“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” अशी गर्जना करून शाहीरी परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर म्हणजे शाहीर कृष्णा गणपत साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही. अमळनेरला असताना हिराबाई बडोदेकर यांनी त्यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. अमळनेरला असताना साने गुरुजींचा सहवास शाहिरांना लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्या अनेक सामाजिक कार्यात शाहिरांना सक्रिय सहभाग घेतला. लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार त्यांच्यावर झाला होता आणि मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी चक्कक मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखविता आली. समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहिरांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तननाट्य लिहिली. आबुरावाचं लगीन, बापाचा बाप, ग्यानबाची मेख, आंधळं दळतंय अशी अनेक मुक्तुनाट्ये त्यांनी लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. शाहिरांनी जशी मुक्त नाट्य लिहिली, तसेच अनेक पोवाडेही लिहिले. शाहिरी कलावंतांच्या व्यथा पाहून त्यांना शासनाच्या वतीने सहकार्य मिळवून देण्याचा त्यांनी निश्चीय केला व शासनाच्या वतीने सर्वच ज्येष्ठ लोककलावंतांना अनेक सवलती मिळवून दिल्या.
लोककलावंतांना मानधन मिळवून देण्यात त्यांचा सहभाग हा निश्चिनतच महत्त्वाचा आहे. शाहीर साबळे म्हटले, की सर्वांत प्रथम लक्षात येते ते त्यांचे महाराष्ट्र गीत व नंतर त्यांनी लोकप्रिय केलेली लोकगीते, भारुडे. शाहिरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार त्यांना देण्यात आला. याशिवाय संत नामदेव पुरस्कार, पुणे मनपाचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर, अ. भा. मराठी शाहिरी परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर असे अनेक बहुमान साबळे यांच्या नावावर आहेत. सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार व संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
“जय जय महाराष्ट्र माझा‘प्रमाणेच “हरे कृष्णा हरे कान्हा‘, “दादला नको ग बाई‘, “आठशे खिडक्याज नऊशे दारं‘, “विंचू चावला‘, “या विठूचा‘, “आज पेटली उत्तर सीमा‘, “पयलं नमन‘, “बिकट वाट वहिवाट नसावी‘ आणि “मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून‘ आदी त्यांच्या आवाजातील विविध प्रकारची गाणी तुफान लोकप्रिय झाली. “माझा पवाडा‘ हे त्यांचे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रसिद्ध झाले. शाहीर साबळे यांचे २० मार्च २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply