माऊली टाकळकर यांचा जन्म ११ एप्रिल १९२७ रोजी झाला.
माऊली टाकळकर यांच्या बद्दल माहित नाही अशी संगीत क्षेत्रात एकही व्यक्ति नाही. माऊली टाकळकर यांची प्रत्येक साथ “भक्तिरंग‘ निर्माण करणारी असतेच; पण विशेषतः चार पिढ्यांना सातत्याने लयबद्ध टाळसाथ करणारे ते देशातले एकमेवाद्वितीय कलाकार असतील. . त्यांनी माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास १० वर्षे टाळवादनाचे शिक्षण घेतले, पुढे पखवाजवादनही शिकले, पण खरे ते रमले ते टाळवादनात. ते बालगंधर्वांबरोबर साथ करायचे. माऊली टाकळकर यांनी पंडित भीमसेन जोशींना ४० वर्षे टाळांची साथ केली. त्यांच्यामुळेच त्यांनी जगभर दौरे केले. आपल्या टाळ वादनाने अनेक दिग्गज व आंतरराष्ट्रीय कलाकारांना त्यांनी गेली ४ दशकाहून अधिक साथ केली आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या “संत वाणी” चे जवळजवळ २५०० हून अधिक कार्यक्रमात जगभरात सर्व ठिकाणी त्यांनी साथ केली आहे.
पंडित भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी आमोणकर अशा संगीतातील दिग्गजांपासून ते पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, पं रघुनंदन पणशीकर इ. ते आत्ताचे नव्या उमेदीचे तरूण कलाकार आर्या आंबेकर, अवधूत गांधी, जयतीर्थ मेवुंडी अशा अनेक कलावंताना अभंग गाताना टाळाची साथ माऊली टाकळकर यांनी दिली आहे. त्यांचा अपूर्व उत्साह, तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा आणि उत्कृष्ट शरीरप्रकृती जपलेला “ताठ बांधा‘ सर्वांनाच अचंबित करणारा आहे.
माऊली टाकळकर यांना वारकरी संप्रदायातील “गुरुवर्य व्यक्तिमत्व” मानले जाते. जवळपास ७० वर्षाहून अधिक पंढरपूरची वारी ते करत असत. पुण्यातील अखिल मंडई मंडळ येथील “हरिहर भजनी मंडळ” मार्फत व अखिल भारतीय वारकरी मंडळ मार्फत गेली ८ दशके भजन सेवा ते करत आहेत. माऊली टाकळकर यांचे चिरंजीव आनंद टाकळकर हे ही टाळ वादनात प्रसिध्द आहेत. त्यांना “राज्य सांस्कृतिक कलादान पुरस्कार’ व “गानसरस्वती किशोरी आमोणकर साथसंगत पुरस्कार’ मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply