ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड.अपर्णा रामतीर्थकर यांचा जन्म १९५५ सालात झाला.
मुळच्या पुण्याच्या असलेल्या अपर्णा पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्याबरोबर लग्न झाल्यावर सोलापूरला आल्या. अपर्णा रामतीर्थकर यांनी आपल्या मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच १९९६ मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.
२००१ पासून त्या सामाजिक कार्यात होत्या. सामाजिक कार्यकर्त्या, वक्त्या बरोबरच सोलापुरातील त्या उत्तम हौशी नाट्य कलावंत होत्या. हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर २००८ पासून तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून २६ ते २८ दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्याज अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. त्या महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच ब्राह्मण संस्थांच्या मार्गदर्शिका होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली. त्यांना सामाजिक कार्याबद्दल काही पुरस्कारही मिळाले होते.
अपर्णा रामतीर्थकर यांचे २८ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply