पुण्यातील सेवासदन संस्थेची स्थापना २ ऑक्टोबर १९०९ रोजी झाली.
रमाबाईं रानडेचं आजपर्यंत चालू असलेलं महत्त्वाचं काम म्हणजे सेवासदन संस्था. रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. परंतु रमाबाईंनी १९१६ मध्ये ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थिनी मॅट्रिक पास व शास्त्रीय विषयाची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे, ही अट होती. आजही नर्सिग कोर्ससाठी वेगळी सीईटी घेतली जाते. शंभर वर्षांपूर्वी ही सुरुवात रमाबाईंनी केली. केवढी दूरदृष्टी! शंभर वर्षांपूर्वी मुलींना शाळेतही जाण्यासाठी संघर्ष करावा लागायचा तिथे पुढचं शिक्षण घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं केवढं धाडसाचं काम पण रमाबाईंनी ते शंभर वर्षांपूर्वी केलं. अनेकींचं आयुष्य मार्गी लागलं.. मुंबईत पारशी सुधारक बहेरामजी मलबारी व दयाराम मिट्टधमल यांनी १९०७ मध्ये ‘सेवासदन’ ही संस्था सुरू केली. त्या संस्थेचे सल्लागार सर भालचंद्र भाटवडेकर यांनी रमाबाईंना पत्र पाठवून संस्था कशी असावी याची योजना तयार करायला सांगितली. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून माननीय स्त्री-पुरुष सदस्य झाले आणि ११ जुलै १९०८ रोजी रमाबाईंच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन रीतसर ‘सेवासदन, मुंबई’ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेचे उपनाव ‘सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी’. मुंबईतील ‘सेवासदन’ नीट चालू झाल्यावर पुण्यात ‘सेवासदन’ सुरू करावं असं ठरलं.
रमाबाईंच्या घरी जो क्लब होता त्यात व्याख्यानाखेरीज जे शिक्षण वर्ग होते त्याचं काम १५ मार्च १९०९ पासून पद्धतशीर करण्यात आलं. रँग्लर परांजपे यांच्या पत्नी सीताबाई परांजपे, भांडारकरांची सून सीताबाई, जानकीबाई भट, यमुनाबाई भट इत्यादींनी शिक्षणासाठी परिश्रम घेतले. वर्गात शिकणाऱ्या मुलींच्या परीक्षा घेतल्या. या सर्व प्रौढ स्त्रिया होत्या. त्यात विधवा, कुमारिका १४ ते ३५ असा वयोगट होता. २ ऑक्टोबर १९०९ रोजी रानडेवाडय़ात रमाबाईंनी क्लबची सभा घेतली. तेव्हा ‘सेवासदन’ संस्थेची पायाभरणी केली गेली. रमाबाईंनी संस्थेचा उद्देश, नियम वाचून दाखवले. या संस्थेत शिक्षणावर भर होता. संसारी स्त्रियांसाठी दुपारी दोन ते पाच या वेळेत वर्ग घ्यायचं ठरलं. १९१० मध्ये सहा वर्ग झाले. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित हे विषय कसे शिकवायचे, त्यांचं नियोजन केलं. डॉ. गोखले, डॉ. शिखरे शारीरिक शिक्षण, आरोग्य, प्रथमोपचार यावर व्याख्यानं देत.
संकलन:संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply