ज्येष्ठ तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म ११ मे १८९५ रोजी झाला.
जागतिक कीर्ती प्राप्त करणारे जे तत्वज्ञ भारतात जन्मले, अशा निवडक महनीयांच्या यादीत जे. कृष्णमूर्तींचा समावेश होतो. ते आपल्या नऊ दशकांच्या हयातीत त्यांनी आपल्या विद्वत्तपूर्ण पण रसाळ प्रवचनांनी सर्व खंडांतील लोकांवर कमालीचा प्रभाव पाडला. त्यांनी देशात व परदेशांत तत्वज्ञान विषयक शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा स्थापन केल्या.
कृष्णमूर्तींचा पिंडच वेगळा. त्यांच्या ठायी असलेल्या प्रभावी गुणवत्तेमुळे तरुण वयातच लोक त्यांना ‘ जागतिक गुरू’ असे संबोधू लागले. पण त्यांनी ही उपाधी झिडकारली. ‘मानसिक क्रांतीचा सिद्धांत त्यांनी मांडला व आयुष्यभर त्याचा प्रसार केला. मानवी संबंध, मनाची रचना, समाजात मूलभूत बदल आदी गहन विषय ते अतिशय सोप्या भाषेत मांडत. त्यामुळेच सर्व थरांतील श्रोते त्यांना मिळत राहीले. जे. कृष्णमूर्ती हे लहानपणीच थिऑसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांच्या संपर्कात आले. त्यांचा ॲनी बेझंट यांच्याशीही परिचय झाला. त्यामुळे ते थिऑसॉफिकल चळवळीकडे आकृष्ट झाले. त्यांनी देशात व विदेशांत विपूल प्रवास करून स्वत:च्या सिद्धांतांचा प्रचार व प्रसार केला.
‘The First & Last Freedom’, ‘The Only Revolution’ हे त्यांचे ग्रंथ गाजले. आज त्यांच्या प्रवचनांच्या ध्वनिचित्रफिती पण उपलब्ध आहेत. मानसिक क्रांती साकारायची तर त्यावर धार्मिक, राजकीय वा सामाजिक अशा कोणत्याही बाह्य प्रभावाचा संसर्ग होता कामा नये, हा त्यांचा सिद्धांत होता. त्यामुळेच ते राष्ट्रीयत्व, धर्म यांची बंधने मानत नसत.
कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्र्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत. स्वकेंद्रित क्रिया बाह्य दिशेने राष्ट्रवाद व धार्मिक असहिष्णुता म्हणून आविष्कृत होतात, विभाजित जग निर्माण करतात, अशा जगात विश्वासापोटी आपण एखाद्याला मारण्यास तयार होतो.
जे. कृष्णमूर्ती यांचे १७ फेब्रुवारी १९८६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply