“दूरदर्शन वाहिन्यांचा उदय झाला, अन् नवनव्या विषयांच्या मालिकांना सुरुवात झाली. मालिका सर्वोत्कृष्ट किंवा निकृष्ट ठरण्यामागे कथा किंवा पटकथा तसंच संवाद किंवा त्या मालिकेत काम करणारे कलाकार अशी बरीच कारणे असतात. केव्हातरी असं घडतं की, मालिकांची लोकप्रियता असो वा नसो पण त्यांची शीर्षकगीतं ही कमालीची लोकप्रिय किंवा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अशाच काही सुमधुर शीर्षक गीतं आणि गाण्यांचा श्रवणीय वेध….”
महाराष्ट्रात खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा प्रभाव वाढू लागला कारण, आपल्या भाषेतल्या मालिकांचं, कथाबाह्य कार्यक्रमांचे आशय व विषय दर्जेदार होत असत. म्हणून रसिक प्रेक्षकांनी सुद्धा काही मालिकांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. पण अशा मालिका आणखीन एका कारणासाठी लक्षात राहिल्या ते म्हणजे त्यांची “सुश्राव्य शीर्षक गीतं”. यासाठी थोडं मागे जायला हवं म्हणजे दूरदर्शनच्या काळात. तेव्हा “गजरा”, “स्वामिनी”, “दामिनी”, “घरकुल”, “आमची माती आमची माणसं” सारख्या मालिकांची लोकप्रियता यशाच्या शिखरावर होती. दुपार व संध्याकाळचा सुमार असल्याने महिला प्रेक्षकांची संख्या लक्षणीय असायची ज्यामुळे या मालिकांसोबतच त्यांची शीर्षक गीतं त्यांच्या तोंडी रुंजी घालू लागली. “बंदिनी…. स्त्री ही”, “तेजस स्पर्शाने दूर होई अंधार….”, “स्वामिनी….”, “महाश्वेता…” या सारख्या मालिकांची शीर्षक गीतं युट्युब वर किंवा एखाद्या साईटवर ऐकली, पाहिली की तो काळ आपल्या समोर उभा ठाकतो व त्या मालिकांची कथा डोळ्यासमोर तरळते व त्या मध्ये काम केलेल्या आपल्या आवडत्या कलाकारांचा अभिनय सुद्धा मनास स्पर्शुन जातो.
कालांतराने जेव्हा झी समूहाच्या “अल्फा मराठी” वाहिनीनं पदार्पण केलं त्यावेळी मालिकांचा साचा “टिपीकल दूरदर्शन” सारखा असला तरी सुद्धा जवळपास १९९९ ते २००५ पर्यंत प्रसारीत झालेल्या सर्वच मालिकांची शीर्षक गीतं ही “नाद मधूर” होती, आणि त्यांची रचना सुद्धा ज्यावेळेनुसार असेल, तसंच त्या शीर्षक गीतांचं संगीतही असायचं. अगदी “गुड मॉर्निंग महाराष्ट्र”, “हाऊसफुल्ल”, “लोभ असावा”, “४०५ आनंदवन”, “मानसी ”, “पिंपळपान”, “श्रीयुत गंगाधर टिपरे”, आणि “आभाळमाया….” अशी बरीच नावं घेता येतील. आभाळमायाने इतिहास तर घडवलाच पण या मालिकेचं शीर्षक गीतं आजही अनेकांच्या भ्रमणध्वनीची “कॉलर ट्यून्स” बनून आहे. मालिका संपून जवळ जवळ अकरा वर्ष लोटली आहेत तरीपण त्यांचं शीर्षक गीत गुणगुणावसं वाटलं नाही तर नवलच.
दरम्यानच्या काळात ईटिव्ही मराठी वाहिनी सुरु झाली. व वर्षभरातच “चार दिवस सासूचे” सारखी दीर्घकाळ चालणारी मालिका सुरु झाली. तिचं शीर्षक गीत विशेष गाजलं, “क्या बात है…”, बेधुंद मनाची लहर…” सारख्या “तरुण मालिकांची” गाणी ही सुमधुर पण “पाश्चात्य” संगीत ठसक्यानं युक्त होती.
पुढे “वादळवाट”, “मेघ दाटले”, “श्रावण सरी”, “ऊन पाऊस”, “सोनियाचा उंबरा”, “अवंतिका”, “पेशवाई”, “बोक्या सातबंडे”, “अनुबंध”, “कुंकू”, या मालिकांची शीर्षक गीतं ही अविट गोडी व सुरेल संगीत तसंच विषयाला अनुरुप अशा शब्दरचनेमुळे गाजली. यातून मालिकांचा विषय अधोरेखीत होत असे. “वैशाली सामंत”, “देवकी पंडित”, “अवधूत गुप्ते”, “स्वप्नील बांदोडकर”, “रविंद्र साठे” सारख्या दिग्गज गायकांच्या सुरेल स्वरांनी अशा गीतांना साज लाभला व दूरचित्रवाणी मालिकांच्या शीर्षकांमध्ये इतिहास घडला. वीस-बावीस मिनीटांच्या मालिकेत थोडी रटाळता किंवा लांबलचकपणा वाटला तरीपण या शीर्षक गीतांनी मनही काहीसं संगीतमय होतं आणि मालिका पहाण्याची गोडी ही वाढत जाते.
गेल्या काही वर्षांत वाहिन्यांच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये ”शीर्षक गीतांसाठी” नामांकनं मिळू लागली आहेत. ही प्रथा सुरुवातीला हिंदी दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये प्रचलित होती, पण अलिकडे अनेक मराठी चॅनल्सने सुद्धा हा पायंडा पाडलेला दिसतोय. असो त्यामुळे मायबोलीचं संगीत आणि वाङमयाच्या समृद्धीतसुद्धा भर पडतेय. अलिकडच्या काळात अनेक नवीन वाहिन्या दाखल झाल्या पण पूर्वीइतकी लक्षात रहातील अशी शीर्षक गीतं आजच्या घडीला, निर्माण होत नाहीत. त्याचबरोबर कार्यक्रमांची संख्याही एवढी वाढली आहे की विशिष्ट गीतं, कितीही कर्णमधुर असली तरीही तिची लोकप्रियता टिकून रहाणं कठीण झालं आहे. तरी ३-४ वर्षांपूर्वी “राजा शिवछत्रपती”, “बाजीराव मस्तानी”, सारखी ऐतिहासिक मालिकांची शीर्षक गीतं गाजली, कारण त्यामध्ये असलेलं पारंपारिक लोकसंगीत. ईटिव्ही च्या “कालाय तस्मै नम:” या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये निवेदनाचा खुबीनं वापर करण्यात आला व मालिकेत असलेलं वेगळेपण स्पष्ट झालं आणि मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उरली.
अनेक मालिकांची “शीर्षक गीतं” पूर्णत: “संगीतमय” ही पहायला मिळाली जसं की “हाऊसफुल्ल”, “गाणे तुमचे आमचे” इत्यादी. अलिकडे तर कार्यक्रमापूर्वी “टायटल सॉंग” दाखवणं ही संकल्पना आता हद्दपार होऊ लागली आहे. कारण म्हणजे वेळेची मर्यादा आणि त्याजागी जाहिरातींचं वाढलेलं प्रमाण. श्रोत्यांना, प्रेक्षकांना एखाद्या कार्यक्रमाचं “शीर्षक गीत” पहायचं किंवा ऐकायचं असेल तर अनेक “संगीत स्थळांचा” पर्याय त्यांच्यासाठी खुला आहे. प्रेक्षक कधीही कोणत्याही वाहिन्यांवरील कार्यक्रमाची “शीर्षक गीतं” डाऊनलोड करु शकतो, व ते ही मोफत.
एक मात्र खरं आहे की नवीन संकल्पनांप्रमाणे कार्यक्रमांचा फॉरमॅट बदलत राहिला तरीसुद्धा शीर्षक गीतांचा आवाका व गरज विस्तारत राहिल. मालिकांच्या प्रमोशनसाठीसुद्धा त्याचा उपयोग होईल. इथून पुढे शीर्षक गीतांच्या सततच्या प्रक्षेपणावर निश्चित मर्यादा येतील. पण मालिकांच्या शीर्षक गीतांमुळेच, सुरेल पर्व अनोख्या पठडीनं अनुभवता येणार आहे, त्यातूनच कार्यक्रमांची सर्वोत्कृष्टता उच्च शिखरावर जाईल हे मात्र नक्की.
— सागर मालाडकर
Leave a Reply