समाज माध्यमे नेहमीच लोकप्रिय असतात. समाज माध्यमे मनुष्याला सोशल बनवण्याचे महत्वाचे कार्य पार पाडतात. पण त्याकाळी म्हणजे आमच्या लहानपणी कोणतेही अशा प्रकारचे समाज माध्यम आमच्यापर्यंत पोहचलेले नव्हते. शाळा हेच तेंव्हा आमच्या साठी समाजमाध्यम होते.
तिथे केलेल्या कामाबद्दल पोच पावती मिळायची… म्हणजे नसते उद्योग केले तर त्याबद्दल शाळेत शिक्षाही मिळायची. आम्हाला तीच पोचपावती असायची…
शाळा म्हणजे उतरत्या पत्र्याची गोदामासारखी एक सार्वजनिक इमारत असते. सर्वांचा या इमारतीवर हक्क असतो हा अर्थ, ”शाळा काय तुझ्या बापाची हाय का ?” अशा कानावर पडणा-या वाक्यावरून सहज आम्हाला कळायचा. मग काय शाळा सुटली की शाळे भोवती आमचेच राज्य. एखादा वाळूतला गोल दगड पत्र्यावर फेकायचा… अन् तो घरंगळत खाली येईपर्यंत मस्त आवाज व्हायचा.. पुन्हा दुसरा दगड. मज्जा वाटायची ही गंमत पहायला.. कधी काचेची गोटी फेकायची.. असं हे आमचं चालायचं सोबती ही एकापेक्षा एक वरचढ असे होते… हेच आमचं संगीत शिक्षण… खरं संगीत शिक्षण तर दुस-या दिवशी गुरुजींना एखाद्या गावातल्या मोठ्या माणसाने आमच्याकडे बोट करुन ” हे दोघं तिघं होते बघा गुरुजी काल शाळंवर दगडं फेकायला..” असं सांगून निघून गेल्यावर ऐकायला मिळायचं… बेसरमाचा फोक जेंव्हा मागच्या बाजूला बसायचा.. तेंव्हा आपोआप संगीत सुरु व्हायचं.. तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं…
आणखी एक गंमत म्हणजे शाळेत दुध दिलं जायचं.. पण दुधात साखर नसायची… आणि घरुन आणलेली साखरही गुरुजींना न दिसू देता त्या दुधात हळूच टाकायची… हमखास पकडले जायचो ते मित्राला साखर देतांना… मग काही खैर नाही.. तरी मित्रप्रेम मात्र उतू जायचं दुध वाटपाच्या वेळी.
सारवलेली शाळा.. बसायला घरुन एक पोत्याचा तुकडा न्यावा लागायचा.. नाही तर शेणाने सारवलेल्या जमिनीवरील बारीक बारीक काड्या खालून टोचायच्या..
हे काही तरी टोचतंय हे कळायलाही खूप वेळ लागायचा.. ही आमची शिक्षणाची गती असायची.. आज शाळेत सर्वत्र फरशी आहे.. प्रगती झाली आहे.
पुस्तकाला एका काडीचा अधार देऊन वाचत रहायचं कारण पुस्तक हातात धरुन हाताला कळ लागत असावी. हेच पुस्तकाचं स्टॅंड होतं. ‘हे कसं वाचतंय बघा ?’.. हे पाहण्यासाठी मुलं, आजूबाजूला ओट्यावर बसलेली माणसं यायची ह्याच आमच्या सोशल मिडिया वरच्या लाईक्स.
त्यावर चांगल्या कमेन्ट्स ही भेटायच्या.. पाढे म्हणायची तर फार चढाओढ असायची.. मोठ्यात मोठा आवाज आला पाहिजे.. विशिष्ट ओघात आणि क्रमाने रोज घेतल्यामुळे पाठ व्हायचे पण लिहीताना जमायचे नाही… एकोणीसच्या पाढ्यात हेकणापाच्या पंच्यानव म्हणण्याची फार गंमत वाटायची.. एकमेकांकडे बघून अशा वेळी जोर लावून लक्ष वेधून घेतांना चेह-यावर आनंद ओसंडून वाहत रहायचा.. बरेच वेळा पाढे म्हणताना अशा ठराविक गंमती होत्या.
आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!!
— संतोष सेलूकर
परभणी ७७०९५१५११०
Leave a Reply