ज्येष्ठ तबलावादक विजय किरपेकर यांचा जन्म २५ जुलै १९३७ रोजी झाला.
तबला वादनाचे प्रारंभिक शिक्षण त्यांचे वडील व्हायोलीन वादक व्ही. ए. किरपेकर ह्यांच्याकडे सुरु झाले. त्या नंतर पं. रमाकांत देवळेकर (तबला विशारद) व पं. श्री पांडुरंग मुखडे (तबला अलंकार) यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
त्यांनी १९९३ मध्ये संगीत विशारद तबला परिक्षेत प्रथम श्रेणी मिळवली. किरपेकर यांनी ‘सर खुस्रो इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी पुणे’ मधून ‘मेकॅनिकल ड्राफ्ट्समन’चा कोर्स उत्तीर्ण केला. तीन वर्षे कोयना प्रोजेक्ट वर काम केल्या नंतर त्यांनी मध्य रेल्वे, व्ही.टी, मुंबई, येथे २९ वर्षे ‘चीफ ड्राफ्ट्समन’म्हणून काम केले. त्यांनी चीफ टेक्निकल अॅसिस्टंट, (इलेक्ट्रीकल), मध्य रेल्वे, मुंबई येथून निवृत्ती घेऊन ते पुण्यात येऊन त्यांनी तबला वादन वर्ग सुरु केले. पुण्यासारख्या चोखंदळ लोकांत नव्याने स्थायिक होणे, तबलावादन वर्ग सुरू करणे, व तो शिस्तबद्ध चालविणे ही गोष्ट सोपी नाही. परंतु त्यांचे हे कलेवरील प्रेम, गुरुजनांबद्दल आदर, निष्ठा यांमुळे ते स्वतः विशारद झालेच तसेच त्यांचे १६ हून अधिक विद्यार्थी तबला विशारद झाले आहेत.साथ संगत व स्वतंत्र तबला वादन साठी त्यांनी १९८६ मध्ये दुबई व शारजा चा दौरा केला होता. आखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या तबला परीक्षांचे पेपर तपासणे, व परीक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले. किरपेकर यांनी २००१ मध्ये लिहिलेल्या ‘ताल-निनाद’ ह्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर २००५ मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या तबला परीक्षांच्या नवीन अभ्यासक्रमाविषयी त्यांनी ‘तालवैभव’ हे दुसरे पुस्तक लिहिले. सुरवातीपासून तबला शिकणाऱ्यांना ‘ताल वैभव’पुस्तकाचा चांगला लाभ होतो.
‘ताल वैभव’ हे पुस्तक तबला शिक्षक व विद्यार्थी यांना सहाय्यकारी व मार्गदर्शक आहे. तालवैभव’पुस्तकातील क्रियात्मक विभागात कायदे, तुकडे, चक्रधार, तिहाई लिहिताना, गणिती शास्त्राचा वापर करून लिहिलेले आहे.
विजय किरपेकर यांचे २१ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply