लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे.
विचारांमधील प्रभुप्रीती जेव्हा शब्दात उतरते तेव्हा त्या शब्दांना ‘प्रार्थना’ म्हटले जाते. हेच प्रेम जेव्हा शब्दांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले जाते तेव्हा ते ‘प्रवचन’ बनते. विचारांची दृढता जेव्हा शब्दात उतरते तेव्हा ते ‘वचन’ समजले जाते. विचारांमध्ये जेव्हा जोश येतो व तो शब्दात उतरतो तेव्हा त्याला ‘भाषण’ म्हटले जाते. एक – दोघांच्या विचारांची सुसंगती शब्दांद्वारे व्यक्त होते तो होतो ‘संवाद’ आणि तेच जर विसंगत असेल तर ‘वाद’ व्हायला ही वेळ लागत नाही. मनामध्ये अनेकानेक बाबींवर विचारांचा संग्रह केला असेल आणि तो जर शब्दात उतरला तर, त्याला ‘बातम्या’ म्हटले जाते. शब्दांची मांडणी व्यवस्थित रचून त्यात सूर भरले तर ते ‘संगीत’ बनते. विचारांची ऊर्जा शब्दांद्वारे व्यक्त होण्याचे हे अनेक प्रकार.
मनामध्ये विचारांचा भला मोठा संसार आहे. परंतु प्रत्येक विचाराला आपण वाचा देत नाहीत. विचारांच्या लहरी मनापासून मुखापर्यंत येई तो पर्यंत निवळून जातात. खूप वेळा आपण रागाच्या भरात किंवा आवेशाने शब्दांचा प्रयोग करतो, त्यामुळे संबंधांमध्ये दुरावा येतो. जसे विचारांचा प्रभाव शब्दांवर होतो तसेच शब्दांचा प्रभाव आपल्या विचारांवर ही होतो. एवढेच नव्हे तर आपल्या पचनशक्ति वर ही होतो. एखादे नकारात्मक वाक्य जितक्या आवेगाने व्यक्त करतो त्याचा परिणाम ऐकणाऱ्याच्या मानसिकतेवर तो होतोच परंतु त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या पाचनक्रियेवर होतो. म्हणून अश्या नकारात्मक वाक्यांचा प्रयोग जेवताना खास टाळावा.
जर आपल्या जीवनात सुख व शांती हवी असेल तर व्यक्तिगत तसेच सामूहिक संभाषण सकारात्मक, आनंदी, आशावादी, समाधान देणाऱ्या वाक्यांनी परिपूर्ण असायला हवे. आपले साधारण संभाषण ही शांतीमय शब्दांनी भरलेले असावे ह्याची शिस्त आपण स्वतः ला जाणीवपूर्वक लावायला हवी. शांत आणि स्थिर होण्यासाठी रोज काही वेळा साठी मौन बाळगावे. कारण आपल्या मनामध्ये सतत विचारांची आंदोलने होत असतात. त्यांना नियमित अभ्यासाने समाप्त करावे.
विचारांची स्पंदने जशी प्रभावशाली असतात तसेच शब्दांमध्ये सुद्धा शक्ति आहे. मंदिरांमध्ये जेव्हा मंत्रांचे, श्लोकांचे उच्चारण केले जाते किंवा भजन-किर्तन गायले जाते. तेव्हा त्यांची सकारात्मक ऊर्जा मंदिर तसेच आसपासच्या परिसराला मिळते. देवळांमध्ये येणाऱ्या भक्तजनांना त्याचा पवित्र व शक्तिशाली अनुभव ही होतो. शब्दांचा सकारात्मक परिणाम आहे तसेच नकारात्मक परिणाम ही आहे. शास्त्रीय प्रयोगातून सिद्ध झाले आहे की आपण जिथे राहतो, काम करतो किंवा झोपतो तिथे असलेला कोलाहल आपली कार्यक्षमता उल्लेखनीय प्रमाणात घटवतो. आपल्या शब्दांमध्ये एखाद्या दुःखी व्यक्तीला सुखी किंवा उत्साहात आणण्याचे सामर्थ्य आहे तसेच एखाद्याला कमजोर करून मरणाच्या घाटात उतरवण्याचे ही सामर्थ्य आहे. आपले शब्द व्यक्तिच्या मनातील घावांसाठी मलमाचे काम ही करतात तर इजा पोहोचवण्याचे सुद्धा. मनुष्याची ओळख त्याच्या शब्दांनी होते. एखादा आध्यात्मिक व्यक्ति शब्दांचा प्रयोग खूप प्रेमाने, शांततेने, शुभभावनांनी करतो. साधारण व्यक्तिचे शब्द ही साधारण असतात. शब्दांद्वारे व्यक्तिचा दर्जा, विचारांचा स्तर, जाति ……. अनेक प्रकारचे दर्शन होऊ शकतो. शब्दांनी माणसाच्या भावनांचा शोध घेऊ शकतो.
एकदा एक राजा, त्याचा प्रधानमंत्री व शिपाई जंगलामध्ये गेले होते. पण काही कारणाने ते एकमेकांपासून वेगळे झाले. कोण कोणत्या दिशेला गेले काहीच कळेना. जेव्हा जंगलातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना आसपास कोणीच दिसत नाही. थोडेसे चालल्यावर त्यांना एक आंधळा व्यक्ति रस्त्याच्या कडेला बसलेला दिसतो. पहिले शिपाई त्या व्यक्तिला बघतो. त्याच्या जवळ जाऊन थोडा जोराने बोलतो, ‘ ये, एकतो का ? ह्या रस्त्यावरून कोणी, जाताना आढळले ?’ तो उत्तर देतो, ‘मला माहित नाही.’ काही वेळाने प्रधानमंत्री तिथे येतो, तो विचारतो ‘ गृहस्थ, तुम्ही इथून कोणाला जाताना बघितले ?’ तो म्हणतो ‘नाही’ आणखीन थोड्या वेळाने राजा तिथे येतो, तो त्या माणसाला विचारतो, ‘महात्मन, तुम्ही ह्या रस्त्यानी कोणाला जाताना पाहिले आहे का ?’ तो उत्तर देतो, ‘होय राजन ! राजाला आश्चर्य वाटते आणि तो म्हणतो तुम्ही तर बघू शकत नाहीत, मग तुम्हाला कसे समजले कि मी राजा आहे. तो आंधळा व्यक्ति म्हणतो कि ‘राजन, तुमच्या शब्दांनी तुमची ओळख दिली. ह्यांच्या ही आधी दोन गृहस्थ इथून गेले. त्यांनी मला हाच प्रश्न विचारला. त्यांच्या शब्दांनी मला जाणवले कि ते कदाचित तुमचे मंत्री आणि शिपाई असावेत.’
तात्पर्य :- मनुष्य आपली ओळख आपल्या शब्दांनी दुसऱ्याला देतो. म्हणून आपण आपल्या शब्दांना जपावे. आपले बोल बहुमोल आहेत. योग्य ठिकाणी, योग्य रित्या, आवश्यक तेवढ्या प्रमाणात त्याचा वापर करावा. खूप बोलणाऱ्या व्यक्तिचे बोल ‘वायफळ गप्पा’ म्हणून ओळखले जातात. जास्त बोलण्याने आपल्या जीवनात समस्या ही जास्त येतात. समस्यांपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर कमी बोलणे, शब्दांचा कमीत कमी वापर करणे आवश्यक आहे.
‘कमी बोला, हळू बोला, गोड बोला’
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply