ज्येष्ठ तबला वादक झाकिर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी झाला.
तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस, ही तबला नवाज झाकीर हुसेन यांची रसिकजनांच्या मनांवर ठसलेली प्रति त्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून सहज उमटणारी ‘वाह उस्ताद’ ही दाद आणि या सदासतेज, हसतमुख चेहरा व त्यांचे भारतीय संगीताला वैश्विक परिमाण मिळवून देणारे योगदान कितीतरी अमूल्य. भारतातील सर्वात प्रसिद्ध तबला वादक अशी ओळख असणारे झाकिर हुसेन हे अल्लाराखा खां यांचे सुपुत्र आहे. झाकिर हुसेन यांचे बालपण मुंबई मध्ये गेले. झाकिर हुसेन संगीत जगात वयाच्या बाराव्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली झाकिर हुसेन हे एक व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे.
सोलो वादन, फ्युजन आणि साथसंगत हे तिन्ही प्रकार ते तितक्याच तन्मयतेने व उत्तमरीत्या करतात. भारतीयांसाठी झाकीर हुसेन हे सर्वश्रेष्ठ तबलावादक असले, तरीही जगाच्या व्यासपीठावर ते एक श्रेष्ठ संगीतकार म्हणून विराजमान आहेत. जगात सारे प्रवाह एकत्र येण्याचे श्रेय जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जरी जात असले, तरीही संगीताच्या क्षेत्रात झाकीर हुसेन यांनी ही प्रक्रिया अगदी सत्तरच्या दशकापासूनच सुरू केलेली आहे.
झाकीर हुसेन हे असे एकमेव तबलावादक आहेत, की ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन केलेले आहे. मग तो गिरीजा देवी यांचा टप्पा असो, किंवा त्यांचीच ठुमरी किंवा झुला असो; तो भीमसेन जोशी यांचा अभंग असो किंवा जसराजजी यांचे भजन. हे सारे प्रकार आत्मसात करून त्यांनी या सर्वांबरोबर वादन केले आहे.
इतकेच काय, तर देशातील प्रमुख गायकांबरोबर आणि वादकांबरोबर त्यांनी तबल्याची साथ करून प्रत्येकाची शैली सांभाळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे.
झाकीर हुसेन स्वतः तबला या वाद्याला व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय रवि शंकर, उस्ताद अली अकबर खां आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लाराखा खां यांना देतात. कारण भारतीय संगीत सर्वप्रथम देशाबाहेर या तिघांनी नेले. ते जगमान्य कलाकार झाले आणि त्यानंतर अनेक कलाकार देशात-परदेशात आपली कला सादर करू लागले. परंतु या साऱ्या प्रक्रियेत कळस जर कुणी चढवला असेल तर तो झाकीर हुसेन यांनी!
वीस वर्षांचे असताना झाकीर हुसेन अमेरिकेला गेले. त्यांना तिथे बोलावण्यात पंडित रविशंकर यांचा फार मोठा आग्रह होता. तोपर्यंत ते देशभर दौरे करीत होतेच, परंतु अमेरिकेतला तो अनुभव त्यांच्या आयुष्याला नक्कीच मोठी कलाटणी देऊन गेला. त्या काळातील अमेरिका हा उर्वरित जगासाठी एक ‘कल्चरल मेल्टिंग पॉट’ होता. यातूनच साहित्य-कला प्रांतात रूढी-परंपरा नाकारणारी प्रतिचळवळ म्हणजेच काऊंटर कल्चर मुव्हमेंट जन्माला आली. विशेषतः पूर्वेकडील संस्कृती, संगीत आणि अध्यात्म या सर्वांचे आकर्षण सामान्य अमेरिकी लोकांमध्ये वाढले. पं. रविशंकर, अली अकबर खां, उस्ताद अल्लाराखा खां अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होत गेले. याच काळात अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या झाकीर हुसेन यांनी जगातील वेगवेगळ्या सांगीतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांबरोबर सांगीतिक वार्तालाप केला. त्यांनी आपली थोर परंपरा, आपले संगीत सर्वश्रेष्ठ असे काहीही मनात न आणता अगदी खुल्या मनाने या साऱ्या भिन्न परंपरा आत्मसात केल्या. त्या सर्वांमध्ये तबला या वाद्याला एक मानाचे स्थान मिळत गेले.
आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. म्हणूनच नव्वदच्या दशकात जेव्हा जागतिकीकरण ही संकल्पना दृढ झाली, तेव्हा झाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संगीतकार म्हणून ध्रुवस्थान प्राप्त झालेले नाव बनले! याचाच प्रभाव म्हणून १९९६ च्या ॲटलांटा ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभाला ज्या संगीतकारांनी संगीत दिले, त्यातील एक नाव झाकीर हुसेन होते.
मास्टर्स ऑफ पर्कशन या संकल्पनेद्वारे ते भारतातल्या लोकसंगीत वादकांना दरवर्षी आपल्या बरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात आहेत. अनेक गुणी ज्युनियर कलाकारांबरोबर तबल्याची साथ करून ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या कलाकारांमध्ये राहुल शर्मा, नीलाद्री कुमार, राकेश चौरासिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मागच्या वर्षी पुण्याला जेव्हा त्यांनी राहुल देशपांडे यांच्या सोबत तबला वाजवला, तीस वर्षांपूर्वी याच झाकीर हुसेन यांनी देशपांडे यांचे आजोबा पं.वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर पुण्याला तबल्याची साथ केली होती.
झाकिर हुसेन यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, देऊन गौरवले आहे. त्यांना ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल झाकीर हुसेन यांना “एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटीव अवॉर्ड’ मिळाले आहे.
झाकीर हुसेन यांचे हल्ली काही काळ वास्तव्य पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्निया येथे असते. आपल्या समूहातर्फे झाकिर हुसेन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
झाकिर हुसेन यांचे तबला वादन
https://www.youtube.com/watch?v=wOUM8K0-Wkc
https://www.youtube.com/watch?v=wWJRwz7oBb4
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply