![p-58131-SabarimalaTemple](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2019/03/p-58131-SabarimalaTemple.jpg)
नेहेमी ‘मन कि बात’ करणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी थोडीशी ‘काम कि बात’ केली. ‘भारतीय विज्ञान काॅंग्रेस’ च्या १०६व्या अधिनेशनात बोलताना पंतप्रधांनानी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या जोडीला ‘जय अनुसंधान’ असा नारा देऊन, संशोधकांनी समाजोपयोगी संशोधनावर भर द्यावा असा सल्लाही दिला..’जय विज्ञान’ हा नारा आपले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वायपेयींनी या पूर्वी दिला होता.
पंतप्रधानांनी संशोधन हे वैज्ञानिक क्षेत्रात व्हावे असा आग्रह धरलाय आणि ते योग्यच आहे. विज्ञानामुळे आपली रोजची कामं खुप सोपी होतात आणि यापुढेही ती आणखी सोपी होत जाणार यात शंका नाही. हे शारीरिक कष्टाचं झालं. बुद्धीची कामंही कमी करायचा प्रयत्न पूर्वीपासून सुरू आहे. कॅलक्युलेटर हे त्याचं आद्य स्वरुप‘ आणि सुपरफास्ट कॉम्प्युटर्स हे त्याचं आधुनिक स्वरुप. कृत्रीम बुद्धीमत्तेचे जोरात प्रयोग सुरु आहेत. माणसासारखी वागणारी, बोलणारी ‘सोफीया’ ही यंत्रमानव तयारही झालीय आणि तिला सौदी अरेबिया या देशाने त्याच नागरिकत्वही दिलंय. येत्या काही वर्षात असे यंत्रमानव जिवंत माणसाची जागा घेतीलही. नैसर्गिक इंटेलिजन्सचा ताबा एकदा का या आर्टीफिशिअल इंटेलिजन्सने घेतला, की मग आपण तनाप्रमाणे मनानेही रिकामे होत जाणार आणि आपलं एम्प्टी झालेलं माईंड डेव्हिलचा महाल होत जाणार हे मात्र नक्की. डेव्हिलने आपल्या माईंडात आताशी एक लहानशी झोपडी बांधलीय, ह्याची चुणूक देव-धर्म-जातीने जो धुमाकूळ सध्या आपल्या देशात घातलाय, ते पाहून येते. डेव्हीलच्या ह्या झोपडीचा महाल होणं जर वाचवायचं असेल तर, आपल्या सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातही जास्तीत जास्त संशोधन व्हायला हवं असा जास्तीचा आग्रह आपल्या पंतप्रधानांनी धरायला हवा होता. मी हे असं का म्हणतो, ते ही सांगतो.
आपलं आयुष्य सुखकर बनवणारं विज्ञान तर महत्वाचं आहेच, त्याहीपेक्षा काहीसं जास्त अध्यात्मिक आणि समाजिक विज्ञान महत्वाचं आहे. विज्ञानामुळे आपण आधुनिक किंवा अत्याधुनिक जिवन जगू शकतो. विज्ञानामुळे येणारी ‘आधुनिकता’ बाह्यत: दिसणारी आणि शारीरिक स्तरावर असते. पण जर का तनाबरोबर आपल्या मनालाही आधुनिक काळात आणायचं असेल तर, आपल्या समाजाचा, त्याच्या विविध काळातील मानसिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा अधिक अभ्यास करणं आवश्यक ठरतं. आपला देश अध्यात्मिक प्रकृतीचा असल्याने प्राचीन काळापासून आपल्याकडे अध्यात्म, समाजजीवन व त्यासोबत आपल्या विविध प्रथा-परंपरा कश्या विकसित होत गेलय याचाही संशोधनात्मक अभ्यास करणं गरजेचं ठरतं. असा अभ्यास आपल्या मनालाही आधुनिक काळाशी जोडणारा ठरतो. आपले देव, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली कथा-पुराणं, आपल्या प्रथा-परंपरा इत्यादी ज्या काळात जन्माला आल्या, त्या त्या काळात का जन्माला आल्या, त्याकाळची सामाजिक परिस्थिती काय होती याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या विषयातले संशोधक तो अभ्यास करतच असतात, परंतु हे प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे जाणून घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी वाचन हा एकमेंव मार्ग उपलब्ध आहे. वाचन, अभ्यास ही संशोधनाची पहिली पायरी असते. असा अभ्यास केल्यास केरळातल्या शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश करावा की करू नये वावर जे काही सुरु आहे, ते मूर्खपणाच आहे की शहाणपणाचं आहे हे बहुतेकांना समजून येईल. म्हणून या वादाच्या पार्श्वभूमीवर, या विषयाचाही संशोधकांनीच नव्हे, तर सामान्यांनीही अभ्यास करणं समाजाच्या हिताचं आहे.
शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे. सर्चच धर्म-पंथात त्यांच्या त्यांच्या प्रमाण ग्रंथात सांगितलेल्या गोष्टी आताच्या काळात जशाच्या तशा आचरणात आणण्याचा प्रयत्न सुरु असताना दिसतो. असं असलं तरी स्वत:ला हिन्दू म्हणवणारांनी हा अभ्यास करणं जास्त गरजेचं ठरतं, कारण इतर धर्मा-पंथांच्या तुलनेत हिन्दूंमधे एक जास्तीचा आयाम आहे आणि तो म्हणजे जात..! (स्त्री या नैसर्गिक ‘जाती’वर तर अधिक अन्याय झाला आहे आणि कायद्याने स्त्रियांना समानत्व दिलं असलं तरी, मानसिक प्रतलावर स्त्रीला आजही असंनतेचा सामना करावा लागतो आहे).जातीनुसार हिन्दू लोकांतल्या प्रथा-परंपराही बदलत जातात आणि त्यात उच-निचतेचा भावही असतो. समाज म्हणून एकत्रित जगताना या प्रथा-परंपरा-रूढींमध्ये मिलाफ आणि संघर्षही होत असतो. मिलाफ चांगला असतो. मिलाफ समाज संघटीत करत असतो, तर संघर्ष समाजाच्या एकसंघपणावरच आघात करणारा असतो.
हिंदू आणि इतर धर्म यात एक विलक्षण साम्य मात्र आढळते आणि ते म्हणजे स्त्री जातीला नसलेला बरोबरीचा अधिकार. मुसलमानांचा तीन तलाक किंवा बुरखा पद्धती असो, की हिंदूंचं शबरीमाला मंदिर स्त्री प्रवेश असो, स्त्रियांचा अधिकार मान्य केला जात नाही. कायद्याच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष सारखेच असले तरी, समाजात मात्र त्यांचा अधिकार आणि योग्यता प्राचीन काळातलीच जोखली जाते. आजच्या आधुनिक काळातही हे चालू असणं, हे दुर्दैवच आहे. म्हणून स्त्री-आणि पुरुष यांच्या धार्मिक आणि सामाजिक अधिकारात एवढा फरक का, याची माहिती करून घ्यायची असेल, तर जुन्या काळच्या प्रथा-परंपरा यांचा प्रत्येकाने अभ्यास करणे, गेला बाजार किमान माहिती करून घेणे आजच्या काळात महत्वाचे ठरते.
इतर सर्व धर्मांप्रमाणे हिन्दूतल्या प्रत्येक जातीतल्या प्रथा-परपरा ह्या प्राचीन काळात ही जन्माला आलेल्या आहेत आणि त्यांची सांगड अध्यात्मिकतेशी घातलेली आहे. इथे अध्यात्म याचा अर्थ देव असा घ्यावा. देवाशी सांगड घालण्याचं कारण म्हणजे, ‘देव पाप करील’ याची सर्वसामान्य माणसाच्या मनात लहानपणापासून घातली गेलेली भिती आणि तिच भिती या प्रथा-परंपरा -आधुनिक काळाशी कितीही विसंगत असल्या तरी- कसोशीने पाळायला माणसाला प्रवृत्त करत असते. माझ्यासारख्या अनेक माणसाला याची चिकित्सा करावीशी वाटते आणि चिकित्सेअंती प्राचीन काळात जन्माला आलेल्या या गोष्टी, अर्वाचीन काळात अगदी गैरलागू आहेत हे पटते. हे अनेकांना पटत असतं, पण ‘हे अनेक’ जेंव्हा एखाद्या जाती-धर्माच्या कळपाचा भाग होतात, तेंव्हा मात्र पटलेलं हे सत्य लगेचंच लुप्त होते आणि समाजात संघर्षाची स्थिती निर्माण होते, ही चिंतेची बाब आहे. असं होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतंत्र बुद्धीने विचार करणं आवश्यक आहे. जाती-धर्मावर आधारित कोणत्याही कळपात सामील होणं निर्धाराने टाळायला हवं. अन्यथा आपण दुसऱ्यांच्या बुद्धीने चालणार, ते आपल्या भावनांचा त्यांना हवा तसा उपयोग करून घेणार हे टळणार नाही. कळप कधीही शहाणा वागत नाही, हे सर्वानी लक्षात ठेवावं.
हा लेख लिहिताना केरळातल्या शबरीमाला मंदिरातील महिलांचा प्रवेश यावरून जे नाट्य देशात सुरु आहे, ते नजरेसमोर आहे. प्राचीन काळी ही प्रथा जेंव्हा केंव्हा अस्तित्वात आली तो काळ, त्याकाळची परिस्थिती, त्याकाळची समाजजीवन याची किमान माहिती करून घेतली तर, श्री अयप्पा मंदिरातील ८०० वर्ष जुन्या प्रथा १२०० वर्षांनंतरही जशाच्या तशा आजही पाळल्या जाव्यात, हा धरलेला आग्रह आणि त्यापायी होणारी हिंसा किती अनाठायी, हे आपल्याला व्यवस्थित समजतं आणि एकदा का हे समजलं की मग त्यामागील राजकारणही नीट समजू लागतं. मात्र हे समजण्यासाठी आपण प्रत्येकाने त्या संदर्भातील काहीतरी वाचन करायला हवं. संशोधक ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचावीतही असतात, परंतु एखाद्या संशोधकाने सांगितलेलं कितपत खरं आहे, हे आपलं आपणच तपासून घ्यावं लागत. कारण आपल्या देशातील संशोधकांनाही (काही सन्मानीय अपवाद वगळता) पक्ष, धर्म आणि जातीच्या पिशच्चाने पाछाडलंय असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. (दुर्गा भागवतांनी ‘आपल्या देशातील विचारवंत’ कसे विविध पूर्वग्रहांनी प्रदूषित आहेत या विषयावर अगदी नावा-उदाहरणासकट लिहिलंय). त्यामुळे खरी माहिती मिळणं अवघड होतं.
यावर एकच उपाय, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं. प्रत्येकाने वाचन अभ्यास करणं गरजेचं आहे असं जे वर म्हणलो, ते त्यामुळेच..! यासाठी सुरुवातीला फार लांब जाण्याचीही गरज नाही, अगदी प्राथमिक माहिती तुमच्या हातातल्या स्मार्टफोनवर ब्राऊज केल्यावरदेखील मिळू सकते, फक्त इच्छा आणि उत्साह मात्र हवा. एकदा का ती माहिती आपल्याला मिळाली आणि त्यातली चव आपल्या लक्षात अली, की मग त्या विषयांतलं पुढचं जास्तीच वाचन करायची इच्छा आपोआप जागृत होते. संशोधन असंच होत असतं. संशोधक असेच तयार होत असतात.
आपल्या पंतप्रधांनानी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या जोडीला ‘जय अनुसंधान’ असा नारा दिला. अनुसंधान म्हणजे फक्त विज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर आपल्या सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातही जास्तीत जास्त संशोधन व्हायला हवं असा आग्रह धरला असता, तर ती अधिक ‘काम कि बात’ झाली असती, असं मी अगदी सुरुवातीला म्हणालो, ते यामुळेच. अर्थात, ‘हे तुमचं वाटणं गैरलागू आहे, कारण ते व्यासपीठ ‘भारतीय विज्ञान काॅंग्रेस’चं होत आणि त्यावरून असा सल्ला देणं योग्य ठरलं नसत’ असं काही जण म्हणतील. असं म्हणणारांचं चुकीचं नाही, पण शेवटी आधुनिक विज्ञानात होणार अनुसंधान ज्या समाजाच्या भल्यासाठी वापरणं अपेक्षित आहे, तो समाज मानसिक दृष्ट्याही तेवढा सुदृढ आणि आधुनिक काळात वावरण्यास तयार असणं आवश्यक असतं, अन्यथा आधुनिक वैज्ञानिक दृष्टी आली असं म्हणता येणार नाही. समाजाला पूर्ण वैज्ञानिक दृष्टी आणि समाजात मानसिक सुदृढता देण्यासाठी प्राचीन काळातील सामाजिक आणि अध्यात्मिक विद्यानात संशोधन होणं आणि ते नि:पक्ष पद्धतीने लोकांसमोर उपलब्ध होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून असं आवाहन विज्ञान काँग्रेसमध्ये व्हायला हवं होत असं मी म्हणालो..
–@ नितीन साळुंखे
9321811091
05.01.2019
टिप- हिंदू संस्कृती व इतर धर्मातील देव, प्रथा, परंपरा या कशा आल्या याची प्राथमिक अभ्यास करण्यासाठी ‘युगानुयुगे चाललेला ईश्वराचा शोध’ हे श्री. शंकरराव सावंत यांचं पुस्तक सुरुवातील सर्वांनीच वाचावं, असा माझा आग्रह आहे. तुम्ही स्वत: जो पर्यंत वाचत नाही, तो पर्यंत देव-धर्म धुमाकूळ घालतच राहाणार..!
Leave a Reply