MENU
नवीन लेखन...

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंत

‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे डेहराडून येथे प्रारंभीचे शिक्षण झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली व नंतर हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथे त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. १९४८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले व साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. राज कपूर अभिनित सुनहरे दिनचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते.

तसेच त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उदा., फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान व धोबी डॉक्टर. बहुहा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथाचित्रपट होय. त्यानंतर त्यांनी इन्स्पेक्टर, शेरु, डिटेक्टिव्ह व हिलस्टेशन हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वतःची चित्रपटनिर्मिती संस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या निशाणाखाली त्यांनी हावडा ब्रिज हा पहिला चित्रपट निर्माण केला. त्याने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले.

त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये हावडा ब्रिज, चायना टाऊन, काश्मीर की कली, ॲन इव्हनिंग इन पॅरिस, आराधना, कटी पतंग, अमर प्रेम इ. उल्लेखनीय आहेत. एकच चित्रपट दोन भाषांत (हिंदी व बंगाली) निर्माण करण्याचा प्रयोग प्रथमतः करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी अमानुष हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांत १९७४ मध्ये निर्माण केला. भारत व बांगला देश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला पहिला चित्रपट सामंतांनी १९८४ मध्ये बनवला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्ना यांना नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी आराधना, कटी पतंग व अमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले.

राजेश खन्नाला सुपरस्टार पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. आराधना ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. शर्मिला टागोर यांनी ‘अॅ्न इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घातली आणि प्रचंड खळबळ उडवून दिली. चित्रपटाची नायिका ही पॅरिससारख्या ठिकाणी स्वत:च्या जीवावर युरोपभर प्रवास करत असल्याने तिचे अत्याधुनिक असणे अटळ होते. साहजिकच ही बिकिनी अत्यंत वेलस्क्रिप्टेड होती आणि मा.शक्ती सामंत या दिग्दर्शकाने ती अत्यंत योग्य रितीने शूट केली होती. ‘अमर प्रेम’ मधील ‘चिंगारी कोई भडके…’ या गाण्याचे शुटिंग कोलकता येथील हावडा ब्रिजखाली असलेल्या पाण्यामध्ये एका जहाजात करायचे, अशी योजना ठरली परंतु दिग्दर्शक मा.शक्ती सामंत यांना राजेश खन्नाच्या लोकप्रियतेची जाणीव होती. लोकांची हावडा ब्रीजवर एवढी गर्दी जमेल की, तो ब्रीज तुटेल अशी भीती त्यांना वाटली त्यामुळे त्यांनी एका स्टुडिओमध्ये हावडा ब्रीजचा सेट उभारुन शुटिंग करण्याचे ठरवले.

काश्मीर की कलीपासून सामंत रंगीत चित्रपटनिर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत जाने-अन्जाने, मेहबूबा, आनंद आश्रम, अनुरोध, बरसात की एक रात व अलग अलग इत्यादींचा समावेश होतो. अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत, लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही त्यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची बलस्थाने होत. सामंतांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशीम सामंत याने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट त्यांनी निर्माण केले. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने ‘आराधना साऊंड सर्व्हिस’ ही ध्वनिसेवा सुरु केली. मुंबईच्या बॉलिवुड व पाश्चात्त्य हॉलिवुडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या हावडा ब्रिज, आराधना आणि बरसात की एक रात या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे ॲनिमेशन फिल्ममध्ये रुपांतर करण्यात आले.

सामंत यांना आराधना, अनुराग व अमानुष ह्या चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना ‘झी’ वाहिनीतर्फे ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ एकूण चित्रपट कारकीर्दीसाठी देण्यात आला. त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बैरुत इ. ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट-प्रमाण मंडळाचे अध्यक्ष तसेच कोलकात्याच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. शक्ती सामंत यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..