भिंतीलगतच्या एका बाकड्यावर , तो केव्हापासून बसला होता .
पोलीस स्टेशनमध्ये खूप धावपळ सुरू होती .
फोन सारखे घणघणत होते .
ऑर्डर्स सुटत होत्या .
टेबलावरच्या फाईल्स संबंधितांकडे जात होत्या .
वरिष्ठांना सॅल्युट ठोकले जात होते .
बेडीबंद आरोपींना कोर्टात वेळेवर नेण्यासाठी लगबग सुरू होती .
धावपळच धावपळ सुरू होती .
कुणालाही उसंत नव्हती .
शिफ्ट ड्युट्या बदलत होत्या .
बिझी रुटीन सुरू होतं .
तो केव्हाच आला होता.
त्याची ही पोलीस स्टेशनची नेहमीची ड्युटी असल्यानं ओळख होती. त्यानं इनचार्जला सांगितलं ;
“आज नेहमीपेक्षा वेगळं काम आहे. संपादकांनी, पोलिसांवर विशेष फिचर करायला सांगितलं आहे. कारण आज २१ ऑक्टोबर आहे. साठ वर्षांपूर्वी लडाख मधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित आणि निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला, पोलिसांनी कडवी झुंज दिली. पण दुर्दैवाने हे सगळे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवान पोलिसांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून सर्वाना स्फूर्ती मिळावी आणि कर्तव्य, राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. आज तुमच्याबरोबर राहून मी आर्टिकल तयार करणार आहे, अर्थात तुम्हाला डिस्टर्ब न करता.
इन्स्पेक्टरनी न बोलता त्याला बसायला सांगितले .
तो बसून होता , पाहत होता . कितीतरी वेळ …
” –क्काssssय ?”
इनचार्ज च्या ओरडण्याच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली .
” कुठे ? कधी ? ” इनचार्ज ने विचारले .
आणि जसजशी माहिती मिळत गेली तसतसा इनचार्जचा चेहरा विदीर्ण होत गेला .
तो उठला .
“काय झालं ? ”
आणि इनचार्ज ने जे सांगितलं ते ऐकून तो हादरला .
शहराच्या मध्यवर्ती चौकात , ऐन गर्दीच्या वेळी , ट्रॅफिक हवालदारावर गुंडांनी गाडी घातली होती , गुंड पळून गेले होते . पण तडफडणाऱ्या हवालदाराला वाचवण्यासाठी गर्दी पुढं आली नव्हती . पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे गर्दीतले अनेक जण आपापल्या मोबाईलवर शूटिंग करीत होते .
त्याला काय करावं सुचेना .
बातमी सगळीकडे पसरली होती आणि संपूर्ण स्टेशनवर शोककळा पसरली होती …
पुन्हा एकदा फोन वाजला .
इनचार्ज ने फोन घेतला आणि टेबलावर मूठ आदळली .
” तीनशे दोन , अरे जा बाबा रेस्ट हाऊसवर, तिथे आपल्या पोलिसाला लोकप्रतिनिधीने थोबाडलय , त्याला रिलिव्ह कर , इकडे पाठव त्याला .”
” का मारलंय ?”
जाऊ दे , तुम्ही विचारू नका . कुणाकुणाचे कसले इगो असतात , ते आमच्यावर बाहेर पडतात .”
तो सुन्न झाला .
हे भलतंच काहीतरी घडत होतं.
आज पोलीस हुतात्मा दिन आणि त्याच दिवशी हे असं घडावं ?
–बाकड्यावर बसताबसता त्याच्या लक्षात आलं …
हे काय आजचं आहे असं नाही .
अनेक वेळेला आपणच बातम्या लावल्या आहेत पोलिसांबद्दलच्या …
–कधी पोलिसांनी तपास योग्य तऱ्हेने केला नाही …
–कधी दंगल योग्य तऱ्हेने हाताळली नाही …
–कधी नियमभंगाच्या केसीस मध्ये जास्त तत्परता दाखवली …
–कधी अनावर गर्दीला, मोर्चाला आवरण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रूधुर सोडला…
–आंदोलने चिरडून काढली…
या आणि अशाच बातम्या आपण वार्ताहर म्हणून देत राहिलो .
पण आपण असा का नाही कधी विचार केला …
–पोलीस सुद्धा एक माणूसच आहे .
–त्यालाही मनभावना आहेत .
–त्यालासुद्धा चांगल्या घरात , चांगल्या वातावरणात राहावं असं वाटत असेल .
–ऑन ड्युटी चोवीस तास राहताना , त्याला सुद्धा सण समारंभ आणि करमणूक हवीशी वाटत असेल .
–अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेपायी उन्हातान्हात , थंडीवाऱ्यात , पावसापाण्यात उभं राहताना तो थकत असेल .
–सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपण्यासाठी त्याला आपले प्राणसुद्धा पणाला लावायला लागत असतील .
–समाजाचे रक्षण करण्यासाठी दगड धोंड्यांची , डोंगरदऱ्यांची पायवाट तुडवताना त्यालाही आधुनिक साधनांची गरज हवीशी वाटत असेल .
–आजारपणात पुरेशी विश्रांती आणि योग्य ते उपचार हवेसे वाटत असतील .
–मुलांना चांगलं उच्च शिक्षण द्यावस वाटत असेल.
पण आपण अशा पद्धतीने विचारच केला नाही . संवेदनशील राहून पोलिसांच्या बाजूला न्याय दिला नाही .
कथा , कादंबरी , नाटक , सिनेमा , मालिका मध्ये झालेले पोलिसांचे चित्रण हेच खरे चित्रण हे जनमानस आपण बदलून टाकू शकलो नाही .
त्याला खंत वाटली .
तो उठला .
लेखासाठी त्याला नवीन दिशा मिळाली होती .
आजच्या पोलीस हुतात्मा दिनी , हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहायची ती, त्यांची ,आजवर समाजाला न दिसणारी बाजू मांडून . असा निश्चय करून , मनोमन त्याना सॅल्युट करून तो निघाला .
त्याला लेखाचे शीर्षक सुचले ;
शब्द जिथे गोठतात …!
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
दि.२१ ऑक्टोबर २०१९
Leave a Reply