जन्म. ११ जुलै १९२१ सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावी.
शंकररावांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. चार पुस्तके शिकावी या ध्येयाने ते औंधला उंटाच्या मागे पायी चालत गेले. त्यांची जिद्द पाहून शिक्षकांनी त्यांना खूप मदत केली. पुढे ते फर्गसन महाविद्यालयामधून पदवीधर झाले. परिस्थितीवर मात करीत त्यांनी एल.एल.बी.चं शिक्षणही पूर्ण केले.
आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा या ध्येयापोटी ते दलित चळवळीशी जोडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरात यांच्या कामाला अधिक गती प्राप्त झाली. “मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे’ असे ते नेहमी म्हणत. बॅंक ऑफ इंडियाचे संचालक, ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन आणि मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक सन्मानाची पदं त्यांनी भूषविली.
१९५८ ते १९६१ या काळात “प्रबुद्ध भारत” या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. आचार्य अत्रे यांच्या नवयुग दिवाळी अंकात वर्ष १९५७ मधे त्यांची वयाच्या छत्तिसाव्या वर्षी “सत्तूची पडीक जमीन’ नावाची पहिली कथा प्रकाशित झाली व त्यांच्यातील लेखक जागृत झाला. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या. त्यांच्या लेखनात समाजातील शेवटच्या स्तराचे दारिद्य्र, वेदना, अवहेलना यांची तत्कालीन वस्तुस्थिती त्यांनी समाजापुढे आणली. दलित व भटक्या जमातीच्या विकास योजनांसंदर्भातील मागण्या, त्यांना स्वावलंबी, स्वतंत्र व जीवन जगण्याची संधी मिळण्याची आवश्यसकता यासंबंधीचे खरातांचे विचार त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतात.
त्यांचे “तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र खूपच गाजले. त्यांची “माणुसकीची हाक’ ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरीही गाजली. गदिमा व शंकरराव खरात दोघेही माणदेशी आटपाडीचेच. “शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ’ असे म्हणून ग. दि. माडगूळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
प्रा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, शंकर पाटील, प्रा. द. मा. मिरासदार यांच्यासोबत आचार्य प्र. के. अत्रे, शिरीष पै यांनीही त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले. त्यांचे तराळ-अंतराळ हे आत्मचरित्र. बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गाव-शीव इ. लिखाण. आज इथं तर उद्या तिथं हा ललितलेखसंग्रह. टिटवीचा फेरा, सुटका, दौण्डी, आडगावचे पाणी इ. कथासंग्रह. हातभट्टी, गावचा टिनपोल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, फूटपाथ नंबर १, माझं नाव इ. कादंबऱ्या प्रकाशित आहेत.
शंकरराव खरात यांचे निधन ९ एप्रिल २००१ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply