इंडियन पोलीस सर्व्हिस हे नावही ज्या काळात ‘पोलीस सेवेला दिलं गेलं नव्हतं, त्या काळात पोलीस सेवेत वरिष्ठ पदावर रूजू झालेले आणि निवृत्त हयात पोलीस अधिकाऱ्यांमधले देशभरातले सर्वाधिक वयाचे ज्येष्ठतम पोलीस अधिकारी म्हणून गणले जाणारे विश्वेश्वर चटर्जी रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. चटर्जी ब्रिटीश सत्ताकाळात पोलीस सेवेत दाखल झालेले १९४० च्या बॅचचे अधिकारी. त्या बॅचच्या अधिकाऱ्यांपैकी ९१ वर्षे वयाचे रणजीत गुप्ता हयात आहेत. बंगालमधल्या सेरामपूरमध्ये गुप्तांनी चटर्जीनंतर सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून काम केले.
स्वाभाविकपणेच चटर्जी गेल्याचे कळताच त्यांच्या आठवणी जागवल्या त्या गुप्तांनी. चटर्जी मूळचे अविभक्त बंगालचे. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर चटर्जी पोलीस सेवेत दाखल झाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास चटर्जी कोलकाता पोलीस दलात उपायुक्त पदावर होते. हाझरातील अॅलेंबरी कंपनीतील कामगार आंदोलन हाताळण्याची जबाबदारी चटर्जीवर होती. चटर्जीनी ते आंदोलन कौशल्याने हाताळलेच, पण गुप्तचर खात्यात काम करीत असताना आपल्यातील अंगभूत नेतृत्वाची, राजकीय विश्लेषणाची आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या चिकित्सक अभ्यासाची चुणूकही राज्यकर्त्यांना दाखवून दिली.
१९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत-चीन सीमावर्ती भागासाठी स्वतंत्र रक्षक दल स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकारने केला तेव्हा स्वाभाविकपणेच चटर्जीची निवड त्या दलाच्या प्रमुखपदासाठी करण्यात आली. हा सीमावर्ती भाग सव्वा दोन हजार किलोमीटरचा. त्याचं रक्षण करण्यासाठी लागणारं दल खरं तर कितीतरी मोठ्या संख्येचं. पण प्रारंभी अवघ्या चार बटालियन्सच्या जोरावर दलाचं काम सुरू झालं.
आज लडाखमधल्या काराकोरम खिंडीपासून अरूणाचल प्रदेशातल्या दिफू ला पर्यंत या दलाचं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे. माऊंटेनिअरिंग, डिझास्टर मॅनेजमेंटबरोबरच न्यूक्लिअर, बायॉलॉजिकल आणि केमिकल डिझास्टर्स हाताळण्याचं काम हे दल करतं. प्रारंभीच्या काळात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल नावानं ओळखल्या जाणाऱ्या या दलासाठी स्वंत्र महासंचालक नव्हताच. चटर्जीनी पहिलं दशकभर दलाचे महानिरिक्षक र चटर्जी म्हणून काम पाहिलं, पण या काळात आणि त्यानंतर त्यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाला जो आकार दिला, जी दिशा दिली, तिनं भारताच्या सर्व सुरक्षा दलांमधलं मानाचं दल म्हणून इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल ओळखलं जाऊ लागलं. १९६४ मध्ये एलिंट नावाचं एक गुप्तवार्ता अभियान चालवण्यात आलं. एलिंटचा अर्थ होता, ‘इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्ट अॅण्ड अॅनॅलिसिस ऑफ इंटेलिजन्स’. १६ ऑक्टोबर १९६४ ला चीननं आपल्या पहिल्या अण्वस्त्र उपकरणाची चाचणी केली. चीनची अण्वस्त्रक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याची धास्ती त्या घटनेनंतरच अमेरिका आणि भारताच्या मनात उत्पन्न झाली. चीननं ज्या ठिकाणी ही चाचणी केली ते ठिकाण इतकं सुदूर आणि आडबाजूला होतं की गुप्तचरांकडून त्याविषयीची माहिती सहजासहजी मिळणं शक्यच नव्हतं. सीआयएनं रॉ आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या सहकार्यानं ‘एलिंट’ हे शोध अभियान हाती घेतलं ते त्यासाठी. नंदादेवी शिखर मोहीमेच्या नावाखाली एम. एस. कोहली या गिर्यारोहकानं त्या शिखरावर एक शोध-उपकरण बसवायचा प्रयत्न केला. ते उपकरण बसलंही, पण पाठोपाठ हिमवादळ आलं आणि मोहीम अर्धवट सोडून तुकडीला परत यावं लागलं. पुन्हा एकदा तीच मोहीम हाती घेण्यात आली, पण उपकरण जे हरवलं ते हरवलंच. १९७४ मध्ये चटर्जी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा बराचसा काळ त्यांनी सामाजिक सेवांसाठी घालवला. दक्षिण दिल्लीतील सत्यनारायण मंदिराचे ते संस्थापक होतेच पण रायसीना बंगाली स्कूलचेही ते तीन दशकांहून अधिक काळ अध्यक्ष होते. इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनशी त्यांचे निकटचे संबंध तेव्हापासून राहिले ते अखेरपर्यंत!
Leave a Reply