मी शब्दांच्या प्रेमात पडलो त्याची कथा.. (भाग एक)
मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं.
मी लहानपणी एका बैठ्या चाळीत राहायचो. चाळीत दिडशे चोरस फुटाच्या सोळा खोल्या. आठ पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आठ. तशीच मागेपुढे आठ आठ खोल्या असलेली आमच्या समोर एक चाळ. दोन चाळींच्यामधे पाच फुट रुदीची आणि चाळीच्या लांबीएवढी गल्ली. खोल्या जरी असल्या, तरी बहुतेक सर्वांचा वावर गल्लीतच. बहुतेक सर्व मालवणी, दोन-तीन गुजराती, परंतू वेश सोडला तर भाषेसहीत अंतर्बाह्य मराठीच. एक कमावणारा आणि कमीतकमी ६ खाणारे अशी सर्वांचीच परिस्थिती. महिना अखेरीस पेपर ‘विक’ असायचा. अशा आम्हा गरीब घरच्यांना रोजचा पेपर घेणं परवडायचं नाही. खरं सांगायचं तर, पेपर घेणं ही चैन असायची. मला वाचनाचा नाद कसा लागला, हे समजण्यासाठी माझी राहाण्याची पार्श्वभुमी काय होती, हे कळावं यासाठी थोडं पाल्हाळ लावलं.
पूर्वी बहुतेक चाळीत पेपर घेणारं एखादंच कुटूंब असे. एका घरात येणारा पेपर सबंध चाळ वाचायची. एकदा पेपर घरातून गेला, की मग त्या पेपरच्या रद्दीशीही मूळ मालकांचा संबंध येत नसे.
आमच्या चाळीतही लब्दे नांवाच्या एका कुटुंबाकडे दररोजचा ‘लोकसत्ता’ यायचा. आमच्या दोन चाळींत पेपर घेणारी आणखीही एक-दोन घरं असावीत, परंतू लब्देंशी जरा जास्तीचा घरोबा असल्याने, त्यांचा पेपर माझ्या हक्काचा होता. मला तर ते श्रीमंतच वाटायचे. गंम्मत म्हणजे त्या कुटुंबातल्या कुणालाही पेपर -पुस्तकं वाचायची आवड नव्हती. सकाळ झाली, की सर्वात प्रथम लब्द्यांकडे धावायचो. ताज्या पेपरचा वास घेत त्याची घडी मोडताना मी काहीतरी खजिन्याची पेटी उघडतोय असं वाटायचं. अर्थात खजिन्याची पेटी वैगेरे शब्द आजचे, तेंव्हा हे शब्द माहित असले, तरी त्यांच्या अर्थाची व्याप्ती माहित नव्हती. पेपरचा छाती भरून वास घेऊन मगच त्याची घडी मोडायची ही माझी तेंव्हाची सवय ५२ व्या वर्षातही कायम आहे. आजही मला कोणत्याही पेपरच्या पानांचा टोकं बरोबर जुळलेली आणि मधली मुख्य घडी मध्यावर असल्याशिवाय पेपर वाचायला होत नाही..!!
मला शब्दांशी खेळायच्या नादाला लावलं, ते लोकसत्ताच्या त्यावेळच्या हेडींगने..! ‘लोकसत्ता’चं सोमवार ते शनिवारचं हेडींग काळ्या शाईत आणि फक्त रविवारचं हेडींग लाल शाईत असायचं. आताही तसंच असतं. पण पूर्वी रविवारच्या लोकसत्ताच्या हेडींगच्या डोक्यावर ‘रविवारची’ असा शब्द लिहिलेला असायचा. आता फक्त ‘रविवार’ असं लिहीतात. तेंव्हा वाचताना ‘रविवारची लोकसत्ता’ असं वाचायला लागायचं. ‘तो पेपर’ किंवा ‘तो लोकसत्ता’असं आम्ही नेहेमी म्हणत असल्यानं, पेपर हा शब्द पुल्लिंगी आहे हे मनात बसलं होतं. असं असताना, ‘रविवारचा लोकसत्ता’ असं न लिहीता, पेपरवाले ‘रविवारची लोकसत्ता’ असं चुकीचं का लिहीतात, असा प्रश्न मला तेंव्हा नेहेमी पडत असे. बरं कुणाला विचारायची सोयही नसे, ‘कसल्यो मेलो शंका काढता हा, शाळेत बाईंका इचार’ असं अस्सल मालवणीत ऐकायला लागायचं. त्या मुळे स्वत:च त्यावर त्या वयाच्या मानाने विचार करणं भाग असायचं. पुढे कधीतरी कळत्या वयात गेल्यावर हा समजलं, की ‘रविवारची लोकसत्ता’ म्हणजे ‘लोकांची सत्ता, ती लोकसत्ता’..! ‘ती सत्ता’ या अर्थाने छापलेलं असायचं ते. अर्थात हे त्या लहान वयात कळलं नाही ते एका अर्थानं बरंच झालं, नाहीतर तेंव्हाच्या कोवळ्या मनावर, ती खरोखरंच लोकांची सत्ता आहे असं कोरलं गेलं असतं, तर आताची विपरीत परिस्थिती पाहून मला आता निश्चितच निराशेचा झटका आला असता..पण तेंव्हा ती खरंच लोकांची सत्ता असावी. ‘लोकसत्ता’ या जाडजूड हेडींगखाली दबून गेल्यासारखी दिसणारी ‘लोकमान्य लोकशक्ती’ झाली ती अलीकडे..!
त्या वयात फरसं काही कळत नसलं तरी जे वाचायचो, ते काहीतरी जादुभरं आहे हे मात्र जाणवायचं. अनेक शब्द, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेत्यांची नांव, देशांची नांव, घडलेल्या घटना तेंव्हाच्या कुतुहलाच्या नजरेनं वाचल्या होत्या, त्यांचा संबंध पुढे जाणतेपणी लागायला लागला. तेंव्हाचं तंतोतंत आठवत नसलं, तरी पार्श्वभुमी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असायची, तेंव्हा वाचलेलं संदर्भ म्हणून चटकन पुढे यायचं, अजुनही येतं. लिहावं कसं याचंही तेंव्हा नकळतचं शिक्षण झालं असावं, असं मला आता वाटतं..
‘लोकसत्ता’ हा एकमेंव पेपर तेंव्हा मला वाचायला मिळायचा. तो खुप वाचला, कळायचं फार नाही, पण वाचन म्हणजे काहीतरी भारी आहे असं मात्र वाटायचं. अगदी हरवून जायला व्हायचं. शब्दांची जादू चढायची. मला वाचनाचा नाद ‘लोकसत्ता’ने खुप लहान वयातच लावला आणि त्यामुळे मी मैदानी आणि बैठ्याही खेळात कधी रमलो नाही. वाचनाचा नाद पुढे पुढे कसा वाढत गेला, ते पुढच्या भागात..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply