ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक नंदू होनप यांचा जन्म १ जुलै १९५३ रोजी झाला.
नंदू होनप यांचे वडील विष्णू दिनकर होनप हे संगीत शिक्षक होते. त्यांनी नंदू होनप यांना व्हायोलिन शिकण्याचा सल्ला दिला. एवढेच नाही तर हे वाद्य अर्थात व्हायोलिन तुला जग दाखवील, असा आशीर्वादही दिला. गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रवींद्र साठे, अजित कडकडे, कविता कृष्णमूर्ती, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, नेहा राजपाल, स्वप्नील बांदोडकर अशा कित्येक गायकांबरोबर त्यांनी काम केले.
शिर्डी माझे पंढरपूर, नमन श्री एकदंता, शांताई मंगेशी, गजानन शेगावी आले, स्वामी समर्थ कथामृत्त असे अनेक भक्तिमय अल्बम त्यांनी केले. भक्तिगीते आणि भावगीते असा प्रवास करीत असतानाच त्यांनी जवळपास ९४ हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यातील काही चित्रपटांना पार्श्वीसंगीत त्यांचा मुलगा स्वरूपने दिले आहे. सह्याद्री वाहिनीवरील “प्रणाम पप्पा सलाम पप्पा‘ या कार्यक्रमाचे शीर्षक गीत त्यांनी तसेच त्यांच्या मुलाने कंपोझ केले होते. मच्छिंद्र कांबळी यांच्या “भैया हात पाय पसरी‘ या नाटकाला त्यांनीच संगीत दिले होते. जवळपास आठशेहून अधिक त्यांचे अल्बम्स आले. भक्तिगीते, भावगीते, लावणी, भारूड, स्तोत्र… संगीतातील विविध प्रकार त्यांनी हाताळले. “दगा बाज रे‘, “सुनो ना संगे मर मर‘, “तेरी मेरी प्रेम कहानी‘, “तेरी गलियॉं‘ या आणि अशी अनेक गाणी त्यांनी व्हायोलिनवर वाजविली आहेत. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संगीतकार म्हणून “सारेच सज्जन‘ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आणि “विश्वागस‘ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट होता.
नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तीमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दत्तावरील अनेक गाण्यांना संगीत दिलेले. गायक अजित कडकडे यांनी गायलेले निघालो घेऊन दत्ताची पालखी.. हे गाणे होनप यांनीच संगीतबद्ध केले होते. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी केली होती. निघालो घेऊन दत्ताची पालखी”, “अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली”, “स्वामी कृपा कधी करणार” आणि अशी हजारो स्वामी भक्तीपर गीते संगीतबद्द केली होती. ते भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले होते. कॅसेटच्या जमान्यात नंदू होनप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकापेक्षा एक अभंग, भजनांचा सांगितिक नजराणाच संगीत रसिकांना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी सर्वाधिक भक्तीगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. लावणी, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीतं, प्रेमगीतं आदींनाही त्यांनी संगीत दिले.
नंदू होनप यांच्या व्हायोलिननं बॉलिवूडवरही गारुड केलं होतं. बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या गीतांना त्यांनी व्हायोलिन साथ केली होती. दगाबाज रे… सावन आया है… सुनो ना संगे मरमर… सुन रहा है… या गाण्यांचा त्यात समावेश आहे.
नंदू होनप यांचे १८ सप्टेंबर २०१६ रोजी कार्यक्रम करताना निधन झाले. नंदू होनप यांना आपल्या समूहाकडुन आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply