शब्दांची दुनिया किती वेगळी आहे. एक एक शब्द म्हणता वाक्य तयार होते. आता मराठी मध्येच बघा एक सारखे असे किती शब्द आहेत किंवा असे म्हणता येईल एकाच शब्दाचे किती अर्थ आहेत. उदाहरणार्थ बघु.. अनंत, अंग इत्यादी. इथे अनंत म्हणजे अमर्यादित आणि परमेश्वर असे दोन अर्थ होतात. दुसरा शब्द पाहिला तर अंग म्हणजे शरीर हा एक अर्थ आणि ” अरे या अंगाने वळलास ना तर दिसेल दुकान तिथेच तर आहे. ” हा दुसरा अर्थ. फक्त मराठी मध्येच नाही तर इतरही भाषांमध्ये असे एक सारखे शब्द आढळतात..
शब्द हा लिहिण्यास आणि बोलण्यास सोपा वाटतो. पण खरं पाहिले तर याची ताकद फार मोठी आहे. शब्दाचे असे एक वजन आहे जे आपण पाहिले तर अणु इतके सुक्ष्म आहे आणि नाही तर पर्वताइतकं मोठे आहे. शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात. त्याची धार मात्र बोलणाऱ्याच्या चरित्र आणि वागण्यावर अवलंबून असते.
पुर्वीच्या काळी ऋषी मुनींचा आशिर्वाद आणि श्राप हे दोन्ही परिणामकारक होते. पण आज मात्र शब्दाची लया गेली. यातली ताकद संपली कारण काय हेच आपण दिलेल्या शब्दाला जागणं विसरलो. एका दानधर्म करणारा कर्णाची कथा इथे सांगावीशी वाटते ती सांगते, महाभारतातला कर्ण तर सगळ्यांना माहीत असेलच. त्याच्या वरुन दिलेल्या शब्दाला जागणं काय हे कळते. एकदा दान धर्माने प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली की जो कोणी याचक त्याच्या दाराशी येईल तो रिकाम्या हाती परत जाणार नाही. आणि मग इंद्राने एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेतले आणि कर्णा कडे त्याची कवच कुंडलांचे दान मागितले. या कवचकुंडलांमुळेच आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असुन सुद्धा कर्णाने त्याची कवच कुंडलं कापून इंद्राच्या स्वाधिन केली.
देव-देश आणि धर्म याच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराज आणि “आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं” असं म्हणणारे तानाजी मालुसरे, महाराज गडावर सुखरूप पोहोचेपर्यंत प्राण पणाला लावून खिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे स्वराज्याचे असंख्य शूरवीर मावळे हे शब्दाला जागणारे होते. प्रसंगी प्राण देऊन मातृभूमीचे रक्षण करणारे होते.
पूर्वी शब्द याला वजन होते ताकद होती. आज माणूस इतका पूढे गेलाय की मागे वळून एकदा बघ रे बाबा असे म्हणायची वेळ आली आहे. आजच्या काळात शब्दाला वजन नाही ताकद नाही. परिणामी हे कुठेतरी हरवलेले दिसत आहे.
Leave a Reply