चळवळीचे नेतृत्व केले होते. दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. मुंबईतल्या गिरण्या बंद पडून स्थलांतरीत होत होत्या. आजूबाजूच्या भिवंडी, मालेगाव, सुरत ह्या भागात ह्या गिरण्या जात होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येत कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले होते.ह्यात गिरणी व्यवसाय बंद पडून तिथे असलेल्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी बांधकाम उद्योजकांचा नजरा भिडल्या होत्या. गोदरेज पासून इतर गिरणी कामगारांचे नेतृत्व स्वीकारत दत्ता सामंत यांनी कामगारांचा एक मोठा मोर्चा मुंबईत काढला. त्या मोर्चावर पोलिसांनी फायरिंग केली. त्यानंतर तो संघर्ष अजून चिघळला. यात ५० जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ह्यात डॉ दत्ता सामंत यांचे पण नाव होते. परंतु दोनन वर्षांनी त्यांची सुटका करण्यात आली. ह्या घटनेमुळे दत्ता सामंत हे मुंबईच्या कामगार वर्तुळातले एक सर्वात मोठे नेतृत्व म्हणून उभे राहिले.
पुढे दत्ता सामंत ह्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते त्यांच्या भागातून आधी निष्पक्ष नंतर काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि निवडून आले. त्यांनी विधानसभेत असंख्य प्रश्न विचारले. कामगार प्रश्नापासून मुस्लिम पर्सनल लॉ पर्यंत अनेक प्रश्न दत्ता सामंत ह्यांनी विधान सभेत उपस्थित केले. ह्या प्रश्नांना मोठी व्हॅल्यु प्राप्त झाली होती. एका दिवसात सलग तीनवेळा प्रश्न विचारण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता.
पुढे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत लाल निशाण ह्या पक्षाची स्थापना केली. ज्या मार्फत त्यांनी डाव्या चळवळीच्या संघटनांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला कारण त्याकाळी उदयास आलेल्या शिवसेनेने तिथे मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा करत कामगार चळवळी व कम्युनिस्ट पक्ष्याला घर घर लावली होती. अश्यावेळी डॉ सामंत ह्यांनी कामगार संघटनांची मोट बांधली होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस मतं पडली होती. त्या लाटेत ही डॉ. सामंत हे कॉंग्रेस विरोधात उभे राहून खासदार म्हणून निवडून आले होते.
खासदार झाल्यावर देखील त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रश्न मांडणे चालू ठेवले होते. त्यांनी सांसद म्हणून उत्कृष्ट कारकीर्द निभावली होती. पुढे जाऊन त्यांनी पुन्हा कामगार चळवळीच्या लढ्यात लक्ष घातले. १९९१ ला आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेत पण त्यांनी कामगारांवर मोठे संकट कोसळले होते तेव्हा देखील दत्ता सामंतांनी लढा दिला होता. गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी ते लढत होते.
डॉ दत्ता सामंत हे एका वादळाप्रमाणे मुंबईच्या कामगार चळवळीत वावरले होते. इतर नेत्यांप्रमाणे सत्ता मिळाल्यावर त्यांनी कामगारांना वाळीत सोडून न देता एक मोठा संघर्ष उभारला होता. त्यांचा पाठीशी उभे राहिले. त्यांचे नेतृत्व केले. त्यांना संघटित केले.
१६ जानेवारी १९९७ रोजी डॉ.दत्ता सामंत यांची गोळ्या झाडुन हत्या करण्यात आली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply