वसंत निनावे यांनी भंडाऱ्या सारख्या लहान शहरामधून मुंबईला येऊन सुरवातीच्या काळात अतिशय संघर्ष केला. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी भंडारा येथे झाला. वसंत निनावे यांनी आकाशवाणी साठी अनेक श्रुतिका लिहिल्या. त्या श्रुतिका नीलम प्रभू, बाळ कुरतडकर यांच्या सारख्या दिग्गज रेडिओ कलाकारांनी सादर केल्या होत्या. पुढे याच श्रुतिका ‘आकाशप्रिया’ या नावाने त्या पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या, आणि या पुस्तकाला राज्य शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच वसंत निनावे त्यांनी असंख्य रेडिओ प्रोग्राम्स लिहिले, अनेक भाषांतरं केली. वसंत निनावे यांचे मराठी सोबतच हिंदी, इंग्लिश, संस्कृत या ही भाषांवर प्रभुत्व होतं. चायनीज गाणीसुद्धा हिंदी मध्ये डबिंग साठी त्यांनी लिहून दिली होती. वसंत निनावे यांनी लिहिलेली गीतं यशवंत देव, दत्ता डावजेकर, बाळ बर्वे, एन. दत्ता, सी.रामचंद्र, रंजना प्रधान, सुधीर फडके अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध तर लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, तलत मेहमूद, रामदास कामत, वाणी जयराम यांसारख्या मोठ्या गायकांनी गायिली आहेत. ‘पोरकी’ या मराठी चित्रपटातील सर्व गाणी वसंत निनावे यांनी लिहिली होती. काही कारणांनी त्यांना ‘मैं तुलसी तेरे आंगन’ की हा राज खोसला चा चित्रपट त्यांना सोडावा लागला होता.
‘शिवरायांचे आठवावे रूप’ हे नाटक वसंत निनावे यांनी लिहिलं. यात नयन भडभडे म्हणजेच रीमा लागू यांनी सोयराबाईंची भूमिका केली होती. या सोबतच त्यांनी ‘अधांतर’ आणि ‘बैजू बावरा’ ही नाटके ही लिहिली, ज्यात प्रकाश घांग्रेकर आणि अजित कडकडे यांनी भूमिका केल्या होत्या. लहान मुलांच्या साठी म्हणून ‘राजपुत्र ठकसेन’, ‘गोल गोल राणी’, ‘नानांची टांग’ सारखी नाटकं त्यांनी लिहिली.
वसंत निनावे यांनी लिहिलेली तीन गाणी HMV करता रेकॉर्ड केली गेली होती.
१) ना खंत नाही खेद , २) घे झाकुन मुख हे , ३) जेव्हां तुला मी पाहिले …
याचे संगीतकार होते बाळ बर्वें व गायक होते त्या काळातील मखमली आवाजाचा हिंदी गायक अभिनेता तलत मेहमूद. ती गाणी १९७०-७१ साली मराठीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
वसंत निनावे यांचे निधन १० जून १९८८ रोजी झाले.
वसंत निनावे यांची काही गाणी.
आभाळ कोसळे जेव्हा, किती म्हटलेस तू नाही घे झाकून मुख हे चंद्रमुखी, चुकचुकली पाल एक, जमले तितुके केले तरीही, जेव्हा तुला मी पाहिले, तू थांब दूर तेथे, देते तुला हवे ते. नको साजणी देशात, नच साहवतो हा भार, पाण्यातली परी मी, प्रियतम दर्शन देई, लोक का करतात प्रीती, साउली मी तुझी होउनी, सुख उभे माझिया द्वारी, हे आदिमा हे अंति
‘पोरकी’ या मराठी चित्रपटातील गाणी.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply