पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं हळूच पसरतात जमिनीवर . नकळत बागेतली , दारातली , कुंडीतील फुलं बघतात डोकावून.आज तोडण्यासाठी कुणाचा नंबर आहे ते ?
दिवस सरकत जातो.रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढते.. लालपरी मुक्कामाच्या गावावरून निघते. प्रवाशांची धांदल उडते.भाजीवाले,दुधवाले , खारी, पाववाले ओरडून विकतात.आपला माल… शिक्षक करतात प्रवास गाडीने . जेवणाचे डब्बे असतात सोबतीला.मुलंही पळतात शाळेच्या ओढीने . दप्तरात आपले भविष्य घेऊन . वडाच्या, पिंपळाच्या झाडावर भरते पाखरांची शाळा. गाव, नदी, डोंगर, रस्ता , चौक होतात जागे सेवेसाठी. मुलं शाळेत गोळा झाली की गजबज होतो सुरू. परिपाठाने घुमतो परिसर. सडा रांगोळीने सजते घर. शेतातील कामाची असते लगबग. खुरपणी , कोळपणी, नांगरणी, पाळी, पेरणी, राखणी, गुरांची सोडबांध , वेचणी , तोडणी यांचा असतो समावेश . शाळेत पहिला तास सुरू होतो. प्रसन्न मुद्रेने असतात सर्वचजण. हजेरी होते. वेळापत्रक असते.तासिकेनुसार शिक्षक बदलतात. भाषा, गणित, विज्ञान, कला, इतिहास , भूगोल हे असतात विषय . जे शिकवतात. जे घडवतात उद्याचा भारत. प्राथमिक शाळेतच घडत असते भविष्य .. शाळेत नसतो निर्जिव दगडांच्या सांगाडा .भींत बोलत असते मुलांशी . संवाद होतात फळ्यावरच्या अक्षरांशी. संवाद होतात रंगवलेल्या भिंतीशी.निसर्गातील प्रत्येक घटकांशी.. सकाळ सरून जाते पटकन.दुपारची चाहूल लागते. अंगाला ऊन स्पर्श करून जाते.जाणिव करून देते.पोटात ओरडतात कावळे. न्याहारीचा वखत टळून गेलेला. मुलं बघतात . किचनशेडकडे . भात , वरण , खिचडी की अजुन काही. हात धुवून तयार असतात.गाडीला अडकवलेला डबा पटकन येतो हातात. मनसोक्त होते पंगत . रानात सुटतात मजूर . दुपारच्या भाकरीसाठी. लसणाची चटणी आणि पाट्यावर रगडलेला ठेचा असतो . तोंडी लावण्यापुरता. कामाचा पडतो विसर . कारण कोणते तरी एक गाणं असत सोबतीला.असेच दिवस पडतात मागे एकेक ….प्रत्येक दिवसाची सकाळ असते नविन काही देणारी .. शिकवणारी …
विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
मो.9421442995
vitthalj5@gmail.com
Leave a Reply