प्रसिद्ध सनईवादक पंडित शैलेश भागवत यांचा जन्म २ जून १९५८ रोजी ठाणे येथे झाला.
अनेक वर्षांपासून सनई वादनाला आयुष्य वाहून घेतलेले प्रसिद्ध सनईवादक पंडित शैलेश भागवत यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील ‘सेंट जॉन दि बाप्टिस्ट स्कूल’ मध्ये झाले. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी एस सी केले. शैलेश यांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची ओढ होती. त्यांचे आईवडील दोघंही संगीतप्रेमी असल्यानं त्यांच्या घरी थोर गायक- वादकांच्या रागसंगीताच्या रेकॉर्डस् होत्या व दोघंही नियमितपणे संगीत ऐकत. उस्ताद विलायत हुसेन खाँ, पं. विनायकराव पटवर्धन, बाई लक्ष्मीबाई अशा गुणीजनांचे संगीत ऐकताना आपण वेगळं वाद्य निवडून संगीतक्षेत्रात आपला ठसा उमटवावा असं स्वप्न शाळेत ते पाहू लागले.
१३- १४ वर्षांचा असताना शैलेश यांनी सनई वाजवायला शिकायचं असं ठरवून पं. औरंगाबादकरांकडे गेले. त्यांनी शैलेश यांना शिष्य म्हणून स्वीकारलं व श्री कौपिनेश्वर मंदिरात ते सनई शिकवू लागले. नंतर त्यांनी ठाण्याचे प्रसिद्ध सतारवादक पं.मारुती पाटील यांचेही मार्गदर्शन घेतले. त्या सोबतच पं.शैलेश भागवत यांनी सनईतील प्राथमिक धडे पंडित बिस्मील्ला खान यांच्या कॅसेट्स ऐकून गिरविले.
एकदा त्यांचे सनई वादन ऐकून पंडित बिस्मिल्ला खान यांनी त्याला गंडा बांधला. बिस्मिल्ला खाँ साहेबांचे पुत्रवत प्रेम व आशीर्वाद त्यांना लाभला. आजवर चार दशकांहून अधिक काळ ते विविध ठिकाणी आणि कित्येक संगीत मैफिलींच्या मध्ये सनई वादन करत असतात. त्यांनी जालंधर येथील श्री बाबा हरिभल्लभ संगीत महासभा, भोपाळ येथील भारत भवन येथे ऑल इंडिया फेस्टिव्हल ऑफ म्युझिकल विंड विंडो इन्स्ट्रुमेंट्स, पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सव,आणि इंदूरमधील पंडित भातखंडे, पंडित पलुसर संगीत समरोह यांच्यासह अनेक प्रख्यात संगीत महोत्सवात सनई वादन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दरवर्षी मिरज येथे उस्ताद अब्दुल करीम खान पुण्यतिथी समरोह येथे सेवा सादर करत असतात.
शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
संदर्भ. इंटरनेट.
Leave a Reply