शाहीर कुंतिनाथ करके यांचा जन्म १० एप्रिल १९३६ रोजी हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे झाला.
शाहीर कुंतिनाथ करके हे कोल्हापूरच्या मातीतले अग्रगण्य शाहीर होते. करके यांचा डफ कडाडू लागला आणि वाणी बरसू लागली की अंगावर रोमांच उभे राहात असत. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले हे त्यांचे मूळ गाव. घरात आणि ते ज्या समाजातून आले त्या जैन समाजातही शाहिरी परंपरा नव्हती. त्यामुळेच त्यांच्या कलेचे विशेष कौतुक वाटते.
पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक डॉ.बापूजी साळुंखे यांचा गुरूसहवास लाभला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. ते त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. ज्ञानदानाचे कार्य करत असताना संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांनी मोलाचे सहकार्य दिले. यातूनच कुंतिनाथ करके यांना लाभलेल्या शाहिरी कलेचीही त्यांनी जोपासना केली, आजवर अनेक विषयांवर, व्यक्तीमत्वावर, इतिहासावर रचलेले आणि गायलेले पोवाडे अजरामर झाले आहेत,उमेदीच्या काळात त्यांनी शाहीरी झंकार, हे शाहीरी काव्य तर ‘येडें पेरलं खुळे उगवल” हे विनोदी नाटक प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्या रचनेला आणि वाणीला वेगळीच धार असल्याने महाराष्ट्रातील श्रोत्यांना आजही मंत्रमुग्ध होण्याची भुरळ पडते. त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये गीतरचना केली आहे. स्वत: शेतकरी कुटुंबात घडलेलं पिंड असल्याने करके सरांनी मातीशी कधी नाळ तोडली नाही,सेवानिवृत्तीनंतर सध्या उतम शेतीवर लक्ष दिले आहे. त्यातूनच जीवनातील अनुभवलेल्या प्रसंगाचं आत्मकथन साकारलं जात आहे. त्यांचे पाझर, चैत्रपालवी, कांचनकुंम, जलधारा इत्यादी काव्यसंग्रह आणि कथा ही महावीरांची हा चरित्र ग्रंथ लिहिला आहे. ‘मानाचा मुजरा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. यात त्यांच्या शाहिरी कवनांचे आणि गीतांचे पुस्तक त्यांच्यातील हरहुन्नरी शाहिराचे दर्शन घडवते.त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेटसू प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली. कुंतिनाथ करके त्याला अपवाद होते.
इतिहासातील शूरवीरांचे पोवाडे तर ते गात असतत, परंतु लोकगीतांच्या ढंगाची गीते आणि आजच्या काळातील तरुणाईला मोहात पाडणारी प्रेमगीतेही ते खटकेबाज लिहिली होती.
‘बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई गल्ली बोळानं वरडत जाई
कोकण्या नवरा हवा गं बाई मला कोकण्या नवरा हवा गं’
हे लोकगीतासारखे मराठी माणसाच्या मनात गुंजणारे गीत मूळचे कुंतिनाथ करके यांचे होते. दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटात याच आशयाचे गीत असले तरी करके यांचे हे गीत १९५९ साली लिहिलेले आहे. शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक यांनीच त्यांना, तुमचे पोवाडे तुम्हीच गा, असे प्रोत्साहन दिले. करके यांनी त्यावर्षी गावोगावी हे गीत गाऊन सातवे येथील शाळेसाठी ६५ पोती भात जमा केला होता.
शाहीर करके यांनी प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या सहकार्याने लिहिलेली कोल्हापूरची लावणी जगप्रसिद्ध आहे.
‘चल जाऊ कोल्हापुरी
पंचगंगा नदीतीरी,
कोल्हापूर राजधानी मावळ्यांची!
कोल्हापुरी फेटा बांध,
कोल्हापुरी पायताण।
पैलवान छाती काढून,
चाल पुढती।’
त्यांची ही लावणी एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आजही कोणत्याही कार्यक्रमात या लावणीला भरभरून दाद मिळते. करके यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडाही खूप गाजला. लंडन विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी तो त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित करून नेला. सामाजिक प्रश्नांचा वेध घेणारी अनेक भारूडे त्यांनी लिहिली.
‘भारतात भाग्यवंत देश कोणता, देश महाराष्ट्र पुण्यशील भारता’ या करके यांनी लिहिलेल्या महाराष्ट्रगीताने कोल्हापूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनामध्ये चैतन्य आणले होते. ‘कोल्हापूरच्या जगदंबेनं दिली एक भाकरी दिली एक भाकरी नि खाऊन आलो मी जेजुरी ‘ हे खंडोबाचं गाणंही अनेकांच्या ओठांवर रुळलेलं दिसतं.
पोवाड्याबरोबरच गोंधळगीते, ओव्या, भारूड, लोकगीते, सवालजबाब असे गाण्यांचे विविध प्रकार त्यांनी लिहिले. एवढेच नाही तर अलीकडच्या काळातील काही चित्रपटांसाठी शृंगारगीतेही त्यांनी लिहिली, यावरून त्यांच्या बहुमुखी प्रतिभेची कल्पना यावी.
‘ही कोण गड्या यक्षिणी, तुग वक्षिणी, थाट दक्षिणी निऱ्यांचा घोळ l
अंधारात गळे मकरंद, गाल गुलकंद, नयन द्वय धुंद करा कुणी मोल l’
अशी शाहीर रामजोशींची आठवण करून देणारी शृंगारिक लावणीही करके यांच्या लेखणीतून साकारले आणि ‘दारी पिंगळा बोलला’ सारखे गीत लिहून ते ग्रामसंस्कृतीचे दर्शनही घडवतात. पुस्तकात त्यांचे विविध विषयांवरील पोवाडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे, प्रतापगडाचा रणसंग्राम, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, पृथ्वीराज चौहान, तात्या टोपे, वासुदेव बळंत फडके, बापूजी साळुंखे, वसंतदादा पाटील अशा विषयांवरचे करके यांच्यावरचे पोवाडे संबंधित व्यक्तिंची गुणवैशिष्ट्ये नेमकेपणाने व्यक्त करतात.निवृत्तीनंतर प्रा. करके शेतीत रमले. शेती आणि शाहिरी दोन्हींची मशागत करीत त्यांची वाटचाल सुरू होती. शाहीर कुंतिनाथ करके यांना शासनाचा दलितमित्र पुरस्कार,व डॉ डी वाय पाटील विद्यापीठ मार्फत डिलीट पदवी बहाल करण्यात आली होती.
कुंतीनाथ करके यांचे २२ मार्च २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply