प्रबोधन पर्वात वृत्तपत्रांना खूप महत्त्व प्राप्त झाले. या वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी समाजमन घडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. जाणीव जागृती केली. स्वातंत्र्याच्या आकांक्षाबरोबरच नवप्रेरणा, जिज्ञासा यांचे खुले आकाश समाजासमोर उभे केले. अगदी त्याच प्रकारे मागच्या दहा-पंधरा वर्षात समाज माध्यमांनी नवी क्रांती घडवून आणली आहे.
सोशल मीडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बहुआयामी विश्वाने जगाला, पर्यायाने समजाला, घडवण्याचे, बिघडवण्याचे काम केले आहे. सोशल मीडियाचा समाजमनावरचा प्रभाव इतका घट्ट आहे की या माध्यमातून प्रसारित होणारी माहिती ही सत्यच असणार अशी मानसिकता समाजात रूढ झाली होती. पण मागील काही दिवसात सोशल मिडियाचे, समाजमाध्यमाचे बरेवाईट परिणाम सामोरे येऊ लागले आहेत. समाजमाध्यमाच्या बाबतचे कायदे अस्तित्वात येऊ लागले आहेत. समाजमाध्यमे कशी हाताळावीत याचे संकेत रूढ होऊ लागले आहेत. एका अर्थाने हे असे होणे हे समाजमाध्यमाची विश्वासार्हता दृढ करण्याच्यासाठी आवश्यक होते. कारण कोणत्याही माध्यमाचे अधिष्ठान विश्वास हाच असायला हवा. त्याशिवाय त्याचा स्वीकार होत नाही.
आज आपण जो सोशल मिडिया वापरतो त्याच्यामागे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ आहे. हे तंत्रज्ञान दररोज विकसित होत जात आहे. असे असले तरी या सोशल मिडियाचे काम तेच आहे. माहिती देणे. वर्तमान आणि भूतकाळ याबाबत संबंधितांना अद्यायावत करताना भविष्याचे दिशा दर्शन करणाऱ्या या सोशल मिडियाची तुलना हिंदू समाजातील शकून सांगणाऱ्या मंडळीशी केली तर चूक ठरणार नाही. पारंपरिक ज्ञान, श्रध्दा आणि हेच आपले जगण्याचे साधन असे मानून समाजमनाचा तळ ढवळत सत्य माहिती, अद्ययावत माहिती आणि भविष्याची दिशा स्पष्ट करण्याचे काम करणारे काही घटक आपल्या समाजात खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. सध्याचा सोशल मीडियाचा झालेला स्फोट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली क्रांती यामुळे हा गट थोडा अंधारात गेला असला तरी त्याने आपले नित्यकर्म सोडले नाही. तो आजही परंपरा जपतो आहे आणि शकून सांगत दारोदरी, गावोगोवी फिरत आहेत.
कोण आहेत हे लोक जे हजारो वर्षे माहिती ज्ञान यांचे आदान प्रदान करत आहेत? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. हे लोक म्हणजे भटके विमुक्त भटके विमुक्त समाज बांधवाची आपण साधारणपणे तीन प्रकारे विभागणी करू शकतो.
कौशल्य-ज्ञान यांच्या आधारे उपजीविका करणारे, धर्म-उपासना यांच्या प्रसाराचे काम करणारे शिकार व पशुपालन करून उपजीविका करणारे. या तीन गटापैकी आपण धर्म व उपासना यांचा आदराने उपजीविका करणाऱ्या भटक्या विमुक्त बांधवाचा विचार या लेखात करणार आहोत. वासुदेव, नंदीबैलवाले, मरीआईवाले हे तीन भटके बांधव आपण लहानपणापासून अनुभवत असतो. वासुदेवाच्या टोपीतील मोराची पिसे आणि त्याचे पायघोळ अंगरखा सावरीत घेतलेली गिरकी आपल्याला आठवत असेल. सांग सांग भोलानाथ म्हणत दारोदारी येणाऱ्या नंदिबैलवाल्याला आणि त्याचा धष्टपुष्ट बैल आठवत असेल. संक्रांतीनंतर वर्षफळ सांगत सुकाळ – दुष्काळ सांगत फिरणारे मरिआई नावेही आठवत असतील. समाज जीवनात या तीन समाज गटाशिवाय अन्ही खूप समाजगट आपले धर्म-उपासनेचे कार्य करत असतात. ज्यामध्ये भाट, हेळव! गोंधळी, रावल, बाळमुकुंद, गोसावी, चित्रकथा, सरोदे अशा अनेक लोकांचा समावेश करता येतो.
वर वर पहाता ही सारीच मंडळी धर्म-उपासना यांच्या आधाराने आपला चरितार्थ चालवतात असे दिसते. देवाची गाणी, अभंग गाऊन घडीभर करमणूक करणारा वासुदेव हा केवळ मनोरंजन करणारा कलावंत एवढ्या पुरता मर्यादित राहत नाही. तर कुळ, रीत, संस्कार आणि वारसा यांचा जीता जागता कोश असतो. वासुदेव जेव्हा एखाद्या गावात जातो. घरासमोर जातो तेव्हा तो त्या घराचे संस्कार, कुलाचार यांची आठवण करून देतो. सण, उत्सव, तिथी यांची माहिती सांगतो आणि मिळणारी भिक्षा आपल्या झोळीत घेत दान पावलं असे जेव्हा म्हणतो तेव्हा तो मागच्या बारा पिढ्याचे स्मरण करतो. आपला वारसा काय? आपली मूळं कुठे रुजली आहेत यांची आठवण करून देण्याचे काम वासुदेव करतो. वासुदेवाच्या फेरीची निश्चित वेळ ठरलेली आहे. भल्या पहाटे तो गावात प्रवेश करतो. रामनामाचा गजर करत गाव जागा करतो. तेव्हा तो केवळ भिक्षा मागत नाही तर आसपासचा परिसर, माणसं यांचे सूक्ष्म निरीक्षण करतो. निसर्गातील बदल तो समजून घेतो आणि तेच लोकांना सांगतो. एका अर्थाने वासुदेव हा हिंदू समाजातील माहितीचा दूत ठरतो.
गोंधळी, आराधी, सरोदे, बाळमुकुंद हेही भटकंती करणारे बांधव यांचा थेट संबंध कुळाचाराशी येतो आणि देवघरापर्यंत त्यांना प्रवेशही मिळतो. वंशपरंपरेने अनेक ठिकाणी कुळाचार केला जातो पण त्यांचे विधिविधान यजमानाला माहीत असतेच असे नाही अशा वेळी समाजबांधव आपले काम करता करता कुळाचार समजून सांगतात. भाट – हेळवी समाजबांधव वंशावळ्याचे जतन करतात आणि त्यात सातत्याने भर घालण्यासाठी माहिती ऐकवण्यासाठी गावोघावी भटकत असतात. आज भाट किंवा हेळवी समाजाने जतन केलेली वंशावळ पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. या मंडळींमुळे आपले पूर्वज कोण? आपले मूळस्थान कोणते? कोणत्या कारणाने आपण मूळ स्थानाहून विस्तापित झालो? अशी माहिती या मंडळींकडूनच मिळू शकते. आज आधुनिक भाषेत सांगायचे तर भाट, हेळवी समाजबांधव हे समाजशास्त्र आणि मानववंश शास्त्राचे संवर्धक आणि वाहक आहेत.
महादेवाचा नंदी आला, कैलासपतीचा नंदी आला असे गाणे म्हणत नंदी बैलाला नाचवणारे नंदीबैलवाले हे ठरलेल्या गावी ठरलेल्या वेळीच पोहचतात. सुगी संपताना पोहचलेले हे बांधव शेतकरी वर्गातून आपल्या उपजीविकेची तरतूद करत असतात. त्या बदल्यात वेगवेगळ्या भागातील पिकपाणी, रोगराई यांची माहिती देऊन जातात. थेट कैलाशपती शंकराची नावे सांगणाऱ्या हा बांधव शकुन सांगत येतो तो थेट महादेवाचा, निती-सदाचार यांच्यावर भर देत तो माणसाना जगण्याची दिशा देतात. भूत- वर्तमान आणि भविष्यकाळ यांची सांगड घालत आपला होरा सांगतो. लोकसमजूत अशी आहे की नंदीबैलवाल्याचा होरा चुकत नाही. त्यांने केलेले भाकित खरे होते. पिक-पाणी, रोगराईचे त्याचे अंदाज खरे ठरतात. एका अर्थाने समाजाचा, निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास असणारी ही मंडळी शकून सांगत फिरतात ते आपल्याला ईश्वराने दिलेली जबाबदारी म्हणूनच समाजात सदाचार, न्याय आणि सत्य यांची जपणूक व्हावी म्हणून हे बांधव भटकंती करत असतात. संक्रातीनंतर गावोगावी मरीआईवाले मंडळी डोक्यावर देवीचा देव्हारा घेऊन भटकंती करतात. चौकाचौकात देवीची पूजा करण्यासाठी महिलांना बोलावतात. देवीचे गुणगान गाताना व्रतवैकल्य सांगतात. देशभरची परिस्थिती, दुष्काळ, सुकाळ यांची माहिती देतात. वर्षातून एकदा एका गावात येणारी आणि वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करणारी ही मंडळी पाहिली की आपल्या लक्षात येते की अत्यंत विपन्नावस्थेत जगूनसुद्धा ते देवकार्य करत असतात. देवाचा, धर्म, नीतिचा शकून सांगत फिरत असतात.
वासुदेव, भाट, नंदीबैलवाले, यांचा समाजमनावर किती मोठा प्रभाव असेल? हे समजून घ्यायचे असेल त ज्ञानेश्वर माऊली आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या रचना तपासाव्या लागतात. माउलीची, नाथांची अनेक भारुडे ही या समाजबांधवाच्या नावाची आहेत. अनेक ठिकाणी रुपक म्हणून यांचा उपयोग केला जातो. याचाच अर्थ असा की समाज मनावर वासुदेव, भाट, नंदीबैलवाला या प्रतिमा खूप खोलवर रुजलेल्या आहेत. समाज जीवनाशी ही नावे आणि समाजबांधव एकरूप झालेले होते. त्याचा प्रभाव लक्षात घेऊन संतमंडळींना आपला विचार प्रसारित करण्यासाठी या समाज बांधवाची कार्यशैली जीवन आणि व्यवहाराचा आधार घेतल्याचे दिसून येते.
आज सोशल मिडियाच्या प्रभावाचा आपण अनुभव घेताना कनेक्टीव्हीटी या शब्दाला खूप महत्त्व आहे. आपण संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलो तर प्रचंड मोठी हानी होईल अशी भिती आपल्याला सतावत असते. आभासी जगातील ही कनेक्टीव्हीटी आणि वास्तव समाज जीवनातील कनेक्टीव्हीटी यांची तुलना करताना अखंड परंपरा, संस्कार यांच्याबरोबरच समाजाची नाळ तुटू न देण्याचे काम या भटके विमुक्त बांधवांनी केलेले आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सारे जग एका क्षणात पादक्रांत करत असलो तरी हजारो वर्षे ज्यांनी समाज जोडला, संस्कार जपला आणि राष्ट्र उभारणीला योगदान दिले त्या भटके विमुक्त बांधवाची आजची स्थिती काय आहे? याचा विचार आपण करतो का? छत्रपतींच्या खात्यात आणि १९५७च्या स्वातंत्र्य समरात असणारे या समाजबांधवाचे योगदान आपण विसरतो आहोत का? व्यक्तीकेंद्री होताना समाजकेंदी दृष्टी हरवून बसलो आहोत काय? असे प्रश्न या निमित्ताने समोर उभे राहत आहेत. त्यांची उत्तरे आपली आपणच शोधायची आहेत.
समाजमाध्यमाचा उपयोग संवाद, संपर्क आणि माहितीच्या आदान प्रदानासाठी करताना जे आजही शकून सांगण्यासाठी दारोदार भटकतात आणि आपण याच कामासाठी जन्मलो. आपले काम हे दैवी संकेत आहे असे मानतात. त्याचा विचार नव्या तंत्रज्ञानात आणि आधुनिकतेच्या परिपेक्षात आपण कसा करणार आहोत यांचा शकून सांगण्याची ही वेळ आहे.
रवींद्र गोळे
सहकार्यकारी संपादक – साप्ताहिक ‘विवेक’
व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात रवींद्र गोळे यांनी लिहिलेला लेख.
Leave a Reply